गुणी आणि दमदार अभिनेता – अशोक सराफ

मुलाखत – अशोक सराफ
ashok-saraf अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली.

अशोक सराफ हे मुळचे बेळगाव या गावचे पण त्याचा जन्म मुंबईतील चिखलवाडी येथे झाला. त्यांचे बालपणही येथेच गेले. त्यांचे शिक्षण डी. जी. डी. या विद्यालयात झाले. अभिनयाची आवड असल्याने वयाच्या अठराव्या वर्षापासूनच अभिनयास सुरुवात केली. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून त्यांनी रंगमंच्यावर प्रवेश केला. यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, राम राम गंगाराम मधील म्हमद्या खाटिक यांसारख्या बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या.

त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली. ऐंशीच्या दशकात अशोक आणि लक्ष्या या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दाणादाण यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक वर्गास पोटभरुन हसवले. अशोक सराफांच्या अभिनय उभारुन यायला दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेही तितकेच साथीदार आहेत. अशोक सराफांचे काही उल्लेखनिय चित्रपट नवरी मिळे नव-याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन, आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत.

ashok-saraf पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ बरोबर त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था चालू केलेली आहे. त्याद्वारे काही मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. टिव्ही मालिकांमध्ये त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे ’हम पांच’. अशोक सराफांनी चित्रपट संख्या कमी केलेली असली तरी प्रेक्षक अजूनही त्यांच्या नवीन चित्रपटांच्या प्रतिक्षेत असतात.