चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

हिरव्या मिरच्याचा ठेचा


साहित्य - ८-१० हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भाजलेले दाणे, मीठ, १ चमचा जिरे, ७-८ लसणाच्या, अर्ध्या लिबांचा रस, १ चमचा साखर.

कृती - प्रथम मिरच्यांची देठे काढून घ्या, त्यात मीठ, जिरे, लसूण घालून मिक्सरमध्ये थोडे फिरवा. त्यावर भाजलेले दाणे व साखर घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटा. ही चटणी खलबल्यात कुटल्यास छान लागते. ह्या चटणीत मिरच्यांऐवजी लाल तिखट वापरल्यास टिकावू चटणी तयार होते. लाल तिखट घातलेली चटणी जाडसा न वाटता थोडी एकजीव होऊ द्यावी.

फोडणीच्या मिरच्या


साहित्य - २०० ग्रॅम हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम मोहरीची डाळ, १ टेबल चमचा हळद, १ चमचा मेथीचे दाणे, १ चमचा हिंग, १/२ वाटी मीठ, १/२ वाटी तेलाची फोडणी, २ लिंबे.

कृती - मोहरीची डाळ विकत आणावी किंवा मोहरी पाटयावर वाटून घ्यावी व साले पाखडून टाकून घरीच मोहरीची डाळ बनवावी. मोहरीची डाळ चांगली कुटून घ्यावी. थोडया तेलावर मेथी परतून घ्यावी, त्याचीही पूड घ्यावी. मिरच्यांचे पोट फाडून त्यांचे बेताच्या आकाराचे तुकडे करावेत. नंतर मीठ, हळद, हिंग, मेथीपूड, मोहरीपूड व मिरच्यांचे तुकडे सर्व एकत्र करावे. तेलाची फोडणी करून कालवलेल्या मिरच्यांवर गार झालेली फोडणी घालून २ लिंबांचा रस घालून चांगले कालवावे व बरणीत भरून ठेवावे. ४-५ दिवसांनी खायला काढाव्यात. मोठया प्रमाणात करून ठेवल्यास वर्षभरसुध्दा टिकतात.

वाटली डाळ


साहित्य - २ वाटया हरभरा डाळ, ७-८ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, मीठ, साखर चवीप्रमाणे, १ वाटी तेलाची फोडणी.

कृती - हरभर्‍याची डाळ चार तास भिजवून नंतर रोवळीत उपसून घ्या. जिरे, मीठ व हिरव्या मिरच्या घालून डाळ बारीक वाटा. कढईत भरपूर तेलाची हिंग, हळद, मोहरी व कढीलिंब घालून फोडणी करा. त्यात वाटलेल्या डाळीचा गोळा घालून परता. झाकण ठेवून वाफ आणा. अधूनमधून परतत रहा, म्हणजे डाळ मोकळी होईल. ओले खोबरे व कोथिंबीर पेरून गरम गरम खा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF