पापड / मसाले मुख्यपान

उडदाचे पापड

साहित्य -२ किलो उडदाच्या डाळीचे पीठ, १०० ग्रॅम पापडखार, १।। बारीक मीठ, १५ ग्रॅम पांढरे मिरे, २५ ग्रॅम काळे मिरे, हिरव्या मिरच्या आवडीनुसार, १।। वाटी तेल, ५० ग्रॅम हिंग.

कृती - उडदाची डाळ दळून आणावी, २ वाटया पीठ बाजूला काढून ठेवावे, ४ वाटया पाणी पातेल्यात घ्यावे त्यात पापडखार व मीठ घालून उकळावे. पाणी गार झाल्यावर थोडा पापडखार खाली बसेल तो घेऊ नये वरील पाणी घ्यावे. हिरव्या मिरच्यांवर उकळते पाणी घालून त्या उन्हात वाळवून त्यांचे पांढरे तिखट तयार करावे. मिर्‍यांची व हिंगाची पूड करावी.

उडदाच्या डाळीच्या पिठात मिरपूड, हिंगपूड, तिखट घालून पापडखार व मिठाच्या उकळून गार केलेल्या पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. पीठ शक्यतो रात्री भिजवून ठेवावे. दुसर्‍या दिवशी पाटयाला व वरवंटयाला तेलाचा हात लावून कुटावे. पीठ कुटून त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे. पीठ कुटताना अधून मधून पिठाचा गोळा हाताने ताणून लांब करून परत गोळा करून कुटावा. पिठाचा गोळा मऊ झाला की, तेलाच्या हाताने सारख्या आकाराच्या लाटया करून झाकून ठेवाव्यात व एक एक लाटी उडदाच्या डाळीच्या पिठीवर पातळ लाटावी व पापड तयार करावे. तयार झालेले पापड सावलीत वाळवून डब्यात भरावेत. सर्व पापड झाल्यावर दोन दिवस सावलीत खडखडीत वाळवावेत.

टीप - वरील पापडाच्या पिठात १ किलो मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन केलेले उडीद-मुगाचे पापडही चांगले होतात. पापड भाजून खायचे असतील तर खूप पातळ लाटूनयेत. भाजतांना लवकर जळतो.

 

कुरडया

साहित्य - १ किलो गहू, मीठ, १ चमचा हिंग पावडर.

कृती - गहू ३ दिवस पाण्यात भिजत घालावे. प्रत्येक दिवशी गव्हातले पाणी बदलावे. तिसर्‍या दिवशी गव्हातले पाणी बदलावे. तिसर्‍या दिवशी गहू वाटून चोथा काढून सत्व काढून घ्यावे. वरील वाटलेले सत्व रात्रभर झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी वर आलेले निवळीसारखे पाणी फेकून द्यावे व खालील दाट सत्व भांडयाने मोजून घ्यावे. जेवढी भांडी गव्हाचे सत्व असेल तेवढी भांडी पाणी उकळायला ठेवावे. पाण्यात अंदाजे मीठ व हिंगाची पावडर घालावी व पाण्याला उकळी आल्यावर भांडयात एका बाजूने गव्हाच्या सत्वाची धार धरून पीठ लाकडी चमच्याने सतत हलवावे. गुठळी होऊ देऊ नये. पीठ शिजत आले की, घट्ट चकचकीत व पारदर्शक होईल. पीठ खाली उतरवून शेवयांच्या सोर्‍यात भरून प्लॅस्टीकच्या कागदावर छोटया मोठया कुरडया घालाव्यात. दुसर्‍या दिवशी उलटया करून दोन्ही बाजूने उन्हात खडखडीत सुकवाव्यात व डब्यात भराव्यात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF