मधल्या वेळचे पदार्थ मुख्यपान

बीटरूट उत्तपा

साहित्य - मोठे बीट, तीन वाटया रवा, अर्धी वाटी कणीक, एक चमचा तिखट, एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आमचूर, दोन कांदे, एक चमचा मैदा, मीठ, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर.

कृती - बीटरूट उकडून घ्यावे, कांदा अगदी बारीक चिरावा. कणीक व रवा कोरडाच भाजून घ्यावा. गार होऊ द्यावा, नंतर सर्व एकत्र करून पाणी टाकून पीठ तयार करावे. सपाट तव्याला तेल लावून त्यावर डावाने थोडे पीठ घालून उतप्पा घालावा. ओल्या डावाने पीठ सारखे करावे, झाकण ठेवावे, नंतर झाकण काढून कडेने थोडे तेल सोडावे व उलटवावे. दोन्ही बाजूने लालसर झाल्यावर काढावा व चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

मुगाच्या डाळीचा डोसा

साहित्य - १ वाटी तांदूळ, ३ वाटया मूगडाळ, मिरच्या, आले, २ ते ४ कांदे, थोडेसे तेल, मीठ.

कृती - कोमट पाण्यामध्ये तांदूळ व मूगाची डाळ साधारणपणे चार ते पाच तास भिजू द्यावी. त्यानंतर ती मिक्सरमधून किंवा रगडयाने बारीक करून घ्यावी. पीठ सरसरीत असू द्यावे. फार पातळ वा फार जाड नसावे. चवीपुरते मीठ घालून सारखे करावे. आवडत असल्यास त्यातच आले व मिरची बारीक करून घालावी. कांदा बारीक चिरून घालावा. नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून त्यावर डोसे करून दोन्ही बांजूनी खमंग परतावे. छान लालसर जाळी पडते. ओल्या नारळाची चटणी, साँस किंवा कोथिंबीरीची चटणी असे व्यंजन खाताना जोडीला द्यावे.

मिक्स पिठाची धिरडी

साहित्य - १ वाटी ज्वारी पीठ, १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मक्याचे पीठ (मक्याच्या रोटीसाठी जे दुकानात मिळते ते), तीळ दोन चमचे, ओवा अर्धा चमचा, लसूण, आले व जिरे पेस्ट १ चमचा मीठ, मिरची पावडर, हळद पाव चमचा.

कृती - सर्व पीठे व इतर वस्तू एकत्र भिजवून पळीने ओतता येईल इतपत पातळ भिजवणे, नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी खमंग परतणे. खाताना गोड चटणी, दही व कांद्याबरोबर खाणे.

तांदुळाच्या पिठाची उकड

साहित्य - १ वाटी तांदूळाचे पीठ, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, ५ हिरव्या मिरच्या, साखर अर्धा चमचा, फोडणीसाठी तेल २ चमचे व जिरे-मोहरी एक चमचा प्रत्येकी, कढीलिंब १ डहाळी, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, वरून घेण्यासाठी कच्चे गोडेतेल २ चमचे.

कृती - मिरच्यांचे बेताच्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी टाकावी. कढीलिंब, मिरच्यांचे तुकडे टाकावेत व नंतर त्यात पाणी घालावे. फोडणीत हळद घालू नये. नंतर त्यात ताक घालावे. त्यानंतर तांदूळाचे पीठ पाण्यात कालवून घ्यावे व ते पातेल्यात ओतावे व डावाने व्यवस्थित ढवळावे मग पातेले खाली घेऊन डावाने त्याच्या गुठळ्या मोडाव्यात व परत बारीक गॅसवर ठेवून ४-५ वाफा आणाव्यात. प्रत्येक वाफेनंतर उकड खाली घेऊन ढवळावी. खायला त्यावर कोथिंबीर व कच्चे तेल घालावे.

रवा ढोकळा

साहित्य - दोन वाटी बारीक रवा, दोन वाटी दही, एक छोटा चमचा खायचा सोडा, चवीपुरते मीठ.

फोडणीसाठी - एक चमचा मोहरी, अर्धी वाटी तेल, थोडेसे जिरे.

कृती - रवा, दही, मीठ, आणि खायचा सोडा एकत्र करून जाडसर मिश्रण तयार करावे. हे मिश्रण अर्धा तास भिजत ठेवावे. अर्धा तासानंतर ढोकळा पात्रात हे मिश्रण टाकून १० मिनिटे गॅसवर ठेवावे. ढोकळयाचे मिश्रण ताटात टाकताना ताटाला तेल लावावे म्हणजे ढोकळा चिकटत नाही. ढोकळयाला वरतून मोहरी व जिर्‍याची फोडणी द्यावी. नारळाची चटणी किंवा सॉस बरोबर ढोकळा छान लागतो.

रवा ढोकळा करायच्या वेळेस मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, गाजर, मिरची देखील टाकू शकतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF