अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

आमटीचे प्रकार

 


 

तूर, मूग, हरबरा, मसूर आणि उडीद या डाळी व त्यांपासून बनविलेले पदार्थ हा महाराष्ट्रातील शाकाहारी लोकांच्या जेवणातील प्रथिने (प्रोटिन्स) पुरवणारा मुख्य घटक आहे. हरबऱ्याच्या डाळीचे भजी, वडे, फरसाण हे तर अत्यंत चटकदार व सर्वांच्या आवडीचे पदार्थ. परंतु या डाळींपासून बनविलेल्या रोजच्या जेवणातील विविध प्रकारच्या आमटया हा खास महाराष्ट्रीय पदार्थ. पूर्वी तुरीचे घट्ट वरण, भात, तूप आणि लिंबू यानेच बहुतांश मराठी घरांतून रोजच्या जेवणाची सुरूवात होत असे. हल्ली नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना ही चैन रोज करता येत नाही. परंतु सणावाराला, उपास सोडताना मात्र साधेवरण-भात यांवाचून चालणारच नाही. (साधे) वरण- भात यांना 'राजा-प्रधान' म्हंटले जाते. लसूण, कांदा किंवा टोमॅटो, कोथिंबीर घालून केलेले फोडणीचे वरण, चिंच-गूळ व गोडा मसाला आणि कढीपत्ता वापरून केलेली आमटी, पुरण शिजवल्यावर त्यातीलच थोडे पुरण व डाळ शिजविताना आलेला कट (डाळीचे पाणी) वापरून केलेली अत्यंत चविष्ट कटाची आमटी, लसणीच्या फोडणीची घट्ट मुगाची डाळ, मेथीचे दाणे डाळीबरोबर शिजवून,आमसुले घालून केलेली डाळ-मेथी हे नित्याच्या जेवणातील, तर उपवासासाठी भाजलेल्या शेंगदाण्यांपासून बनविलेली दाण्याची दाट आमटी असे आमटीचे प्रकार महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. पोळी-भाकरी यांसारखे कोरडे पदार्थ खाताना तोंडीलावणे म्हणून, चवीसाठी आणि ओले कालवण म्हणून आमटी बनविली जाते. शिळी भाकरी कुस्करून त्यावर गरम गरम कांद्याची आमटी घालून खाणे हे शेतकरी वर्ग, तसेच खेडेगावातील लोकांचे आवडते जेवण असते. या विविध प्रकारच्या आमटयांच्या कृती दिलेल्या आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF