चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

कवठाची चटणी


साहित्य - ४५० ग्रॅम पिकलेल्या कवठाचा गर, ४५० ग्रॅम साखर, ११५ ग्रॅम मनूका, ५५ ग्रॅम लाल मिरच्या (५-६), दोन लसणीचे कांदे, १ मोठा आल्याचा तुकडा (२५ ग्रॅम), ५ कप व्हिनीगर व मीठ चवीनुसार.

कृती - कवठे फोडून, म्याचा गर एकत्र करून तो मोजून घ्यावा. अर्धे व्हिनीगर बाजूला ठेवून, उरलेल्या व्हिनीगरमध्ये कवठाचा गर घालून, हाताने खूप कुस्करून घ्यावा व नंतर गाळणीने गाळून घ्यावा. मनुका स्वच्छ करून घ्यावा, मिरची, आले, लसूण थोडे व्हिनीगर घालून बारीक वाटून घ्यावे. अर्धे व्हिनीगर बाजूला ठेवले होते ते व साखर एकत्र गॅसवर ठेवावे. त्यात वाटलेले आले-लसूण-मिरच्या व मीठ घालून ढवळावे. नंतर त्यात कवठाचा गाळलेला गर घालावा व मिश्रण जरासे घट्ट होईपर्यंत शिजवावे. नंतर खाली उतरवून त्यात मनुका घालाव्यात व बाटलीत भरून ठेवावे.

आमसुलाची चटणी


साहित्य - १०-१२ आमसुले, २ चहाचे चमचे व्हिनिगर, अर्धा चमचा बेदाणा, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा मीठ, ५-६ काळे मिरे, लहानसा आल्याचा तुकडा, १/४ चमचा लाल तिखट, ३ चमचे साखर.

कृती - वरील सर्व साहित्य एकत्र करून पाटयावर बारीक चटणी वाटावी. ही चटणी ७-८ दिवसच टिकते.

उडीद डाळ चटणी


साहित्य -  दोन चहाचे चमचे उडीद डाळ, ३-४ कढीपत्ता पाने,  एक चमचा तेल,  एक वाटी दही,  चवीपुरती साखर आणि मीठ.

कृती - उडीद डाळ  तेलात तळून लालसर होऊ द्यावी. त्यात कढीपत्ता पाने हिरवा रंग कायम ठेवत कुरकुरीत तळावीत. कढीपत्ता पाने  आणि उडीद डाळ मिक्सर मध्ये भरडून घ्यावी. मीठ, साखर आणि भरडलेली डाळ दह्यात मिसळावी. एक तास चटणी मुरु द्यावी नंतर खावी. 

ही चटणी चवीला छान  लागते. उडीद डाळीत प्रोटीन्स भरपूर असतात शिवाय ती मासपेशींना मजबुती देते. कढीपत्ता विटामिन अ ने भरपूर आणि सुवासिक आहे. ही  चटणी कोणत्याही डाळीच्या वड्या सोबत फार छान लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF