मांसाहारी मुख्यपान

खिमा मटार

साहित्य - अर्धा किलां खिमा, पाव किलो मटार, ३ कांदे बारीक चिरून, १०-१२ लसूण पाकळया व १ इंच आले वाटून, ३ मोठे टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, २ चमचे धन्याची पावडर, मुठभर चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी तेल, चवीनुसार मीठ.

कृती - खिमा स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवावा. टोमॅटो उकळत्या पाण्यात घालून साल काढून बारीक चिरून घ्यावेत. कांदे किसून घ्यावेत. प्रेशरकुकरमध्ये तेल तापवावे व त्यामध्ये किसलेला कांदा घालावा. कांदा लाल परतला गेला की. वाटलेले आले, लसूण टाकावे, हळद, तिखट, गरम मसाला, पावडर, धन्याची पावडर घालावी व धुतलेला खिमा टाकावा. खिमा चांगला लाल रंगावर परतावा. खिमा परतला गेला की मटार धुवून टाकावेत. थोडे परतून चिरलेला टोमॅटो टाकावा व चवीनुसार मीठ आणि ३ वाटया पाणी घालावे. प्रेशर कुकर बंद करून गॅसवर ठेवावा. पूर्ण प्रेशरवर आल्यावर गॅस बारीक करून ३ मिनिटे ठेवावा व गॅस बंद करावा. प्रेशरकुकर थंड झाल्यावर खिमा मटार काढून घ्यावेत किंवा प्रेशरकुकरमध्ये न शिजवता जाड बुडाच्या पातेल्यात आधण ठेवून शिजवला तरी चटकन शिजतो.

करंदी मसाला

साहित्य  - २ वाटया करंदी, १ मोठा कांदा, १ वाटी ओले खोबरे, ७-८ लसूण पाकळया, अर्धा चमचा हळद, १ चमचा मिरचीपूड, २-३ लंवगा, १ इंच दालचिनी, ५-६ मिरे, २ मसाला वेलची, १ चमचा खसखस, अर्धा चमचा शहाजिरे, चिंच, मीठ व तेल.

कृती - करंदी साफ करून कोरडी करावी. कांदा बारीक चिरावा, मसाल्याचे सर्व साहित्य तेलात भाजून घ्यावे. आले व ३-४ लसूण पाकळया एकत्र वाटाव्यात. चिंच भिजवून कोळ तयार करावा. भाजलेल्या मसाल्याचे साहित्य कांदा व खोबर्‍यासहीत वाटावे. कढईत तेल तापवून त्यात उरलेली लसूण ठेचून घालावी. जरा परतून रंग बदलल्यावर त्यात आले लसूनची पेस्ट घालून थोडावेळ परतावी व उरलेले साहित्य घालावे व पाव कप पाणी घालून करंदी शिजू द्यावी. करंदी मसाला जरा दाटसर असावा. पाणी फार घालू नये. कैरीच्या सिझनमध्ये चिचे ऐवजी कैरी वापरावी.

चिकन मसाला

साहित्य - १ चिकन (अंदाजे १ किलो वजनाचे), अर्धा किलो कांदे, अर्धा किलो टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून साल काढून चिरून, १ वाटी दही, २ मोठे चमचे खसखस भिजवून वाटून, १०-१२ लसूण पाकळया व १ इंच आले वाटून, १ टेबल चमचा गरम मसाला,  २ चहाचे चमचे लाल तिखट, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ, मूठभर चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी तेल किंवा तूप.

कृती - चिकन साफ करून त्याचे आठ मोठे तुकडे करावेत स्वच्छ धुवून एका पसरट बाऊलमध्ये घालून त्याला १ वाटी दही, वाटलेल्या आले-लसणीतले निम्मे आले-लसूण, निम्मा गरम मसाला, १ चहाचा चमचा लाल तिखट हाताने लावून १ तास झाकून ठेवावे. कांदे किसून अथवा वाटून घ्यावेत कढईमध्ये तेल गरम करावे व १ चमचा जिरे टाकून कांदा घालावा व कांदा मंद आचेवर लाल होईपर्यंत परतावा. तेल अथवा तूप बाजूला सुटले पाहिजे. परतलेला कांदा, वाटलेलं आलं, लसूण घालून परतावा. उरलेलं लाल तिखट, हळद व गरम मसाला टाकून परतावे. वाटलेली खसखस घालावी. सर्व मसाला खंमग परतला गेला की दही लावून ठेवलेले चिकनचे तुकडे त्यात घालावे. चिकनचे तुकडे गुलाबी होईपर्यत परतावे. साल काढून चिरलेला टोमॅटो त्यात घालावा. सर्व मसाला व चिकन खमंग परतले गेले की चवीनुसार मीठ घालावे व दीड ते दोन वाटी पाणी घालावे. गॅस मंद करून मंद आचेवर झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत शिजवावे अथवा प्रेशर कुकरमध्ये चिकन मसाल्यासकट घालून पूर्ण प्रेशरवर आल्यावर गॅस बारीक करून २ मिनीट शिजू द्यावे व गॅस बंद करावा. शिजल्यावर बाऊलमध्ये काढून वर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. या कृतीमध्ये तिखट बेताचे आहे. आवडीनुसार कमी जास्त करावे. चिकन मसाल्यात रस्सा अंगासरशी ठेवावा. शिजताना जास्त पाणी घालू नये. चिकन मसाला ग्रेड, पराठा, नान अथवा तंदुरी रोटी बरोबर चांगला लागतो. 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF