पोळी-भाकरी मुख्यपान

उकडीच्या पोळ्या


साहित्य - १ वाटी सुवासिक तांदुळाचे पीठ, १ चमचा तेल, १ वाटी पाणी, मीठ, दीड वाटी कणीक, तेल व मीठ

कृती - नेहमीप्रमाणे पीठ भिजवावे. तेल व मीठ एकत्र करून भिजवून ठेवावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी पाणी घालून गॅसवर ठेवावे. त्यात तेल व मीठ घालावे व उकड काढावी. कणकेच्या गोळयाची वाटी करून उकडीचा लहान गोळा घालून उंडा करावा व जाडसर पोळी लाटून सपाट तव्यावर दोन्ही कडून शेकून घ्यावी. ह्या पोळया आमरसाबरोबर करायची पध्दत आहे.

सांजाच्या पोळया


साहित्य - १ मोठी वाटी रवा, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, दीड वाटी पाणी, ५-६ वेलदोडयांची पूड, २ चमचे साजूक तूप, अडीच वाटया कणीक, ३ टे. चमचा तेलाचे मोहन, अर्धा चमचा मीठ

कृती - थोडया तूपावर रवा खमंग भाजावा व बाजूला ठेवावा. दीड वाटी पाण्यात बारीक चिरलेला गूळ घालून गॅसवर ठेवावे. गूळ विरघळला की त्यात भाजलेला रवा घालून ढवळून, झाकण ठेवून वाफ आणावी. व मऊ शिरा करावा. वेलदोडयाची पूड घालावी. रवा जाड असल्यास पाणी थोडे जास्त घालावे. कणकेत थोडेसे मीठ व तेलाचे मोहन घालून नेहमीच्या पोळीसारखी कणीक भिजवावी. शिरा निवला की चांगला मळून घ्यावी. नेतर कणकेची पारी करून त्यात ह्या सांज्याचे पुरण भरून उंडा तयार करावा. तांदूळाच्या पिठीवर पोळी लाटावी, दोन्हीकडून खंमग भाजावी. आवडत असल्यास पोळी भाजून झाल्यावर तव्यावरच थोडे थोडे साजूक तूप घालून पोळी परतावी. अशी पोळी जास्त खमंग लागते.

उसाच्या रसाच्या दशम्या


साहित्य - १ वाटी कणीक, २ चमचे मोहन, मीठ,अर्धी वाटी उसाचा रस, पाव कप गूळ

कृती - गूळ चिरून उसाच्या रसात एकजीव करावा. कणकेत मीठ घालून ती उसाच्या रसाने भिजवावी. कणीक एक तास भिजल्यानंतर त्यात मोहन टाकून पुन्हा मळावी. नंतर नेहमीप्रमाणे घडीच्या पोळीसारखी लाटावी. घडीवर भरपूर तेल लावावे, किचिंत पिठी टाकून दशम्या लाटाव्यात व तव्यावर खमंग भाजाव्यात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF