मधल्या वेळचे पदार्थ मुख्यपान

मक्याची उसळ

साहित्य - ओल्या मक्याचे दाणे, साखर , मीठ, हळद, कोथिंबीर बारीक चिरलेली, ओले खोबरे पाव वाटी, लिंबू चिरून, फोडणीचे साहित्य.

कृती - मक्याचे दाणे मिक्सरमध्ये भरडून घ्यावे एक मिनिटांपेक्षा कमी फिरवावे. फोडणीत हिंग-हळद, हिरवी मिरची घालून वाटलेले मके,  मीठ साखर घालून मंद आचेवर वाफ येऊ द्यावी.  सर्व्ह करतांना कोथिंबीर व खोबरे घालून खाण्यास द्यावे. लिंबाची फोड ठेवावी. गरम  असताना खायला फार मजा येते .

बाजरीचा खिचडा

साहित्य - २ वाटया बाजरी, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी हरभरा डाळ, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळया, ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीलिंब,एका लिंबाचा रस व फोडणीसाठी तेल ३ चमचे, मोहरी व हळद, चवीनुसार मीठ व एक चमचा साखर, २-३ चमचे ओले खोबरे.

कृती - बाजरीला जरा पाण्याचा  हात लावून ती सडावी. नंतर पसरून ठेवावी, खिचडा करण्याआधी ४-५ तास सडलेली बाजरी, डाळ व दाणे भिजत ठेवा व तीत दुप्पट पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवा. मिरच्यांचे तुकडे करून घ्या, कांदा बारीक कापून घ्या. तेलाची फोडणी करून त्यात लसूण, मिरची, कढीलिंब, कांदा व दाणे घालून मीठ साखर घालून परता व दोन वाफा येऊ द्या. खाण्यास देतांना ,खोबरे, कोथिंबीर, लिंबू पिळून द्या हा पदार्थ गरम चांगला लागतो.

भाजणीचे थालीपीठ

साहित्य -(प्रकार १) - १ फुलपात्र गहू, १ फुलपात्र तांदूळ, २ फुलपात्र जोंधळे, २ फुलपात्र बाजरी, ३/४ फुलपात्र हरभर्‍याची डाळ, ३/४ फुलपात्र उडदाची डाळ, १/२ फुलपात्र धने.

साहित्य -(प्रकार २) - १ फुलपात्र गहू, १ फुलपात्र तांदूळ, २ फुलपात्र जोंधळे, २ फुलपात्र बाजरी, ३/४ फुलपात्र हरभरे (पिवळे) ३/४ फुलपात्र काळे उडीद, १/२ फुलपात्र धने.

कृती - प्रत्येक धान्य वेगवेगळे भाजावे. वरील धान्यापैकी कोणतेही धान्य थोडेफार कमी जास्त असेल तरी चालेल. भाजणी थोडी जाडसर दळून आणावी. थालीपीठ करतांना आयत्यावेळी पीठ भिजवावे. पीठ भिजवतांना त्यात तिखट,मीठ,हिंग,हळद व मोहनासाठी तेल घालावे. कांदा घालायचा असल्यास अगदी बारीक चिरून घालावा. थंड तव्यावर १ चमचा तेल घालून त्यावर बेताच्या आकाराचा गोळा थापून घ्यावा. नंतर मध्यभागी १ व बाजूला ४ भोके पाडावीत. ह्या भोकात थोडे तेल सोडावे व तवा गॅसवर ठेवून त्यावर झाकण घालावे. चुर्र असा आवाज आला, की झाकण काढून उलथन्याने सर्व बांजूनी सोडवून उलटावे. बाजूंनी तेल सोडावे, उलटल्यावर झाकण ठेऊ नये. चांगले खमंग भाजले गेले की तव्यावरून काढून गरमच लोणी, दही किंवा लिंबाच्या लोणच्या बरोबर खायला द्यावे. छोटी थालीपीठे हवी असल्यास प्ल्यास्टिकवर थापून घ्यावीत. ह्या थालीपीठाला मध्यभागी भोक पाडू नये. भाजणी नसल्यास सर्व पिठे एकत्र करून थालीपीठ करावे चांगले लागते.

पौष्टिक सातुचे पीठ

साहित्य - ४ वाटया गहू, २ वाटया चणाडाळ, १ वाटी हिरवे मूग, गूळ, दुध, वेलदोडा, तळलेला डिंक.

कृती - गहू, चणाडाळ, हिरवे मुग मातीच्या भांडयात वाळवून घेऊन भाजावे. भाजलेले धान्य दळून पीठ करावे. या पिठाला सातूचे पीठ म्हणतात. या पिठात साखर, वेलची, तळलेल्या डिकांची पूड व दूध घालून खाण्यास द्यावे.

या पिठात गूळ, तूप घालून लाडूही करतात. प्रवासात हे पीठ बरोबर घेतल्यास कुठेही पाण्यात कालवून खायला देता येते. कमी वेळात, कमी खर्चात होणारी परंतु भरपूर पोषक द्रव्ये असलेली ही न्याहारी वरील प्रमाणे पाऊण किलो पीठ तयार होते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF