पक्वान्ने मुख्यपान

गोड घावन


साहित्य - तांदळाचं पीठ २ वाटया, गूळ अर्धी वाटी, जिरेपूड अर्धा चमचा, मीठ चवीपुरतं.

कृती - एक - दीड वाटी पाण्यात गूळ विरघळून घ्यावा. तांदळाच्या पिठात गुळाचं पाणी, जिरेपुड, मीठ घालून चांगलं कालवावं. नॉनस्टिक तव्यावर याची घावन काढावीत

गुलाबजाम

साहित्य - ५०० ग्रॅम गुलाबजामचा खवा, ५०० ग्रॅम साखर, ८ - १० वेलदोडे, १०० ग्रॅम कॉर्नफ्लोअर, थोडा रोझ इसेन्स, १ चिमूट खाण्याचा सोडा, तळणीसाठी रिफांईड तेल २५० ग्रॅम.

कृती - खवा हाताने मोडून घ्यावा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअर व वेलचीची पूड करून घालावी. अर्धा चमचा खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून त्यात घालावा. सर्व मिश्रण चांगले एकत्र करावे. खूप मळू नये. गुलाबजाम तळण्यापूर्वी पाक करावा. साखरेत मोठे अडीच कप पाणी घालून एकतारी पाक करावा. पाकात रोझ इसेन्स घालावा. नंतर मळलेल्या खव्याचे ५० लहान - लहान गोळे तयार करून मंदाग्नीवर तळावेत. तळतांना गुलाबजामवर तेल उडवावे. तळल्यानंतर ते बाहेर काढून निथळून पाकात टाकावेत. गुलाबजाम पाकात टाकताना पाक गरम असावा. दूसरे तळून झाले की पहिले गुलाबजाम पाकातून काढून उथळ डब्यात ठेवावेत.

गव्हल्यांची खीर

साहित्य -  १ वाटी गव्हले, ४ वाट्या दूध, १ वाटी साखर, ५ -६ वेलदोडयांची पूड, थोडे केशर, १ चमचा साजूक तूप

कृती - जाड बुडाच्या कल्हईच्या पातेलीत १ चमचा साजूक तूप घालून त्या तुपात गव्हले मंद गॅसवर गुलाबी होईपर्यंत परतावे. परतलेल्या गव्हल्यांवर चार वाटया दूध घालावे व डावाने हलवावे. मोठया गॅसवर दूध चांगले उकळू व आटू द्यावे. दूध निम्मे आटले की गव्हाळ हाताने नीट दाबून शिजला का ते पहावे व शिजला असेल तर १ वाटी साखर घालावी. साखर विरघळून एक उकळी आली की खीर खाली उतरवून त्यात वेलदोडे व केशर पूड घालावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF