पक्वान्ने मुख्यपान

शेवयांची खीर


साहित्य - बाजारात मिळणार्‍या बारीक शेवया २ वाटया, ५ वाटया दूध, १ चमचा साजूक तूप, ५-६ वेलदोडयांची पूड, ३/४ बदामाचे काप, बेदाणे, चारोळी, १ वाटी साखर.

कृती - जाड बुडाच्या पातेलीत दूध घालून सतत ढवळत गॅसवर निम्मे होईपर्यंत आटवून घ्यावे. शेवया हाताने थोडया मोडून दुसर्‍या पातेल्यात मंद गॅसवर तुपात गुलाबीसर भाजाव्यात. भाजलेल्या शेवयांवर आटवलेले दूध घालावे, चांगले उकळले की साखर घालावी व एक उकळी येऊन साखर विरघळली की उतरवावे. गार झाल्यावर वेलची पूड व एच्छिक बदाम, बेदाणे घालावे.   

लाल भोपळयाची खीर

साहित्य - लाल भोपळा अर्धा किलो, दूध एक लिटर, साखर ३०० ग्रॅम, वेलची, जायफळ पूड, चारोळी, काजू.

कृती - लाल भोपळयाच्या फोडी तुपावर परतून कंकरमध्ये वाफवून मिक्सरमधून ग्राईड करा. नंतर दूधामध्ये घालून साखर घालून उकळायला ठेवा. सात आठ उकळया आल्या की बंद करा, वरून वेलची, चारोळी, काजुचे तुकडे टाका. लाल भोपळयात व दूधात भरपूर कॅल्शियम असल्याने लहान मुले, गरोदर स्त्रिया व वयस्कर मंडळीसाठी ही खीर उत्तम.

घावन - घाटले

साहित्य - तांदूळाचे पीठ, पाणी, मीठ

कृती - धुवून सावलीत वाळवलेल्या तांदुळाचे पीठ करून घ्यावे. त्यात थोडे मीठ घालून पाण्यात किंवा दुधात भिजवावे. सपाट तव्यावर तेल घालून त्यावर ह्या पिठाचे धिरडे घालावे ह्यालाव घावन असे म्हणतात. हे घावन घाटल्याबरोबर छान लागते.

घाटले

साहित्य - ५ वाटया पाणी, १ वाटी चिरलेला गूळ, अर्धी वाटी तांदुळाचे पीठ, दीड वाटी खवलेले ओले खोबरे, अर्धा चमचा मीठ, ८-१० वेलदोडयांची पूड

कृती - प्रथम एका पातेल्यात पाणी मोजून घ्यावे व उकळायला ठेवावे. त्यात चिरलेला गूळ, खोबरे, मीठ व वेलदोडयांची पूड घालावी. अर्धी वाटी तांदूळाचे पीठ १ वाटी पाण्यात कालवून वरील उकळत्या पाण्यात ओतावे व जरा दाटसर झाले की उतरवावे. निवल्यावर घाटले घट्ट होते म्हणून फार दाट करू नये.

टीप - भाद्रपदातील गौरीजेवणाला घावन-घाटल्याचा नैवेद्य दाखवतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF