पापड / मसाले मुख्यपान

तांदळाचे पापड

साहित्य - १ किलो तांदूळ, लाल तिखट, पापडखार, हिंग, मीठ.

कृती - तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ते दळून आणावे, १ भांडे पिठाला १ भांडे पाणी देऊन त्यात अर्धा चमचा हिंग पावडर, १ चमचा मीठ, अर्धा चमचा पापडखार व १ चमचा लाल तिखट पाण्यात घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात १ भांडे तांदळाचे पीठ घालून मंद विस्तवावर पिठाची उकड करावी, उकडीला दोन वाफा आल्यावर ढवळून गॅस बंद करावा. गरम असतांनाच पीठ तेलाच्या हाताने मळून घ्यावे व तेलाच्या हाताने एकसारख्या लाटया तयार करून तेलावरच पापड लाटावेत.

टीप - ह्या पापडाचे पीठ एक वेळेला १ भांडयाचेच करावे, नाहीतर पीठाचा चिकटपणा गार झाल्यावर कमी होऊन पापड लाटतांना फाटतात.

 

तांदळाच्या पापडया

साहित्य - १ किलो जुने सुवासिक तांदूळ, मीठ, हिंग पावडर, १ टे. स्पून खसखस.

कृती - तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ते दळून आणावे, १ भांडे पिठाला ३ भांडे पाणी, मीठ, हिंगपूड व खसखस घालून मिश्रण कालवावे. गॅसवर ठेवून गुठळी होऊ न देता मिश्रण हलवावे व पीठ शिजवून घ्यावे. वाटल्यास अर्धे भांडे पाणी आणखी घालावे.

टीप - वरील पिठाच्या पीठ गरम असताना प्लॅस्टिकच्या कागदावर मोठया पातळ पापडया घालाव्यात. दुसर्‍या दिवशी उलटया बाजूकडून वाळवाव्यात व खडखडीत वाळल्यावर डब्यात भराव्यात.

 

पोह्याचे पापड

साहित्य -१ किलो जाड पोहे थोडे भाजून दळून घ्यावेत. पोह्याचे निम्मे पीठ पापड लाटायला ठेवावे, लाल तिखट, पापडखार, हिंग, दळलेले मीठ.

कृती - १ भांडे पिठाला १ भांडे पाणी, अर्धा चमचा हिंग पावडर, १।। चमचा मीठ, २ चमचे लाल तिखट व १।। चमचा पापडखार घालून पाणी उकळावे. पाणी खाली उतरवून कोमट झाल्यावर त्यात एक भांडे पोह्याचे पीठ घालावे व पीठ भिजवून तेलाचा हात लावत पिठाचा गोळा खलबत्यात घालून कुटावे. पिठाचा कुटून लुसलुशीत गोळा तयार झाला पाहिजे. जेवढे पीठ जास्त कुटू तेवढे पापड हलके होतात. पीठ कुटून झाल्यावर तेलाच्या हाताने त्याच्या लाटया कराव्यात व पोह्याच्या पीठावर पापड लाटावेत व सावलीत वाळवावेत. नंतर दोन दिवस उन्हात खडबडीत वाळवून डब्यात भरावेत.

टीप - पोह्यांचे पीठ थोडे थोडे भिजवून कुटून मगच पापड लाटावे लागतात. एका वेळी एकाच भांडयाचे पीठ भिजवावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF