आमटीचे प्रकार मुख्यपान

कटाची आमटी

साहित्य - हरभरा डाळ, तिखट, मीठ, गूळ, कडीलिंब, लवंग, दालचिनी, थोडे जिरे, खोबरे, फोडणीचे सामान, चिंच.

कृती - पूरण शिजवून घेतल्यानंतर खाली जे पाणी राहते, त्याला कट असे म्हणतात. कट फार दाट असेल तर त्यात पाणी घालून सारखा करावा. नंतर त्यात तिखट, मीठ, गूळ, कडीलिंब घालावा. चिंच कोळून घालावी. लवंग, दालचिनी, थोडे जिरे, खोबरे वाटून त्यात घालावे. खोबर्‍याचा तुकडा विस्तवावर भाजून घ्यावा म्हणजे आमटी खमंग लागते. नंतर नेहमीप्रमाणे हिंग, मोहरी, व हळद घालून तेलाची फोडणी करावी. त्यावर सारखा केलेला कट घालावा. ह्या कटाच्या आमटीत शेवग्याच्या शेंगाही घालतात.

कैरीचे सार

साहित्य - १ मोठी उकडलेली कैरी, १ मध्यम नारळाचे दूध, २ चमचे तांदूळाचे पीठ, २ टेबलस्पून साखर, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, कडीलिंब.

कृती - उकडलेल्या कैरीत पाणी घालून सारखे करावे. थोडया पाण्यात तांदळाचे पीठ कालवून ते ओतावे. नंतर त्यात नारळाचे दूध, वाटलेल्या मिरच्या, मीठ व साखर घालावी. नंतर चांगली उकळी आणावी. पळीभर तेलाची हिंग-मोहरी घालून फोडणी करावी व साराला द्यावी.

कढी

साहित्य - ८-१० वाटया बेताचे आंबट ताक, लाल मिरच्या, आल्याचा तुकडा, २ टेबलस्पून डाळीचे पीठ, मीठ, सूपारी एवढा गूळ, २-३ लंवगा, १ दालचिनीचा तुकडा, १ चमचा मोहरी.

कृती - मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडे कडिलिंब व कोथिंबीर घालावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ लाल मिरच्या घालून तुपाची फोडणी द्यावी. हि कढी दाट असते.

सोलकढी

साहित्य - १०-१५ आमसुले, १/२ नारळाचे दूध, मीठ, तिखट, साखर, थोडे वाटलेले जिरे.

कृती - ४ कप पाण्याला उकळी आणावी व त्यात आमसुले तासभर भिजत घालावीत. नारळाचे दूध काढावे. आमसुले भिजत घातलेले पाणी गार झाले की त्यातून आमसुले काढून टाकावीत, त्यात नारळाचे दुध, मीठ, साखर, अगदी थोडे तिखट व वाटलेले जिरे घालावीत, वरून हिंग-जिरे घालून तुपाची फोडणी द्यावी. हे सार पुन्हा गॅसवर ठेवून गरम करायचे नाही.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF