चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

पेरुची कोशिंबीर


साहित्य - २ मोठे पिकलेले पिवळे पेरु, चवीनुसार मीठ, साखर १ चमचा, दही १ लहान वाटी

कृती - पेरु धुवून स्टेनलेसस्टीलच्या सुरीने उभा कापून त्यातला गर ऍ़ल्युमिनीयमच्या रोवळीने गाळावा. गाळताना त्यावर थोडे मीठ व ताक घालावे. बिया फेकून द्याव्यात. बाहेरच्या दळाचे चिंचोक्याएवढे तुकडे करावे. पेरु वास दरवळेल इतका पिकलेला असावा. कच्चा असेल तर कोशिंबीर तूरट होते. स्टेनलेसच्या पात्याची विळी किंवा सूरी नसेल तर पाटयावर उभा वरवंटयाने ठेचावा. त्याची छकले झाली की चमच्याच्या कडेने त्याचे फोडीसारखे बारीक तुकडे करावेत. अथवा पेरु भाजून घ्यावा व नंतर त्याच्या बिया काढाव्यात. त्यात साखर-मीठ-मिरची घालावी. वाढण्याच्या वेळी त्यात दही घालून कोशिंबीर नीट कालवावी. या कोशिंबीरीला वेलदोडयाचा वास चांगला लागतो त्यामुळे आवडत असल्यास वेलदोडा वाटून घालावा.

मुळयाची कोशिंबीर (चटका)


साहित्य - किसलेला मुळा १ लहान वाटी, गोड दही १ लहान वाटी, भिजलेली चणेदाळ ३- ४ चमचे, मीठ चवीप्रमाणे साखर १/४ चमचा, हिरवी मिरची - एक किंवा दोन (मिठात चुरून किंवा वाटून), २-३ चमचे धुवून चिरलेली  कोथिंबीर, फोडणीसाठी २ चमचे तेल व हळद, हिंग, मोहरी प्रत्येकी १ चमचा.

कृती - चणेदाळ रवाळ वाटावी किंवा कुटावी. त्यात किसलेला मुळा, दही, मीठ, मिरची, साखर, कोथिंबीर वगैरे सर्व पदार्थ मिसळावेत. तेलाची फोडणी करून ती शेवटी त्यात मिसळावी.

पिकलेल्या केळीचं रायतं


साहित्य - काळ्या सालीची ४-५ केळी, २-३ चमचे घट्ट दही, १ चमचा साखर, मीठ, मोहरी, जिरे, फोडणीसाठी तुप

कृती - ४-५ केळीची सालं काढून घ्यावीत. नंतर ती मऊसर कुस्करुन घ्यावीत, त्यात घट्ट दही, साखर आणि चवीनुसार मीठ घालावे, वरून तुपातील मोहरी, हिंग, हळदीची चरचरीत फोडणी घालावी. केळी कुस्करुन फार वेळ ठेवल्यास काळी पडतात, म्हणून हे रायते केल्यावर ताबडतोब संपवावे. (केळ हे अत्यंत पौष्टिक असून सारकही आहे. हिरव्या सालीच्या केळीपेक्षा पिवळया सालीची केळी अधिक चांगली. कच्चं केळ कधीही खाऊ नये.)

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF