चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

कारळ्याची चटणी


साहित्य - निवडून धुवून वाळविलेले कारळे १ वाटी, अर्धी वाटी निवडलेले पांढरे तीळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, ४-५ लसणीच्या सोललेल्या पाकळया.

कृती - प्रथम तीळ व कारळे वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावेत. ते एकत्र करून त्यात तिखट, मीठ व लसूण पाकळया घालाव्यात. सर्व खलबत्यात एकत्र करून जाडसर कुटावेत, ही चटणी पुष्कळ दिवस टिकते. भाकरीबरोबर तेल घालून विशेष चांगली लागते.

दोडक्याच्या शिरांची हिरवीगार चटणी


साहित्य - १ वाटी दोडक्याच्या शिरा, १ वाटी कोथिंबीर चिरून, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मीठ, १ लिंबाचा रस, १ चमचा साखर.

कृती - दोडक्याच्या शिरा काढून घ्या. हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, जिरे व कोथिंबीर मिक्सरवर वाटा. लिंबूरस व दोडक्याच्या शिरा घालून गुळगुळीत चटणी वाटा. पुदिना किंवा लसूण पाकळया आवडत असल्यास घाला.

हिरव्या मिरच्यांची दह्यातील चटणी


साहित्य - ५-६ हिरव्या मिरच्या, मीठ, १ चमचा जिरे, २ चमचे सायीचे दही व ४ चमचे साधे दही.

कृती - हिरव्या मिरच्या मंद गॅसवर भाजून घ्या. दगडी खलात किंवा मिक्सरमध्ये मीठ, जिरे घालून चांगल्या बारीक करून, गोळा करून काढा. काचेच्या भांडयात सायीचे व साधे दही घालून त्यात मिरचीचा गोळा नीट कालवा. खमंग चटणी तयार होते. ही चटणी साबुदाण्याच्या खिचडीबरोबर छान लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF