पक्वान्ने मुख्यपान

गुळाची पोळी


साहित्य - अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, ५-६ वेलदोडयांची पूड, १ चमचा खोबर्‍याचा कीस, अडीच चमचा डाळीचे पीठ, २ वाटया कणीक, १ वाटी मैदा, २ लहान चमचे तूप.

कृती - कणीक, मैदा व अडीच चमचा डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गुळ किसून घ्यावा. तीळ, खसखस व खोबर्‍याचा किस भाजून घ्यावे व नंतर कुटून घ्यावे. अडीच चमचा डाळीचे पीठ थोडया तुपावर चांगले भाजून घ्यावे. वेलदोडयांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्यावे. नंतर कणकेच्या दोन लाटया जरा लाटून घ्याव्यात. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर खमंग भाजावी. गुळाच्या पोळया गारच चांगल्या लागतात, म्हणून अगोदरच करून ठेवाव्यात. त्या थोडयाशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.

पुरण पोळी

साहित्य - १ किलो हरभर्‍याची डाळ, अर्धा किलो उत्तम गूळ, अर्धा किलो साखर, १०-१२ वेलदोडयांची पूड, थोडेसे केशर, पाव जायफळाची पूड, १ फूलपात्र रवा, १ फूलपात्र कणीक, २ फूलपात्री भरुन मैदा, १ वाटी तेल, चवीपुरते मीठ.

कृती - हरभर्‍याची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून प्रेशरकुकरमध्ये शिजत घालावी. शिजतांना त्यात थोडे तेल व हळद घालावी. डाळ चांगली शिजली की टोपलीत उपसून टाकावी. सर्व पाणी निथळले की डाळीत चिरलेला गूळ व साखर घालून डाळ पुन्हा गॅसवर शिजवावी. पूरण चांगले घटृट शिजले पाहिजे. डाव पुरणात न पडता उभा राहिला म्हणजे पुरण शिजले असे समजावे. नंतर शिजलेल्या डाळीत पाव चमचा मीठ, जायफळ, वेलदोडयाची पूड व केशर घालावे व रवा भिजत घालावा. नंतर त्यात मैदा, कणीक व मीठ घालून पीठ जरा सैलसर भिजवावे. नंतर त्यात थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी. साधारणपणे पोळीच्या कणकेपेक्षा ही कणीक सैलसर असते. नंतर ह्या कणकेच्या पारीत पुरण भरून हलक्या हाताने तांदुळाच्या पिठीवर पोळया लाटाव्यात. पोळी तव्यावर टाकताना लाटण्यावर गुंडाळून टाकावी व दोन्हीकडून लालसर डाग पडेपर्यंत भाजावी.

टीप - पूरणपोळी वाढताना त्यावर भरपूर साजूक तूप वाढतात. कहींना दूधाबरोबर पूरणपोळी खायला आवडते.

रताळ्याचे पुरण

साहित्य - पाव किलो रताळी, पाव किलो साखर, विलायची पूड, दोन वाट्या कणिक, पोळी लाटण्यासाठी पीठ .

कृती - रताळी उकडून घ्या. कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून थंड झाल्यावर साले काढा. किसणी वर लगदा करून त्यात साखर घालून शिजवा. पुरण शिजवताना जसा घट्ट गोळा होतो तसे घट्ट होई पर्यंत हलवत रहा .घट्ट गोळा थंड होऊ द्या. विलायची पावडर घाला. कणिक नेहमी सारखी भिजवून गोळा तयार करा. कणकेची पारी तयार करून त्यात पुरण भरा. पीठ पोळपाटावर पसरवून हलक्या हाताने पोळी लाटा. निर्लेप तव्यावर खरपूस शेका. चांगले तूप वरती सोडून गरम खायला द्या.

रताळी पिष्टमय पदार्थ आहे. या मधून भरपूर उष्मांक मिळतात. नेहमीच्या हरभरा डाळीचे पुरणपेक्षा चव वेगळी आणि छान लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF