आमटीचे प्रकार मुख्यपान

मक्याचे सार

साहित्य - मक्याचे कणीस ६, आमसुले ४-५, किसलेलं आलं पाव इंच, हिरव्या मिरच्या २, मीठ, जिरे, चवीपुरती साखर.

कृती - मक्याच्या कोवळया कणसाचे दाणे काढावे व वाफेवर शिजवून घ्यावे. मिक्सरवर वाटून चाळणीने गाळून घ्यावे. आमसुले अर्धातास भिजत घालावीत. नंतर हलक्या हाताने चोळून मग पाण्यातून बाहेर काढावीत. आमसुलाचे पाणी व मक्याचा रस, मीठ, साखर, किसलेलं आलं सर्व एकत्र करावे. तुपावर हिंग, जिरे मिरचीची फोडणी करून साराला द्यावी. भातावर किंवा नुसतं प्यायला चवदार लागतं.

मसूराची आमटी

साहित्य - १ वाटी मसूराची डाळ, १ मोठा कांदा, जिरे, लसूण, मिरची, टॉमेटो , डाळ, मोहरी, हिंग, हळदी, नारळ, कोथिंबीर.

कृती - १ वाटी मसूराची डाळ, १ मोठा कांदा चिरून ३-४ मिरच्या व अर्धवट शिजत आली की त्यात चिरलेला कांदा वाटलेले जिरे, लसूण, मिरची घालावी व टॉमेटो घालून डाळ शिजू द्यावी. डाळ पूर्ण शिजली की आपल्याला जेवढी आमटी पातळ हवी तेवढे पाणी घालावे व २-३ आमसूले व चवीनूसार मीठ व गूळ घालावा. आमटी चांगली उकळू द्यावी. कढईत डावभर तेल तापवून, मोहरी, हिंग, हळदीची, फोडणी करावी त्यात ३-४ लसणाच्या पाकळया घालून लसूण चांगला लाल तळला गेला की आमटीला खमंग फोडणी द्यावी. नारळ, कोथिंबीर घालून आमटी खाली उतरवावी.

पालक सूप

साहित्य - १ पालक जुडी, १ मोठा कांदा, लसूण ५-६ पाकळया, तूप२ चमचे, कॉर्न फ्लॉवर २ छोटे चमचे, मीठ चवी पुरते, आर्धा कप पाणी.

कृती - पालक विनडून धुऊन ठेवावा. निथळल्यानंतर तो चिरून घ्यावा. ण्का पातेल्यात एक चमचा तूप टाकून ते गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा व लसूण परतावे, यावर चिरलेला पालक टाकावा. थोडा परतून गॅस बंद करावा. थंड झाल्यावर सर्व मिक्सरमध्ये टाकून त्याची पातळ पेस्ट करावी. कडईत उरलेलं तूप गरम करून त्यात कॉर्न फ्लॉवर भाजून घ्यावं. नंतर त्यात आर्धा कप पाणी घालावे. त्याची आपोआप घट्टसर पेस्ट तयार होते. त्यात वरून पालकाची पेस्ट घालावी. दोन्ही व्यवस्थित एकत्र ढवळून चांगली उकळी येईपर्यंत शिजवावे व गरम गरमच प्यावे.

टोमॅटोचे सार

साहित्य - ५०० ग्रॅम टोमॅटो, १ मध्यम नारळ, ५-६ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, मीठ, साखर, तुपाची हिंग व जिरे फोडणी.

कृती - टोमॅटो स्वच्छ धुऊन फोडी कराव्यात. नंतर टोमॅटो शिजवून घ्यावेत. ते शिजले की पुरणयंत्रात काढून घ्यावेत. नंतर टोमॅटोचा रस, नारळाचे दूध, वाटलेल्या मिरच्या व आले, मीठ, साखर सर्व एकत्र करावे. चांगली उकळी आणावी. वाटल्यास थोडे पाणी घालावे नंतर हिंग-जिरे घालून तुपाची फोडणी दयावी. नारळाच्या दुधाऐवजी ३ वाटया ताक घालूनही हे सारं चांगले लागते. ताक वापरल्यास ताकाला थोडे डाळीचे पीठ लावावे, म्हणजे ताक फुटत नाही.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF