मांसाहारी मुख्यपान

कोळंबीची खिचडी

साहित्य - अर्धा किलां सोललेली कोळंबी, अर्धा किलो उत्तम प्रतीचा तांदूळ, ७-८ लसूण पाकळया व १ इंच आले वाटन, १ चमचा लाल तिखट, २ नारळाचे दूध, पाऊण वाटी तेल, २ मोठे दालचिनीचे तुकडे, ३-४ लवंगा, चार हिरवे वेलदोडे, अर्धा चमचा शहाजिरे, २ तमालपत्राची पाने, चवीनुसार मीठ, १ चमचा गरम मसाला, १ चमचा बडीशेप, १ चमचा जिरे बारीक पूड करून, १ चमचा हळद.

कृती - कोळंबी स्वच्छ धुवून हळद व मीठ लावून ठेवावी. तांदूळ धुवून चाळणीत लिथळत ठेवावेत. दोन नारळ वाटून दूध काढून घ्यावे. अंदाजे चार भांडी झाले पाहिजे. एका जाड बुडाच्या पातेलीत तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, दालचिनी, हिरवे वेलदोडे व शिहाजिरे घालावे व त्यावर मीठ लावून ठेवलेली कोळंबी व वाटलेले आले, लसूण घालून परतावे. गरम मसाला, तिखट, हळद घालावी व निथळून ठेवलेली तांदूळ घालून परतावे. चार भांडी नारळाचे दूध व आवश्यक वाटले तर १ भांडे पाणी घालून चवीनुसार मीठ घालून खिचडी मंद आचेवर शिजू द्यावी. शिजवल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व साजूक तूप घालून खाण्यास द्यावी.

कोल्हापूरी पांढरा रस्सा

साहित्य - ४ कप मटण स्टॉक, ४-५ छोटे दालचिनीचे तुकडे, ३ लंवगा, ३-४ मसाला वेलदोडे, १ चमचा तूप, अथवा रिफाईड तेल, १ नारळाचे दूध काढून अंदाजे २ कप, पांढर्‍या मिर्‍यांची पूड १ चमचा, चवीनुसार मीठ

कृती - मटण स्वच्छ धुवून बारीक तुकडे करावेत त्यात ८ कप पाणी घालून प्रेशरकुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजल्यावर गाळून घ्यावे. ह्यालाच मटण स्टॉक म्हणतात. नारळ वाटून दूध काढावे. अंदाजे २ वाटया दाट दूध काढून गाळून घ्यावे. मटण स्टॉकमध्ये नारळाचे दूध घालून उकळावे व त्यात पांढर्‍या मिर्‍यांची पूड व चवीनुसार मीठ घालावे. १ चमचा तूप अथवा रिफाईड तेल गरम करून त्यात लवंगा, दालचिनीचे तुकडे, मसाला वेलची घालून ती फोडणी रश्श्यावर घालावी. नॉनव्हेज जेवणात गरम गरम सूपप्रमाणे द्यावा. तिखट आवडत असल्यास पांढर्‍या मिरीच्या पुडीचे प्रमाण वाढवावे. पांढरा रस्सा पातळ सूपप्रमाणे ठेवावा किंवा रश्श्याला थोडा वाटलेला नारळ लावून ग्रेव्हीप्रमाणे थोडा दाट करावा.

पुणेरी मटन रस्सा

साहित्य - १ किलो कोवळे मटण, २ चमचे आले- लसूण, अर्धी जुडी कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या मीठ व लिंबाचा रस घालून मटण मुरवत ठेवा. इतर साहित्य- ४ चमचा तळलेल्या कांद्याची पेस्ट, अर्धा कप दही, २ चमचे धने पूड, ६ लंवगा, २ इंच दालचिनी, २ वेलदोडे, अर्धा चमचा बडीशेप, १ टेबल चमचा खसखस भाजून, अर्धा कप ओल्या नारळाचा चव भाजून, ५ सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट.

कृती - मटण थोडे पाणी घालून अर्धवट शिजवा, सर्व मसाल्याची बारीक पूड करा. थोडया तेलावर कांद्याची पेस्ट व दही भाजा. मिरच्यांची पेस्ट व मसाला पूड परतवा. मटण घाला, मीठ घालुन नरम शिजवा, वर कोथिंबीर पेरा. या पदार्थात थोडे भाजलेले तीळ वरून पेरल्यास पदार्थ पुणेरी दिसतो. मसाला परताना अर्धा चमचा साखर घातल्याने रंग चांगला येतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF