मुखशुध्दी मुख्यपान

विडा


साहित्य - नागवेलीची पाने (त्यालाच विडयाची पाने म्हणतात ) काताच्या गोळया, चुना, बडीशेप, बारीक किसलेले कोरडे खोबरे किंवा खवलेले ओले खोंबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी अथवा कातरलेली सुपारी.

कृती - प्रथम ओलसर कपडयावर विडयाची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या  शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात. साधारणत: एक विडा दोन पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत त्याच्या दुप्पट पाने जोडीने मांडावीत. नंतर पानाला थोडा थोडा चुना लावावा. प्रत्येक पानावर २/३  कात गोळया, लहान चमचाभर सुपारी, वेलदोडयाचे ६-८ दाणे, लहान चमचाभर बडीशेप व १ चमचाभर ओले खोबरे किंवा कोरडया खोबर्‍याचा कीस घालावा. नंतर पानाची पुडी करून त्याला लवंग टोचावी.

गोविंद विडा


साहित्य - नागवेलीची पाने (त्यालाच विडयाची पाने म्हणतात), काताच्या गोळया, चुना, बडीशेप, बारीक किसलेले खोबरे किंवा खवलेले ओले खोबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी, अथवा कातरलेली सुपारी.

कृती - प्रथम ओलसर कपडयावर विडयाची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात, साधारणत: एक विडा पाच पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत त्याच्या पाचपट पाने घ्यावीत. एका विडयाची पाने घेऊन त्यांना प्रथम चुना लावावा, एका पानाचा द्रोणासारखा आकार करून त्यात २/३ कात गोळया, लहान चमचाभर सुपारी, वेलदोडयाचे ६-८ दाणे, लहानचमचाभर बडीशेप व १ चमचाभर ओले खोबरे किंवा कोरडया खोबर्‍याचा किस घालावा. नंतर हे पान चारीबाजूंनी दुमडून त्रिकोणी आकार द्यावा. नंतर हा त्रिकोण वर येईल, अशा तर्‍हेने हे दुमडलेले पान दुसर्‍या पालथ्या पानावर ठेवावे व प्रथम लांबीच्या बाजूने पाने दुमडून घ्यावीत,नंतर रुंदीच्या बाजूने दुमडावीत. याच  प्रकारे पाच पाने एकावर एक ठेऊन मोठा त्रिकोण तयार होतो, या  दुमडी निघू नयेत म्हणून सपाट बाजूने लवंग टोचावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF