उपवासाचे पदार्थ मुख्यपान

साबुदाण्याची खिचडी


साहित्य - २ वाटया साबुदाणा, १ वाटी दाण्याचे कूट, ४-५ हिरव्या, एका बटाटयाच्या फोडी, १ डाव ताक, मीठ, १/२ चमचा साखर, तूप.

कृती - साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा. नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ कालवून ठेवावा. नंतर तूपाची जिरे घालून फोडणी करावी. त्यात मिरच्यांचे तुकडे व बटाटयाच्या फोडी घालून ढवळावे. झाकण ठेवावे व वाफ आणावी. बटाटे शिजले की त्यात साबूदाणा घालावा. थोडे ताक घालावे व थोडी वाफ येऊ द्यावी. मधून मधून हलवावे. साबुदाणा शिजला की खाली उतरावे.

साबुदाण्याची लापशी


साहित्य - १ टेबल चमचा साबुदाणा, १ कप दूध, २ चमचे साखर.

कृती - साबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा, नंतर १/२ कप पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यावा. वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे. नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे. मग खालती उतरवून गार किंवा गरम आवडी प्रमाणे द्यावी. आयत्यावेळी त्यात चिमूटभर मीठ घातल्यास ही लापशी चांगली लागते.

साबुदाणा वडे


साहित्य - १ वाटी साबुदाणा (भिजवून अडीचपट होतो), दाण्याचे कूट भिजलेल्या साबुदाण्याइतके, १ चमचा जिरे, वर्‍याचे तांदूळ बारीक करून वाटून, १ मोठी वाटी रिफाइन्ड तेल, चवीप्रमाणे मीठ, लाल मिखट १ चमचा

कृती - साबुदाणा चोळून पीठ बाजूला करावे. वडे करण्याच्या आधी ३-४ तास साबुदाणा भिजवावा. साबुदाणा भिजला की त्यात दाण्याचे कूट, तिखट, मीठ, जिरे मिसळून एकजीव करावे. पाणी न लावता मिश्रण मळावे. मग त्यावर तसराळे पालथे ठेवावे व घट्ट पिळलेले ओले फडके पसरावे. नंतर प्रत्येक वडा पाण्याच्या हाताने शक्य तितका पातळ थापावा व तळण्सीत सोडावा. कडेपर्यंत फुगला पाहिजे. फुगला नाहीतर आणखी कूट मिसळून पुन्हा घट्ट मळावे व वडे करावेत. वडयाच्या मिश्रणात मिरच्या, साखर, कोथिंबीर, नारळ घातल्यास किंवा मिश्रण अधिक पाणी घालून सैल केल्यास किंवा कूट कमी घातल्यास किंवा रिफाइन्ड तेलात न तळल्यास वडे मऊ होतात. मळताना मिश्रणात पाणी घालू नये. थंड पाण्यात हात घालून मळावे म्हणजे वडे सैल होणार नाहीत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF