शितपेये मुख्यपान

कैरीचे पन्हे



साहित्य - ४-५ मोठया कैर्‍या, चवीनुसार मीठ, ५ वाटया गूळ, वेलचीपूड.

कृती - कैरीची साले काढून फोडी कराव्यात, त्या कुकरमध्ये स्टीलच्या भांडयात ठेवून वाफवून घ्याव्यात. नंतर ह्या फोडी पुरणयंत्रातून किंवा गाळण्यातून गाळून घ्याव्यात, त्यात मीठ व गूळ घालून मिश्रण सारखे करावे. वेलचीपूड घालावी, पन्ह्याचा गर आता आता तयार झाला. प्यायला देतेवेळी ४-५ गर घेऊन त्यात थंडगार पाणी घालून, व चवीपूरते मीठ घालून सर्व नीट हलवून द्यावे.

 

कच्च्या कैरीचे पन्हे



साहित्य - ४-५ मोठया कैर्‍या, चवीनुसार मीठ, ३ वाटया साखर, वेलचीपूड.

कृती - कैर्‍यांची साले काढून त्या स्टीनलेसस्टीलच्या किसणीवर किसून घ्याव्यात. नंतर थंडगार पाण्यात हा कीस टाकून, कुस्करून घ्यावा म्हणजे कैरीचा आंबटपणा पाण्यात उतरतो. त्यात अंदाजे मीठ व साखर घालावी व साखर विरघळेपर्यंत मिश्रण ढवळावे. नंतर गाळण्यातून गाळून घ्यावे व वेलचीपूड टाकून पिण्यास द्यावे.

टीप - कैर्‍यांचा आंबटपणा कैरीच्या जातीवर अवलंबून असतो. त्यानुसार साखरेचे प्रमाण बदलावे लागेल.


 

कलिंगडाचे सरबत



साहित्य - १ मध्यम आकाराचे लाल कलिंगड, १ पॅक व्हॅनिला आईस्क्रिम, २-३ चमचे रोझ सिरप.

कृती - कलिंगडाच्या बिया काढून त्याचे तुकडे करावेत (फक्त लाल भागाचे) नंतर ते मिक्सरमधून काढावेत व त्याचा छानसा रस गाळून घ्यावा. त्यात आईस्क्रिम घालून ठेवावे. रस छान गोड नसेल तर त्यात रोझ सिरप घालावे. हे सिरप फक्त गोडव्यासाठी व रंगासाठी वापरावे. जास्त घालू नये, कलिंगडाच्या चवीला ते मारक ठरू नये, इतकेच घालावे. लोकांना देतांना नीट ढवळून द्यावे. आईस्क्रिम व कलिंगडाचा रस एकजीव करून मग ते प्रत्येकाला द्यावे.


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF