सृष्टीरंग मुख्यपान

बकुळ

वहीचे पान अलगद उलगडतांना बकुळीची फुले हाती लागतात आणि "शब्द, शब्द जपून ठेव, हे बकुळीच्या फुलांपरी" या गाण्याच्या ओळी सहज आठवतात.आपल्या परिसरात आढळ्णा-या फुलांच्या झाडांमध्ये बकुळ हे वैशिष्टयपूर्ण दुर्मिळ झाड आहे. या फुलाचा रंग फिकट तपकिरी असतो. हे झाड मध्यम उंचीचे असते. खोड काळपट चॉकलेटी रंगाचे असते. पाने हिरव्या रंगाची असतात. पानांच्या कडेने नक्षी असते. या झाडाची फुले नाजुक असतात आणि पाकळ्या बारीक असतात. फुलांना मंद सुगंध असतो. ही फुले गजरा करण्यासाठी वापरतात. तसेच देवाला वाहतात. या झाडाला बिया येतात. त्या बियांची लागवड करून रोपे तयार केली जातात. या झाडाचे खोड जाड असते. चाफ्याच्या झाडाप्रमाणे हे झाड उंच वाढते, परंतु पाने मध्यम आकाराची असतात. सर्वसाधारण्पणे ही फुले थंडीच्या दिवसात म्हणजे आक्टोबर ते जानेवारी या कालावधीत बहरतात. सकाळी ही फुले ताजी असतात आणि दुपार झाली की कोमेजतात. पहाटे या झाडाच्या छायेत छान सुगंध येतो. थंडीच्या दिवसात या झाडाखाली फिकट तपकिरी फुलांचा सडा पडतो. लांबवर पसरणा-या या फुलाच्या सुवासाने माणसे आपोआपच या फुलाच्या झाडाकडे आकर्षिली जातात. ही फुले बागेत आढळतात. रोजच्या व्यवहारात  ही फुले वापरली जात नाहीत. दुर्मिळ असल्याने ही फुले बाजारात क्वचित पहावयास मिळतात.

 हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. ह्याच्या फळाचे मुरंबे किंवा लोणचे घालतात. बियांत स्थिर तेल असून ते खाद्य व दिव्याकरिता उपयुक्त असते. याचे लाकूड गर्द पिंगट, कठीण, टिकाऊ व जड असून रंधून व घासून ते गुळगुळीत व चकचकीत होते त्यामुळे याचा बांधकाम व सजावटी सामान, घाणे, होड्या, वल्ही, हत्यारांचे दांडे, कपाटे, वाद्ये, मसळे, कातीव काम, हातातल्या काठ्या यासाठी उपयोग होतो. फुलांतील सुगंधी द्रव्य अत्तरे, तेल यांमध्ये वापरतात.  ही फुले वाळवल्यावरही त्यांना बराच काळ सुगंध येतो. हे साल कातडी कमाविण्यास व कापडाला पिंगट रंग देण्यास उपयुक्त आहे. साल स्तंभक, शक्तीवर्धक व ज्वरघ्न असते. याची साल पाण्यात टाकून ते पाणी दंतरोगात चूळा भरण्यास चांगले असते. या झाडाचे फळ स्तंभक असून ते जुनाट आंमाशावर व अतिसारावर गुणकारी असते. या झाडापासून डिंकही मिळतो. कोवळ्या फांद्या दात स्वच्छ करण्यात वापरतात. सुक्या फुलांची भुकटी तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी व वेदना कमी होतात. महाभारत, बृहत्संहिता, सुश्रुतसंहिता, कौटिलीय अर्थशास्त्र आणि संस्कृत साहित्यात मेघदूत, रघुवंश, मालतीमाधव आणि गीतगोविंद यांत बकुळाचा उल्लेख आढळतो; हा वृक्ष पूज्य व घराजवळ लावण्यास योग्य मानला आहे.

या झाडाला इंग्रजी भाषेत स्पॅनिश चेरी, उर्दू भाषेत किराकुली, कानडी भाषेत रंजल ,कोंकणी भाषेत ओमवाल, गुजराथी भाषेत बरसोळी, तामीळ भाषेत मगिळ्हांबू, बंगाली भाषेत बकुल, मणिपुरी भाषेत बोकूल लै, मराठी भाषेत बकुळी, मल्याळम भाषेत इळन्नी, हिंदी मध्ये मौलसरी आदी नावे आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा