बदलता भारत

समाजजीवनाच्या एखाद्या क्षेत्रात होणारा बदल इतका व्यापक असतो, की जीवनाच्या इतर क्षेत्रांवर त्याचा आपोआप परिणाम होतो, गेल्या दशकात जागतिकीकरण या संबोधनाने ओळखल्या जाणा-या मुख्यत: आर्थिक क्षेत्रातील बदलामुळे राजकारणापासून समाजकारणापर्यंत जीवनाची विविध क्षेत्रे झपाटयाने बदलत चालली आहेत. हे बदल किती दूरगामी परिणाम करणारे आहेत, हे अर्थशास्त्राचे अभ्यासक वेगवेगळया आकडेवारीच्या साह्याने आपल्याला सांगत असतातच, पंरतु समाजजीवनात घडणा-या अशा बदलाचे स्वरूप मानवी जीवनात घडणाऱ्या अशा बदलातून, लोकांच्या मानसिकतेच्या बदलातून जेवढे ठळकपणे कळू शकते तेवढे रूक्ष आकडेवारीने लक्षात येत नाही. एक संवेदनाक्षम नागरिक म्हणून समाजजीवनातील या परिवर्तनाचा मागोवा घेण्यासाठी ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी देशभर भ्रमंती केली आणि आपला पाहिलेला ‘बदलता भारत’ काही लेखांच्या माध्यमातून टिपला. त्या लेखांचा संग्रह ‘मौज’ने प्रसिध्द केला आहे. सकृतदर्शनी केवळ आर्थिक वाटणारे हे बदल समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे आहेत, याची त्यांना जाणीव आहे, म्हणून त्यांनी आपल्या अवलोकनाचा परीघ संकुचित केलेला नाही.

भारतातील वेगवेगळया भागांतील ही विखुरलेली चित्रे आहेत. पहिल्या दोन प्रकरणात केरळचे दर्शन आहे. टायपिस्टस्, कम्युनिस्टस्, नर्सेस आणि नन्स ही केरळची ओळख बनलेली प्रतीके आणि केरळची जातीय आणि धार्मिक वैशिष्टये काळयांनी नोंदविलेली आहेत. आणखी एका लेखात मात्र त्या-त्या प्रदेशांचे, लोकांचे चित्रण असले तरी मुख्यत: एखादा प्रश्न किंवा एखादी संस्था यांनाच केंद्रस्थान दिलेले आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या केन्द्रीय दक्षता आयोगाला ज्यांच्या कर्तृत्वामुळे महत्व आले ते नागराजन विठ्ठल, चहाच्या व्यापाराभोवती फिरणारे आसामचे समाजजीवन, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवरील ‘नवदर्शन’ हा गांधी विचारांना प्रत्यक्ष आचरणात आणणारा स्वावलंबी व स्वयंपूर्ण गावाचा प्रयोग, अहमदाबादमध्ये धार्मिक संघर्षाच्या वातावरणातही माणसांना जोडण्याचा प्रयत्न करणारे ‘अभिगम कलेक्टिव्ह’ आणि त्यांच्या ‘लोकनाद’सारख्या चळवळी, माहिती अधिकारासाठी झगडणा-या केजरीवालसारख्या व्यक्ती आणि त्यांच्या संस्था यांचाही या चित्रात समावेश आहे. भारताच्या विशालतेत जसे त्याचे काही सामर्थ्य आहे, तसेच दुबळेपणही आहे. दुबळेपण या अर्थाने, की कोणताही बदल भारतात फार त्वरेने घडून येऊच शकत नाही. वेगवेगळया ठिकाणची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती इतकी वेगवेगळी आहे की, स्वातंत्र्य किंवा मानवाधिकार यांसारखी मूलभूत मूल्ये असोत, अगर जागतिकीकरणासारखी बदलाची प्रक्रिया असो, त्या सर्वांचा सारखा परिणाम होऊच शकत नाही.

जागतिकीकरणामुळे बंगलोर जेवढे बदलू शकते, तेवढा झारखंड बदलू शकत नाही. त्यात झालेले बदल मुद्दाम शोधून काढावे लागतात. जागतिकीकरणाचा रेटा एवढा जबरदस्त होता की मनमोहनसिंगांपासून बुध्ददेवांपर्यंत सर्वांनाच ते कमी अधिक प्रमाणात स्वीकारावे लागले. मात्र भानू काळयांनी म्हटल्याप्रमाणे जागतिकीकरण ही एक स्पर्धा करण्याची संधी आहे. ती संधी सर्वांना उपलब्ध आहे, पण या स्पर्धेत भाग घेण्याची क्षमता आणि इच्छा सर्वांच्या ठिकाणी आपोआप निर्माण होत नसते. दूर रांची-दुर्गापूरमध्ये जन्मलेले तरूण कॉल सेटर्समधील नोक-यांसाठी बंगलोरमध्ये येऊ शकतात, पण तेथील खेडयातील मुलीना दिल्लीत सुखवस्तू माणसांच्या घरी घरकाम करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. उच्च तंत्रज्ञान वापरणा-या उद्योगांसाठी नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी त्यांच्या जमिनी संपादित केल्या जातात, त्या शेतक-यांच्या मुलांना अशा वसाहतीत नोकऱ्या उपलब्ध नसतात.

भांडवल आणि साहस यांची; व काही प्रमाणात श्रमांचीही सुलभतेने जगभर स्थलांतरित होण्याची क्षमता हा जागतिकीकरणांचा महत्वाचा विशेष आहे. संदेशाच्या वहनव्यवस्थेत झालेली संगणक क्रांती जागतिकीकरणांच्या प्रसाराला मुख्यत: कारणीभूत झली आणि तिने देशांच्या राजकीय सीमा बऱ्याच अंशी निरर्थक केल्या. जेव्हा एखाद्या देशात नवे ज्ञान- मग ते वैज्ञानिक असो अगर लष्करी असो -येते, तेव्हा त्याला आपण सामोरे कसे जावयाचे यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असते. नव्या शक्तीच्या आगमनापुढे दिपून जाऊन आपण हतबल होतो, की त्याचा अंगीकार करून त्याचा उपयोग आपल्या विकासासाठी आपण करू शकतो यांवर ते भवितव्य अवलंबून असते. संरक्षणासाठी उभारायच्या भिंतीनी बाहेरून येणारे वारे अडवण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो. पण येणाऱ्या लोंढयाने आपले अस्तित्व वाहून जाणार नाही, इतपत काळजी घ्यावी लागते. स्पर्धा ही जशी पुढे जाण्याची संधी असते, तशीच बलवानांसाठी ती इतरांना मागे टाकण्याचीही संधी असते. दुबळयांच्यसाठी विकासाची असलेली संधी, ही शक्तिमानांसाठी इतरांच्या शोषणाचीही संधी बनू शकते. स्पर्धेचा फायदा ग्राहकांना मिळतो, परंतु आपली वस्तू ग्राहकांच्या गळी उतरवण्यासाठी जी स्पर्धा होते, ती ग्राहकांच्या हिताचीच असते असे नाही. स्पर्धेमध्ये बलवान टिकतील हा डार्विनवादाचा सामाजिक सिध्दांत खरा ठरत असला, तरी तो कित्येक वेळा समाजहिताला हानीकारक असू शकतो म्हणून सर्वव्यापी बदलांचे स्वागत करताना समाजाच्या नेतृत्वाने सावध असावे लागते.

‘बदलता भारत’मध्ये जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या व्यवसायाच्या संधी लेखकाने नोंदविल्या आहेत. केरळच्या पर्यटनव्यवस्थेला मिळालेली चालना, व्हॅनिलाची लागवड, आरामैक भाषा शिकण्यासाठी कोटायमला येणारे परदेशी विद्यार्थी, बंगलोरचे कॉल सेंटर आणि चेन्नईची सुपर मार्केटस् या सर्वांनी निर्माण केलेले रोजगार सहज दिसणारे आहेत. भानू काळे यांच्यासारखा लेखक जेव्हा भौतिक बदलाबरोबरच मानवी जीवनातील बदलांची नोंद घेऊ लागतो, तेव्हा कॉल सेंटरमधील नोकरीत असणारे कष्ट आणि नव्या रोजगारातील उण्या बाजू त्यांना नोंदवाव्याशा वाटतात. आपल्या लेखनाच्या प्रारंभीच परदेशी मागण्या पुरवणारे पुण्यात फाऊंड्री असणारे प्रसन्न पराजपे, बंगलोरमध्ये बहुराष्ट्रीय बियाणे कंपनी चालविणारे दीपक मलिक, ओतूरचे द्राक्ष निर्यातदार विकास राजर्षी आणि इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या संगीता वेलिकर अशी काही उदाहरणे जागतिकीकरणाच्या सर्वव्यापक परिणाम सांगण्यासाठी भानू काळयांनी नोंदविलेली आहेत, परंतु सर्वत्रच असे घडलेले नाही. झारखंडमध्ये त्यांना दिसलेल्या ‘सुटीवर आलेल्या दिल्लीवाल्या’ या काही जागतिकीकरणाची अपत्ये नाहीत. बाबू लोकांनी दिल्लीला राहावयाचे जेव्हा ठरले, त्याचा जागतिकीकरणाशी संबंध नाही. या मुलींची स्वप्नेही लहान आहेत, आणि ती पूर्वीचीच आहेत.

काळयांच्या पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे भारत पाहताना त्यांनी अमुकच पाहायचे आणि इतरांसाठी डोळे झाकायचे, असे केलेले नाही. स्वावलंबी खेडी हे गांधींचे स्वप्न होते. स्वयंपूर्ण खेडयांना केंद्र मानून भारतात विकेद्रित लोकशाही मानणारी घटना स्वतंत्र भारतासाठी केली जावी, अशी गांधीजीची इच्छा घटना समितीने पूर्ण केलीच नाही. पण त्यांचे कार्यकर्ते हा प्रयोग करीत राहिले. ‘नवदर्शनम्’ उभारणारे टी.एस.अनंतू आणि ज्योतीताई, डोरकासायमध्ये तळी खोदणारा शैलेद्र आणि ‘मत बांटो इन्सानको’ असे लोकांना सांगणारे विनय आणि चारूल हे सर्व अस्सल भारतीय आहेत. व्यक्तिगत आर्थिक स्वार्थ आणि सत्तेचा मोह बाजूला सारून समाजसेवेच्या क्षेत्रात आजही काम करीत असलेल्या कार्यकर्त्याचे हे प्रतिनिधी आहेत.

जागतिकीकरणामुळे आर्थिक समृध्दी येऊ शकते, पण खुल्या अर्थव्यवस्थेतसुध्दा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे; असे जॉर्ज सोरोससारखे आर्थिक विचारवंत आपल्याला आज बजावत आहेत. ज्या सामाजिक जबाबदारीने निवडणुकीत मदत होणार नाही, त्याचे विशेष महत्व राजकारण्यांना वाटण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी अनंतू आणि शैलेंद्र यांच्यासारख्यांच्या उपक्रमांकडे स्फूर्तिस्त्रोत म्हणून पहावे लागेल.

अडचण फक्त एक आहे आणि ती महत्वाची आहे. तिचा उल्लेंख काळयांनीही केला आहे. शैलेंद्रची तळी असो किंवा राळेगणसिध्दीची आदर्श ग्रामयोजना असो, ‘स्वयंस्फूर्त कार्यात अनुकरण क्षमता आणणे, त्याची व्यापक पुनरावृत्ती करणे अवघड आहे. आज ठिकठिकाणी होणारी अशी कामे एखाद्या व्यक्तीच्या किंवा दोन चार माणसांच्या समूहाच्या प्रेरणेने उभी राहतात व ती माणसे राहिली नाहीत तर ते काम हळूहळू लयाला जाते. महात्मा गांधी ही एक अशी शक्ती होती की ज्यांच्यामुळे शेकडो कार्यकर्ते त्यांनी सांगितलेल्या मार्गाने सातत्याने वर्षोगणती स्वत:ला गाडून घेऊन एकच काम करीत राहिले. आज देशभर विधायक कामाची प्रेरणा देणारी शक्ती अस्तित्वात नाही, आहेत ती छोटी छोटी बेटे. जागतिकीकरणाच्या त्सुनामी लाटांपासून या बेटांना किती काळ संरक्षण मिळणार, याची शंका सहज मनात येते, दिलासा एकच, की नवेनवे तरूण नवेनवे प्रयोग करीत आहेत आणि भानू काळयांसारखे संवेदनाक्षम लेखक त्यांची नोंद घेण्यात रस घेत आहेत.

भानू काळयांनी केलेल्या निरीक्षणात व्यक्त केलेली सगळीच मते मात्र पटणारी नाहीत, इतर भारतीय नेत्यांची नावे देशभर माहीत असतात, पण पेरियार किंवा राजगोपालचारी सहज आठवत नाहीत हे खरे आहे. परंतु याची अनेक कारणे आहेत. जयललिता ही जन्माने ब्राम्हण असलेली स्त्री तामिळनाडूची मुख्यमंत्री झाली. याचा अर्थ ब्राम्हणाचा विरोध पण ब्राम्हणाचा द्वेष नाही अशी समजूतदार भूमिका तामिळनाडूत निर्माण झाली असा नव्हे. एमजीआरशी तिचे नाते नसते तर जयललिता मुख्यमंत्री होऊच शकत नव्हत्या. महाराष्ट्रात खरे म्हणजे मुंबईतच जसे दाक्षिणात्यांविरूध्द आंदोलन झाले तसे करणारी एखादी तामिळसेना तिकडे निर्माण झाली नाही, असे काळे यांनी नोंदविले आहे. बंगलोरविषयी लिहितांनासुध्दा डॉ. विष्णू बापट यांच्यासारख्या मूळ मराठी माणसाचे ‘आम्हाला इथे कधीही उपऱ्यासारखं वागवलं गेलेलं नाही. कानडी माणूस तसा खूप समजदार आहे’, असे मत सुध्दा सांगितले आहे. पुढचा काळयांचा प्रश्न आहे; ‘आपण मराठी माणसे आहोत का तेवढी समजूतदार?’ काळयांना नकारार्थी उत्तर अपेक्षित आहे. विष्णू बापटांनी कानडी भाषा आत्मसात केली. आपल्याकडे परभाषिकाकडून तसा मराठीचा स्वीकार होतो काय? किती परप्रांतीय येथे मराठी आत्मसात करतात व बोलतात? बंगलोरमध्ये आणि कर्नाटकच्या इतर भागात कन्नड संस्कृतीशी समरस झालेले व त्यांनी स्वीकारलेले मराठी लोक आणि सीमाभागातील मराठी जनता यांचा परस्परसंबंध लावणे बरोबर नाही. महाराष्ट्रीय लोक समजूतदार नाहीत, अशी अपराधीपणाची जाणीवसुध्दा केवळ अनाठायीच नव्हे तर चुकीची आहे. भारतात सर्व भागांत कारणपरत्वे गेलेली मराठी माणसे त्या संस्कृतीचा शक्य तेवढा अंगीकार जेथे करतात, तेथे त्यांना अडचण येण्याचे कारणच नाही. गोवारीकरांच्या मुली अस्खलित मल्याळम् बोलतात याचा उल्लेख काळयांनी केला आहे.

तंजावरचे मराठी राजे – एन. विठ्ठल यांचे पूर्वज, कॅबिनेट सेक्रेटरी कृष्णस्वामी रावसाहेब किंवा के.जयराज आणि शिवाजी गणेशन व रजनीकांत ही सगळी माणसे मूळ मराठी आहेत हे खरे, व त्यांना दक्षिण भारताने आपले मानले हेही खरे, आहे. परंतु याचे कारण हे की या सर्वांनी आपण जेथे राहतो त्या प्रांताची भाषा आणि संस्कृती आपली मानली. ही सर्व मंड्ळीही उत्तम तामिळ किंवा तेलगू बोलतात. त्यांनी आपण राहतो तेथील भाषा शिकायची नाही आणि तेथील संस्कृतीशी एकरूप व्हायचे नाही असा हट्टाग्रह धरलेला नाही, म्हणून ही माणसे कधीही लोकांना परकी वाटली नाहीत. महाराष्ट्रात जेथे असे झाले तेथे त्यांना स्वीकारले गेले. परंतु मुंबईतील चळवळीचे मूळ नोकऱ्या आणि राहण्याच्या जागा यांची कमतरता हे आहे. हा फरक समजून न घेणे हा भाबडेपणा होईल. इंग्रजांच्या निकट संपर्कात आलेलया राजा राममोहन रॉय यांसारख्या भारतीय नेत्यांनी इंग्रजीचा आग्रह धरला हे खरे आहे, परंतु तेव्हा त्यांच्यासमोर संस्कृत, अरेबिक यांसारख्या भाषा की इंग्रजी असा पर्याय होता. इंग्रजी की बंगाली असा पर्यायच नव्हता. न्या. रानडे प्रभृती समाजधुरीणांनी (इंग्रजीचा आग्रह धरण्याची) ही परंपरा कायम राखली हे सत्य नाही. शिक्षणामध्ये मराठीला योग्य स्थान मिळावे असा आग्रह ज्या मराठी नेत्यांनी धरला, त्यात न्या. महादेव गोविंद रानडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे.

जागतिकीकरणाच्या नावाखाली देशात होणारे बदल फायद्याचे की तोटयाचे, हा विचार मनात आल्यावर त्याचा पाठपुरावा करायचा, स्वत: प्रवास करायचा, बोलायचे, पहायचे, आणि मग लिहायचे असे ठरवून केलेले हे लेखन आहे. मराठीत अशा पध्दतीने लिहिलेली पुस्तके फार कमी आहेत. अशा लेखनाची काही वैशिष्टये आपोआप निर्माण होऊ शकतात. एक तर दिसलेले वास्तव त्या लेखकाचे स्वत:चे असते. दुसऱ्याच्या मताच्या ओंजळीने प्यायलेले पाणी नसते. दुसरे म्हणजे एखाद्या प्रश्नाची कोरडी आकडेवारी महत्वाची न मानता माणसाच्या जीवनात होणारे बदल प्रत्यक्ष टिपणे कोणत्याही परिवर्तनाचा अधिक खात्रीशीर आलेख असतो. तिसरे म्हणजे लेखनाच्या ओघात अनेक माणसांची व्यक्तिचित्रे येतात, स्वभावाचे बरे वाईट नमुने टिपले जातात. काळयांच्या लेखनात ही सगळीच वैशिष्टये प्रगट झालेली आहेत.

भानू काळयांच्या शैलीचा एक महत्वाचा विशेष म्हणजे इतिहास आणि वर्तमानातील महत्वाची माहिती नोंदवून त्या प्रदेशाचे आणि तेथील घडलेल्या बदलाचे रेखीव चित्र ते वाचकाच्या मनात उभे करतात. पण तपशीलाची निवड करतानासुध्दा आपला सांगावयाचा मुद्दा काळे दृष्टीआड होऊ देत नाहीत. आणखी महत्वाचे म्हणजे जागतिकीकरणाचा पुरस्कार करावयाचा की विरोध असा एखादा पूर्वनियोजित उद्देश मनात ठेवून हे लेखन झालेले नाही. म्हणूनच जागतिकीकरणाचे फायदे नोंदविणाऱ्या काळयांनाच आत्महत्या करणारे शेतकरी, अजूनही पाण्यासाठी मैलोगणती वणवण करणाऱ्या बायका, अशा वस्तुस्थितीच्या दुसऱ्या बाजूचाही विसर पडलेला नाही. या पुस्तकातील सर्वच लेखन व त्यातील नोंदी जागतिकीकरणाशी सरळ संबंध असलेल्या नाहीत. त्यांचे स्वरूप आजच्या समाजस्थितीच्या चित्रणाचेही आहे.

जागतिकीकरण आणि उदारीकरण ही एक मुख्यत: आर्थिक असलेली प्रक्रिया आहे. तिला अर्थात राजकीय आणि सामाजिक बाजूसुध्दा आहे. तिला पूर्णत: विरोध करता येणे अशक्य आहे, मात्र तिचा अधिकाधिक उपयोग आपल्या देशासाठी आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त लोकांसाठी कसा होईल, याचा विचार करावयाचा असेल तर शासनाची आणि लोकांची मानसिकता तयार करावी लागेल. त्यातील एक अडचण गुन्नार मिर्दाल यांचे मत उदधृत करून काळयांनी सांगितलली आहे, ती म्हणजे शासन कमकुवत आहे. लोकशाही व्यवस्थेने खरे म्हणजे शासनाला बळ यावयास हवे, पण भारतासारख्या देशात लोकशाही प्रक्रियेच्याच काही अपरिहार्यतेमुळे काही गोष्टी करण्याला किंवा न करण्याला शासन बांधील रहाते. सगळेच निर्णय अंमलात आणण्याला जसे भारतीय शासन कमी पडते, तीच गोष्ट जागतिकीकरणाबद्दलच्या स्वीकारावयाच्या धोरणाबद्दल खरी ठरू शकते. शासनाचा हा कमकुवतपणा प्रांतापरत्वे कमी-जास्त असलेलाही आपल्याला दिसतो. मात्र ज्यांना डोळसपणे जागतिकीकरणाचा व त्याच्या भारतातील अवताराचा विचार करावयाचा आहे. त्यांच्यासाठी या प्रश्नाची मानवी बाजू काळयांनी चांगली चित्रित केली आहे. एकूणच सर्व बाबींचा विचार करता हे पुस्तक वाचनीय झाले आहे. तटस्थ आणि सकारात्मक विचार करणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक जागतिकीकरणाचा पुरस्कार व तिरस्कार करणा-यांना विचार करायला लावणारं आहे.

– न्या. नरेंद्र चपळगावकर, औरंगाबाद

पुस्तकबदलता भारत
लेखक – भानू काळे
प्रकाशक – मौज प्रकाशन
किंमत – रु.२००/-