अतिथी देवो भवः

अवचित किंवा आमंत्रण देऊन आलेल्या पाहुण्यांचे घरी स्वागत करणे हे प्रत्येक यजमानालाच आवडते. लग्न, वाढदिवस, प्रमोशन किंवा अगदी नववर्षाचे निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार चांगलाच होईल, ह्याबाबत यजमान दक्ष असतो. आपण आयोजित केलेली पार्टी पाहुण्यांच्या स्मरणात रहावी ह्याबाबत यजमानांची धडपड असते. नेटवर पार्टी आयोजनाच्या अनेक टीप्स आणि युक्त्या दिलेल्या आहेत. कुठलीही पार्टी किंवा समारंभ ठरवतांना आपले पैशाचे बजेट नक्की ठरवावे व त्यानुसारच खर्चाचे नियोजन करावे. ह्याबाबत आपल्या शेजारच्यांशी किंवा मित्रांशी तुलना न करणे श्रेयस्कर. पार्टी बजेटमध्ये पार पाडण्यासाठी http://entertaining.about.com/od/generalpartyplanning/a/budgetpartytips.htm ह्या लिंकवर अधिक माहिती उपलब्ध आहे. पार्टी ठरवतांना त्यासाठी लागणारे डेकोरेशन, पेपर प्लेट्स, खानपान ह्यावर अधिक खर्च होतो. परंतु थोडीशी कल्पकता वापरली तर हा खर्च फारसा डोईजड होत नाही. बाजारातून खरेदी करण्यापेक्षा आपल्याकडे असलेले ‘सेट’ आपण वापरु शकतो. पाहुणे खूप येणार असतील तर घरी असलेल्या विविध डिझाईन्स व रंगाच्या डीश ‘मिक्स मॅच’ करुन वापरणे सोयीचे आहे. आपल्या मित्रमैत्रिणींकडूनही तुम्ही काही काळापुरत्या त्या वापरायलाही मागू शकता. पार्टीचे डेकोरेशन घरी असलेल्या उपलब्ध सामानातूनच होऊ शकते. त्यानिमित्ताने मुलांच्या आणि पालकांच्याही सृजनशिलतेला वाव मिळतो. समारंभ किंवा पार्टीची आमंत्रणे छापण्यापेक्षा ई-मेलने पाठवावीत. आजकाल ‘ऑनलाईन इन्व्हीटेशन’ साईटसही उपलब्ध आहेत. मजकूर लिहीतांना आपल्याला मातृभाषेत ‘पर्सनल टच’ ही देता येतो. त्यामुळे इंटरनेटवरची आमंत्रणे हल्ली ‘कोरडी’ वाटत नाही. ह्या माध्यमाचा वापर केल्यामुळे आपला वेळ, पैसा, कागद आणि पोस्ट खर्च सगळ्याची बचत होते.

पार्टीच्या काही दिवस आधीपासूनच त्याचे प्लॅनिंग सुरु करावे. बाहेरुन खरेदी करायची असल्यास त्याची यादी तयार करुन मगच जावे. घर आणि टॉयलेट्सची सफाई दोन दिवस आधीच करुन ठेवावी करावी. पार्टीसाठी लागणारी भांडी किंवा कटलरीची जमवाजमव करुन ठेवावी. खराब न होणारे कोरडे पदार्थही आदल्या दिवशी तयार करुन ठेवता येऊ शकतात. जेवणाचा मेन्यू सुनियोजीत असावा व त्याप्रमाणे निवडणे, वाटणे, कापणे वगैरे तयारी आधीच तयार असावी. घरात लहान मुले नसतील तर टेबल मांडून ठेवले तरी चालण्यासारखे आहे. ह्या कामांमध्ये कुटूंबाला सामील करुन घेतल्यास गृहिणीवर ताण येत नाही. पार्टीच्या दिवशी पाहुणे येण्याच्या अर्धा तास आधी सर्व तयारी झालेली असावी. त्यामुळे पाहुणे आल्यावर हसतमुखाने त्यांचे स्वागत करता येते. आल्यावरही यजमानांनी घरकामात गुंतूंन न राहता पाहुण्यांकडे लक्ष द्यावे. लहान मुले येणार असल्यास त्यांच्यासाठी खेळणी किंवा काही ऍक्टीव्हीटीजचे आयोजन करुन ठेवावे. पार्टी रंगतदार करणा-या ह्या टीप्स वाचायचा असल्यास http://entertaining.about.com/od/generalpartyplanning/ General_Party_Planning_Advice.htm ह्या लिंकला जरुर भेट द्यावी.

परदेशाप्रमाणे आता भारतातही ‘थीम पार्टीज’ केल्या जातात. वय, प्रसंग आणि मोसम पाहून ह्या थीम्स (संकल्पना) ठरवल्या जातात. अगदी एक वर्षाच्या वाढदिवसापासून ते पंचवीस वर्षाच्या लग्नच्या वाढदिवसापर्यंत विविध थीम्स सांगणा-या साईट्स आपल्याला अनेक साईट्सवर वाचायला मिळतात. जसे की फ्लॉवर पार्टी, जंगल पार्टी, सिनेमा पार्टी, रॉक ऍंड रोल पार्टी, ट्रेक पार्टी … अश्या अनेक संकल्पना घेऊन पार्टीचे आयोजन करता येते. त्यासाठी लागणारे साहित्य, खेळ, खाऊ ह्याविषयी आपल्याला www.themepartiesnmore.com, www.party411.com/themes.html ह्या सारख्या अनेक साईटसवर माहिती उपलब्ध आहे. मोठयांप्रमाणेच लहान मुलांच्या पार्टीला तितकेच महत्त्व आले आहे. काही ठिकाणी ह्या पार्ट्या एखादी संकल्पना घेऊन जसे की ‘बार्बी डॉल’, ‘नॉडी’ किंवा एखादा रंग घेऊन साकारल्या जातात. पार्टी ठरली की वैशिष्टयपूर्ण आमंत्रणपत्रे पाठवता येतात. ह्या मधला मजकूर आणि रंगसंगती मुलांना साजेसा असावा. मुलांचे वय लक्षात घेऊन पार्टीचे आयोजन केले गेले पहिजे. त्यांना हिंडण्यापळण्यासाठी भरपूर मोकळी जागा असायला हवी. पार्टीचे डेकोरेशनही थोडेसे ‘ब्राईट’ आणि वैशिष्टयपूर्ण असावे. ह्यासाठी भरपूर फुगे, चेंडू, रंगीत पताका, टोप्या इत्यादी मुलांना आवडतील अश्या साहित्याचा वापर केला जाऊ शकतो. पार्टी ही केवळ खाण्यापिण्याची न ठेवता मुलांच्या सृजनशिलतेला वाव मिळेल अश्या प्रकारचे खेळ किंवा कार्यानुभव घेता येतात. ह्यामुळे मुले पुढच्या वेळेला येण्यासाठी अधिक उत्सुक असतील. मुलांच्या पार्टीसाठीचे पदार्थ आवडीचे, कमी तिखट आणि खाण्यासाठी सोपे असतील असेच असावेत. त्यामध्ये विविध रंगांचा समतोल साधल्यास मुले लवकर चट्टामटटा करतील. ‘रिर्टन गिफ्टस’ देतांनाही मुले त्याचा आवर्जून उपयोग करतील अशी असावी. मुलांच्या पार्टीचे आयोजन करतांना त्यांना संपूर्ण आयोजनात अगदी बजेटपासून ते पदार्थ ठरविण्यापर्यंत सामील करा. अश्याने तुमचे बजेट आटोक्यात राहील व मुलांनाही त्याचे भान राहील. शक्यतो जास्तीजास्त कामे त्या दिवसासाठी न ठेवता अगोदर करुन ठेवा. कीड्स पार्टी प्लॅनरच्या अनेक टीप्स आपल्याला www.kidspartyfun.com, www.amazingmoms.com ह्या साईट्सवर वाचायला मिळतात.

कुठल्याही पार्टीला जातांना यजमानांनी तसेच पाहुण्यांनीही काही शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. कुठल्याही पार्टीला जातांना छोटीशी का होईना यजमानांकरिता भेट घेऊन जावी. भेटवस्तू देतांना किंमत महत्त्वाची नसून त्याची उपयुक्तता आणि भावना महत्त्वाची आहे. पार्टीला आलेल्या पाहुण्यांची एकमेकांशी ओळख नसेल तर यजमानांनी त्यांची ओळख एकमेकांशी करुन देणे आवश्यक आहे. पार्टीला ड्रेसकोड असल्यास त्यानुसार पोषाख करुन जाणे योग्य ठरेल. पार्टीला गेल्यावर खाण्याची पथ्य असल्यास यजमानांना आगाऊ सुचना देणे चांगले. खातांना काटे-सुरी किंवा चॉपस्टीक्सचा वापर जमत नसल्यास नम्रपणे स्वीकार करुन चमचा किंवा हाताने खाणे योग्य आहे. सगळे पदार्थ एकाचवेळेस वाढून न घेता चवीने खाणे योग्य आहे. खातांना बोलणे किंवा सांडणे शिष्टाचाराचे नाही. पार्टी सोडून लवकर जायचे असल्यास दुस-यांसाठी व्यत्यय न आणता यजमानांच्या परवानगीने जाणे योग्य ठरेल. पार्टी संपल्यावर यजमानांना सांगून धन्यवाद देणे आवश्यक आहे. ह्या शिष्टाचारांविषयी आपल्याला www.rediff.com/getahead/2006/dec/04party.htm येथे वाचायला मिळते.

वीस वर्षापूर्वी ‘पार्टी कल्चर’ नव्हते. आनंदाच्या प्रसंगी यजमान पाहुण्यांना आपल्या घरी जेवायला बोलवत असत. जेवणही पारंपारिक घरगुती पध्दतीने केले जात असे त्यामुळे अश्या प्रसंगी जिव्हाळ्याचे नाते तयार व्हायचे. काळानुसार पार्टीचे कंत्राट बाहेर दिले जात असल्यामुळे त्यातील ‘घरगुती टच’ कधीच नाहीसा झाला आहे. परंतु थोडे परिश्रम घेतल्यास आणि कल्पकता दाखवल्यास आपल्याही पार्टीला आपलेपणाचा ओलावा येऊ शकतो. हॅपी पार्टींग !