पोळी-भाकरी मुख्यपान

बाजरीची भाकरी


साहित्य - बाजरीचे पीठ, मीठ, पांढरे तीळ

कृती - बाजरीचे पीठ व मीठ एकत्र करून पीठ भिजवावे. त्याची भाकरी थापून तव्यावर टाकावी. जरा गरम झाली की पाणी फिरवावे. पाणी सुकले की भाकरी उलटावी. जरावेळाने उलथणे फिरवून पहावे. भाकरी तव्यावरून सुटली की तवा उतरवून गॅसवर शेकावी. छान पदर सुटेल. ही भाकरी पांढरे तीळ लावूनही करता येते.

भगरीचीभाकरी


साहित्य - भगर दळून आणावी ,भिजवण्यासाठी पाणी, चवीपुरते मीठ

कृती - चवी पुरते मीठ घालून भगरीचेपीठ भिजवावे. थोडे पीठ भुरभुरुन भाकरी थापावी. तव्यावर नेहमी भाकरी भाजतो तशी भाजावी. भाकरी करतांना तव्यावर टाकल्या वर पाणी लावतात तेही लावावे. उलटली की मोठ्या आचेवर भाजावी. ही भाकरी बटाटा उकडून तुपाची फोडणी जिरे घालून केलेल्या भाजी सोबत उपासाला चालते.

भगर थंड गुणधर्माची आहे.  नवरात्रात महिला उपास करतात तेव्हा पटकन आणि पोटभरीची होणारी आहे. ह्यामुळे साबुदाणाही टाळता येतो.

उकड काढून केलेली भाकरी


साहित्य - बाजरीचे पीठ, मीठ व तेल

कृती - २ वाटया बाजरीचे पीठ असेल तर एक किंवा दीड वाटी पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात थोडे मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात पीठ घालून उलथण्याच्या टोकाने ढवळावे. मंदाग्नीवर वाफ येऊ द्यावी. नंतर खाली उतरावे. परातीत काढून चांगले मळावे. मोहन अजिबात घालू नये. पोळपाटावर प्लॅस्टिक घालून लाटण्याने हलके लाटावे व पोळया कराव्या व तव्यावर शेकून गरमच वाढाव्या. तांदूळाच्या पीठाची, ज्वारीच्या पीठाची किंवा ज्वार बाजरी एकत्र केलेल्या पीठाची भाकरी, वरील बाजरीच्या भाकरीप्रमाणे करावी. नाचणीच्या पीठाची भाकरी करताना पीठ काढत भिजवावे, म्हणजे भाकरी थापतांना सोपे जाते. बाकी कृती बाजरीच्या भाकरीप्रमाणे करावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF