पौष्टिक पदार्थ मुख्यपान

डिंकाचे लाडू


साहित्य - २ वाटया डिंक, ३ वाटया सुक्या खोबर्‍याचा कीस, २ वाटया खारकाची पूड, आर्धी वाटी खसखस, १ वाटी कणिक, २ वाटया तूप, ३ वाटया गूळ किसून, १ वाटी पिठीसाखर, १ जायफळाची पूड.

कृती - डिंक जाडसर कुटावा, खारका कुटून बारीक पूड करावी. बदाम सोलून पूड अथवा काप करावेत, खसखस गुलाबी रंगावर भाजून तिचा बारीक कूट करावा. कणिक तूपावर खमंग भाजावी, खोबरे किसून भाजून हाताने कुस्करून घ्यावे. कढईत तूप गरम करूल थोडा थोडा डिंक घालून फुलवून तळून घ्यावा. परातीत तळलेला डिंक, खारीक पूड, बदाम काप, कुटलेली खसखस, जायफळ पूड, खोबरे सर्व एकत्र चांगले कालवावे. त्यात तीन वाटया किसलेला गुळ व साखर मिसळावी. फार कोरडे वाटले तर २ चमचे साजूक तूप गरम करून घालावे व मध्यम आकाराचे लाडू वळावेत.
वरील साहित्यात २०-२२ लाडू होतात.

अळीवाचे लाडू


साहित्य - २ नारळ खरवडून, ५० ग्रॅम अळीव, अर्धे जायफळ किसून, २ वाटया गूळ चिरून, अर्धी वाटी साखर, ५-६ वेलदोडयांची पूड.

कृती - २ नारळ खरवडून घ्यावेत, अळीवात बारीक खडे असतात, अळीव स्वच्छ निवडून नारळामध्ये मिसळून एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवावे. अळीव नारळाच्या ओलसरपणामुळे फुलून आले की त्यात जिरलेला गूळ व साखर घालावी व गॅसवर मंद आचेवर शिजायला ठेवावे. मधून मधून ढवळावे, लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागते. गॅस बंद करून मिश्रण कोमट असतांना तूपाचा हात लावून लाडू वळावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १५ लाडू होतात. हे लाडू जास्त टिकत नसल्याने एकावेळी जास्त प्रमाणाचे करू नयेत.

दही मेथीची चटणी


साहित्य - मेथ्या १ चमचा, तेल १ चमचा, दही १ वाटी, साखर १ १/२ चमचा, मीठ १ १/२ चमचा

कृती - मेथ्या तेलावर परतुन घ्या व लाल होऊ द्या. पोळपाट-लाटणे वर किंवा मिक्सर वर बारिक करा. भरडलेल्या मेथीत दही, साखर आणि मीठ मिसळा. आवडत असेल तर कोथिंबीर बारिक चिरून टाका. ही चटणीपराठे, खाकरे, वरण भात, खिचडी, बटाटे वडा, उडीद वडा आणि चकली बरोबर छान लागते.

फायदे -

  • दह्यामुळे लेक्टिक एसिड मिळते.
  • मेथ्या पाचक व वातहारक आहेत.
  • मेथी वायूला शांत करणारी कफनाशक व ज्वरनाशक आहे .
  • मेथी कृमी, शूळ, गोळा, संधिवात, कंबरेचे दुखणे, चमक येणे इ.  विकारांवर गुणकारी असते .
  • मेथी वातांवर अत्यंत उत्तम समजली जाते.
  • सुश्रुत मेथीला रक्त शुद्ध करणारी समजतात.
  • मेथी  रसधातूला बलवान बनवते.
  • मेथी स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असते.

मेथीच्या सेवनाने स्त्रियांचा अशक्तपणा दूर करून त्या सुदृढ बनतात व त्यांचा जठराग्नी प्रदीप्त होतो.  मेथी आमटी-भाजीच्या फोडणीत नेहमी वापरली जाते. वातनाषक औषधी म्हणून मेथी चा उपयोग केला जातो. पाण्याचा निचरा होणारी व काळी जमीन पण. मेथीला अनुकूल असते. मेथीची लागवड भारतात सर्वत्र होते. मेथीच्या भाजीत रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. राजस्थानात मेथी दाण्याचीही भाजी करतात. मेथी मध्ये जे तेल असते त्याचा वात नाडी वर सुयोग्य परिणाम होतो. मेथ्याचे लाडू, बेसन घालून भाजी, लसूण फोडणी घालून केलेली तुरीच्या डाळीचे वरण असे भरपूर पर्यत मेथी  सोबत  उपलब्ध आहेत. शिवाय आजकाल हॉटेल्स मध्ये सर्रास कसुरी मेथी चा वापर होतो. मेथी ची एक खास चव आहे तो तिचा पानातला कडवट पण पदार्थांना वेगळीच लज्जत आणतो. 

डॉ. संध्या सुखात्मे


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF