मांसाहारी मुख्यपान

 

अंडाकरी

 

साहित्य - १ मोठा नारळ, ६ उकडलेली अंडी, २ वाटया उभा चिरलेला कांदा, २ इंच आले, ५-६ हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, ३ चमचे तेल, आर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा मीठ, २ चमचे लिंबाचा रस, ८ लसूण पाकळया, १ चमचा गोडा मसाला, १ वाटी उकळते पाणी.

व्हाईट सोस साहित्य - १ चमचा मैदा, १ कप दूध, १ चमचा लोणी.

वाटण - आले लसूण पाकळया, काळा मसाला, मीठ व मिरची बारीक वाटा. नारळ वाटून त्याचे दूध काढा.

कृती - एका पातेलीत तेल गरम करा. त्यावर वाटण घालून परता रंग बदलू नका. कांदा घाला व परता, नंतर उकळून ठेवलेले दूध घाला व उकळी आली की उकडलेली अंडी सोलून त्यांचेही तुकडे करून घाला. लिंबाचा रस व कोथिंबीर घाला. १ वाटीभर गरम पाणी घाला व मिश्रणाला चांगली उकळी आणा. ही करी ५-६ माणसांना पुरेल.

 
 

ओल्या बांगडयाचे कालवण

 

साहित्य - ५-६ ओले बांगडे, १ नारळ, ८-१० सुक्या मिरच्या, ७-८ तिरफळ, १ चमचा तांदूळ, थोडी चिंच कोळून, ३-४ आमसुले, तेल, मेथी, मोहरी फोडणीसाठी, चवीनुसार मीठ.

कृती - बांगडे स्वच्छ करून त्याचे २ ते ३ तुकडे करावेत. बांगडयाची तोंडे वाटल्यास काढून टाकावीत किंवा ठेवली तरी रश्श्याला चांगली चव येते. नारळ, हळद, लाल मिरच्या, मिरे, तांदूळ एकत्र बारीक वाटावे, त्यात चिंच कोळून घालावी व तिरफळ ठेचून घालावीत. एका पातेलीत मोहरी व मेथीची फोडणी करावी व त्यात वाटलेला मसाला घालावा. आवश्यकतेनुसार चार पाच वाटया पाणी व चवीनुसार मीठ घालावे. उकळी आली की त्यात बांगडयाचे तुकडे घालावेत. जरा वेळ उकळल्यावर खाली उतरवावे व मग आमसुले घालावीत.

 
 

बटर चिकन

 

साहित्य - १ चिकन (५०० ते ६०० ग्रॅमचा छोटा बर्ड घ्यावा), २ चमचे साजूक तूप, ४ टेबलस्पून बटर, पाव किलो कांदे चिरून व उकडून, २ चमचे खसखस आणि मूठभर काजू भिजवून वाटून, अर्धी वाटी साईचे दूध, २ चमचे गरम मसाला, चार मोठे टोमॅटो उकडून व सोलून, १ चमचा धने-जिरे पावडर, २ चहाचे चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, १०० ग्रॅम ताजी मलई अथवा ५० ग्रॅम किसलेले चीज, मूठभर चिरलेली कोथिंबीर, १०-१२ पाकळया, १ इंच आले वाटून.

कृती - चिकन साफ करून त्याचे मोठे तुकडे करावेत व थोडे मीठ व १ कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये घालावे व कुकर गॅसवर ठेवावा. पूर्ण आचेवर आल्यावर गॅस बारीक करून २ मिनिटे शिजू द्यावे व गॅस बंद करावा. प्रेशर कुकर थंड झाल्यावर चिकन काढून घ्यावे व पाणी निथळून बाजूला ठेवावे. चिकन सोलून सर्व हाडे बाजूला काढून मांसल भाग काढून घ्यावा. वरील प्रकार चिकन उकडून न घेता मीठ व तेलाचा हात लावून ओव्हनमध्ये भाजून घ्यावे व सोलून मांसल भाग काढून घ्यावा. दोन्ही प्रकारे कुठलीही पध्दत अवलंबली तरी चालेल. पण ओव्हनमध्ये भाजून घेतलेल्या चिकनचे बटर जास्त खमंग व चविष्ट लागते. उकडलेला कांदा वाटून घ्यावा, उकडलेले टोमॅटो बारीक करून मिक्सरमधुन काढून घ्यावे. कढईमध्ये साजूक तूप व लोणी एकत्र गरम करावे व त्यात उकडून वाटलेला कांदा घालावा. कांदा गुलाबी रंगाचा होऊन तूप बाजूला सुटेपर्यंत परतावे. मग त्यात वाटलेलं आलं, लसूण घालावे. थोडे परतून वाटलेले खसखस, काजू व साईचे दही घालावे व तूप सुटेपर्यंत परतावे. मग त्यात लाल तिखट, धनेजिरे पावडर व गरम मसाला घालून परतावे. त्यात मिक्सिरमधून काढलेल्या टोमॅटोचा गर घालावा. चवीनुसार मीठ घालून चिकनचे तुकडे घालावेत. १ वाटी पाणी घालून थोडे उकळू द्यावे. बाऊलमध्ये काढून ताजी मलई व कोथ्रिबीर घालून सजवावे अथवा ओव्हनप्रुफ डिशमध्ये काढून वर किसलेले चीज घालून १० मिनिटे गरम ओव्हनमध्ये ग्रील करावे (चीज वितळे पर्यंत) वरील बटर चिकनला चिकनचा मांसल भाग काडून घेतल्यानंतर आवडत असल्यास खाण्याचा लाल रंग चोळून लावावा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF