मधल्या वेळचे पदार्थ मुख्यपान

शिरा

साहित्य - २ वाटया रवा, १ वाटी तूप, २ वाटया साखर, ४ वाटया पाणी, वेलची पूड एक लहान चमचा भरून.

कृती - तुपावर रवा मंदाग्नीवर भाजून घ्यावा. चांगला खतंग वास येईपर्यंत भाजावा. एकीकडे पाणी उकळत ठेवावे. नंतर उकळलेले पाणी भाजलेल्या रव्यात घालावे. ढवळून त्यावर झाकण ठेवावे. मंदाग्नीवर रव्वा शिजू द्यावा. शिजून थोडा घट्ट झाला की त्यात साखर व वेलची पूड घालावी व शिरा नीट शिजू द्यावा. शिजल्यावर तो गॅसवरून खाली उतरवावा. आवडत असल्यास त्यात केळीचे तुकडे (सोलून) टाकता येतात.

टीप - पाण्याऐवजी दूध आणि केळी घालून केलेला शिरा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा लागतो.

पानगे

साहित्य - तांदळाचं पीठ, मीठ,गुळ,साखर, दुध, लोणी/तूप

कृती - तांदळाचं पीठ घ्या. त्यात थोड मीठ व गुळ किंवा साखर घालून दुधाचा शिपकारा देऊन पीठ भिजवा. पिठाची पानावर पुरीएवढी चकती हाताने थापून त्या पानावर दुसरं पान घालून दोन्ही पानं तव्यावर टाकून ताटली ठेवावी. ही पानं केळीची किंवा कर्दळीची असावी. पानाचा जरा जळका वास आल्यावर ताटली काढून बाजू उलटायची. गरमागरम पानग्या बरोबर लोणी/तूप द्या. आजारातून उठलेल्या माणसाला पानग्यासारखा दुसरा पदार्थ नाही.

मुटकूळे

साहित्य - १ कोवळा लहान दुधीभोपळा किंवा मेथीच्या पाल्याची एक जुडी, २ वाटया गव्हाची जाडी कणीक, १ चहाचा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी ३ चमचे तेल, मोहरी, व हळद प्रत्येकी एक लहान चमचा, दोन-तीन चहाचे चमचे भरून धने-जिरे पावडर.

कृती - कणिक कढईत घालून गॅसवर चांगली भाजून घ्यावी. त्यात मेथीची पालेभाजी निवडून बारीक चिरून घालीवी किंवा दुधीभोपळयाची साल काढून तो किसून घालावा. धने-जिरे-पावडर, तिखट व मीठ टाकून सगळे पीठ नीट कालवावे. पाण्याचा हात लावून पिठाचे मुटकुळे करावेत. नंतर एका पातेल्यात फोडणी करून त्यामध्ये मुटकुळे टाकून  त्यावर झाकण टाकावे. झाकणात पाणी घालावे म्हणजे पदार्थाला चांगली वाफ येते. मुटकूळे शिजले की शक्यतो गरमच खायला द्यावेत.

उकडपेंडी

साहित्य - २ वाटया गव्हाची जाडसर कणीक, ४-५ चमचे चिंच-गुळाचे पाणी १ मोठा कांदा, ४-५ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी ३ चमचे तेल, मोहरी-हळद प्रत्येकी १ लहान चमचा, आर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर.

कृती - प्रथम जाडसर कणिक रवा भाजतो त्याप्रमाणे कढईत कोरडी भाजून घ्यावा. कांदा बारीक कापावा व हिरव्या मिरच्यांचे तुकडे करावेत. नंतर एका पातेल्यात फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे, भाजलेली कणीक, चवीपुरते मीठ घालावे. नंतर चिंच-गुळाचे पाणी थोडे टाकून परतून उपम्याप्रमाणे ओलसर होईपर्यंत परतावे. शिजायला हवे असल्यास थोडे साधे पाणीही वरून शिपडांवे. खायला देताना त्यावर कांदा, कोथिंबीर पेरावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF