चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

कैरीचे लोणचे


साहित्य - दीड किलो लोणच्याच्या कडक कैर्‍या (साधारण मध्यम आकाराच्या १३-१४ कैर्‍या), २५० ग्रॅम मीठ, २ चमचा मेथीचे दाणे, ४ चमचे हळद, १० ग्रॅम हिंग खडे, ८ चमचे तिखट, १०० ग्रॅम मोहरीची डाळ, २५व ग्रॅम गोडेतेल, फोडणीसाठी मोहरी ३ चमचे.

कृती - प्रथम मीठ भाजून घ्यावे म्हणजे कैर्‍यांना फार पाणी सुटत नाही.  कैर्‍यां धुवून, पुसून घ्याव्यात. कैरीच्या बेताच्या आकाराच्या फोडी कराव्यात व त्यांना मीठ व हळद लावून ठेवावे. ३-४ चमचे तेल एका पातेल्यात घालून त्यात हिंग व मेथी तळून घ्यावी, नंतर त्याच तेलात हळद परतून घ्यावी. पातेले खाली उतरवून त्यात तिखट घालून जरा हलवावे. हिंग व मेथी कुटून घ्यावी, नंतर उरलेल्या तेलाची फोडणी करून घ्यावी. स्टीलच्या पातेल्यात किंवा परातीत मोहरीची डाळ, मीठ, हळद, तिखट, हिंग, मेथीची पूड व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात, त्यावर गार झालेली फोडणी ओतून लोणचे कालवावे व बरणीत भरावे. लोणच्याच्या फोडींवर तेल राहील इतके असावे.

लिंबाचे लोणचे


साहित्य - १० पिवळी लिंबे (मध्यम आकाराची), १ चमचा हळद, १ चमचा मेथी, २ चमचे तिखट, १ चमचा हिंग, ८ चहाचा चमचे मीठ, १ पळी फोडणीसाठी तेल.

कृती - प्रथम थोडया तेलावर मेथी परतून लालसर तळून घ्यावी. नंतर बारीक वाटून घ्यावी उरलेल्या तेलाची मोहरी घालून फोडणी करावी. एका थाळीत हिंग, हळद, तिखट एकत्र करून त्यावर ही फोडणी ओतावी. फोडणी गार होऊ द्यावी. एका लिंबाच्या आठ किंवा सोळा फोडी करून ठेवाव्यात व त्यांना मीठ चोळून ठेवावे. नंतर मेथीपूड व कालवलेले हिंग, हळद, तिखट इत्यादींचे मिश्रण व लिंबाच्या फोडी एकत्र करून बरणीत भरून ठेवावे.

मिरच्यांचे लोणचे


साहित्य - अर्धा किलो मिरच्या, अर्धी वाटी मोहरीची डाळ, २ चहाचे चमचे मेथी, दीड वाटी मीठ, हिंगाची पूड ४ चमचे, हळद ३ चमचे, २ वाटया लिंबाचा रस,१ वाटी उकळून गार केलेले पाणी, १ वाटी तेल व फोडणीचे साहित्य.

कृती - मिरच्यांचे अर्धा इंच लांबीचे मधे चीर देऊन एकसारखे तुकडे करावेत. लिंबाचा रस काढून घ्यावा. १ टेबल स्पून तेलात मेथी गुलाबी रंगावर परतून घ्यावी व त्यातच हिंगाची पूड परतून दोन्ही एकत्र करून पूड करावी. मिक्सरमध्ये मोहरीची डाळ, लिंबाचा रस व हळद घालून एकजीव होईपर्यंत घुसळावे. उकळून गार केलेल पाणी थोडे थोडे घालून परत मोहरी फेसून घ्यावी. मोहरी फेसून पांढरी व हलकी झाली पाहिजे. चिरलेल्या मिरच्यांचे तुकडे, मेथी, हिंगाची पूड, फेसलेली मोहरी, लिंबाचा रस व मीठ एकत्र कालवावे. १ वाटी तेलाची फोडणी गार करून त्यावर घालावी व नंतर बरणीत भरावे.

टीप - वरील मिरच्यांना मुरायला ७-८ दिवस लागतात. तोपर्यंत बरणीतले लोणचे रोज तळापासून हलवावे. मिरच्या चिरण्याऐवजी मिक्सरमधून जाडसर कुटून वरील मसाला मिसळावा व लोणचे करावे. हे लोणचे लवकर मुरते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF