पक्वान्ने मुख्यपान

सत्यनारायणाचा प्रसाद


साहित्य - सव्वा पावशेर भांडे जाड रवा, सव्वा पावशेर साखर, सव्वा पावशेर पातळ साजूक तूप, सव्वा पावशेर दूध व १ भांडे पाणी, वेलदोडे, बेदाणे, काजू, केळी (केळ्याचे काप काळे पडू नये म्हणून २-३ थेंब लिंबाचा रस लावावा)

कृती - पातेल्यात तूप गरम करून त्यात रवा घालावा व रवा मंद आचेवर बदामी रंगावर खमंग भाजावा भाजल्यावर केळीचे काप टाकून थोडे परतावे. एका पातेल्यात सव्वा पावशेर दूध व भांडे पाणी उकळून घ्यावे. रवा भाजून झाल्यावर उकळते दूध - पाणी थोडे थोडे घालून ढवळावे म्हणजे रवा चांगला फुलून येतो. झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊ द्यावी. नंतर काजू, वेलदोडा पूड, बेदाणे घालून प्रसाद उतरावा.

गाजराचा हलवा

साहित्य - १ किलो लाल गाजरे, अर्धा लिटर दूध, पाव किलो खवा, २ वाटया साखर, २ टेबलस्पून साजूक तूप, ५-६ वेलदोडयांची पूड, ५५ काजूचे बारीक तुकडे, बेदाणे

कृती - प्रथम गाजरे स्वच्छ धुवून सालकाढणीने सोलून घ्यावीत व बारीक किसनीवर किसून घ्यावीत. नंतर गाजराच्या किसात एकदम दूध न घालता थोडे थोडे दूध प्रत्येक वाफेला घालून दूध आटेपर्यंत ढवळावे म्हणजे गाजराचा किस मऊ शिजतो.दूध आटल्यावर पाव किलो खवा हाताने गुठळी मोडून गाजराच्या किसात टाकावा. हे मिश्रण  परत घट्ट होईपर्यंत हलवावे. नंतर २ वाटया साखर घालून हलवत रहावे. हलवा साखर विरघळून कोरडा झाला की २ चमचे साजूक तूप पातेल्यात सर्व बाजूंनी सोडावे व हलक्या तूपावर खमंग परतावा. नंतर त्यात काजूचे काप व वेलदोडे पूड घालावी.

गाजराची खीर

साहित्य - ४ लाल गाजरे, ३ वाटया दूध, २ चमचे साजूक तूप, वेलचीपूड, अर्धा कप साखर, काजू, बदाम व इतर सुकामेवा.

कृती - गाजरे स्वच्छ धुवून त्याची साले काढावीत. त्याचे तुकडे करून ते कुकरमध्ये २ शिट्टया होईपर्यंत शिजवावेत. गार झाल्यावर एकजीव करावे, जरूरी वाटल्यास किंचीत पाणी घालावे. एका पातेल्यात थोडे तूप गरम करावे. त्यावर हे गाजराचे मिश्रण परतून घ्यावे, नंतर त्यात साखर व दूध घालावे. हे मिश्रण व्यवस्थित ढवळावे, उकळी आल्यानंतर उतरवावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF