चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

लसूण चटणी


साहित्य - १ सुक्या खोबर्‍याची वाटी ८-१० सोललेल्या लसूण पाकळया, अर्धा चमचा जिरे, दीड चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ.

कृती - खोबरे किसून व तव्यावर थोडेसे कोरडेचे भाजून घ्यावे. नंतर तव्यात जिरेही थोडेसे कोरडे भाजून घ्यावेत. किसलेले खोबरे, जिरे, तिखट, मीठ व लसूण पाकळया एकत्र कराव्यात व खलबत्यात ही चटणी कुटावी. काही जणांना त्यात भाजलेले दाणे घातलेलेही आवडतात. तेही चांगले लागतात, लसूण चटणी महिनाभरसुध्दा चांगली टिकते.

तिळाची चटणी


साहित्य - दोन वाटया निवडून घेतलेले पांढरे तीळ, २ चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ.

कृती - कढईमध्ये तीळ घालून गुलाबी होईपर्यंत कोरडे भाजावेत, त्यात तिखट-मीठ घालून हे मिश्रण खलबत्यात कुटावे. त्याला तेल सुटून चटणीचा गोळा होतो. ही चटणी कच्चे गोडेतेल घालून भाकरीबरोबर विशेषत: थंडीच्या दिवसात फार चांगली लागते.

पुदिन्याची चटणी


साहित्य - १ पुदिन्याची गड्डी, १ हिरवी मिरची, चवीनुसार थोडे लाल तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा जिरे, ३ मुठी धुवून चिरलेली कोथिंबीर, २ लसूण पाकळया, अर्धे लिंबू.

कृती - प्रथम पुदिना निवडून स्वच्छ धुवून ठेवावा, नंतर त्यात एक मिरची, लाल तिखट, १ चमचा जिरे, २ लसूण पाकळया व कोथिंबीर घालावी. हे सर्व नंतर पाटयावर बारीक वाटावे की चटणी तयार झाली. ही चटणी परोठा, पुर्‍या किंवा ब्रेडबरोबर पण चांगली लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF