तुम्हाला माहिती आहे का? मुख्यपान
अजब दुनिया

प्राण्यांचे राशीचक्र

परवा सहज कुणीतर बोलता बोलता अजब माहिती दिली. माणसाप्रमाणेच प्राण्यांच्याही राशी असतात! त्यांच्या जन्मवेळेप्रमाणे त्या ठरविता येतात. म्हणजे कुणी एक प्राणी इनामदार असेल, तर तो अमुक राशीचा, कुणी सातत्याने वखवखत असेल तर तो तमुक राशीचा, दारासमोर दाणे वेचणारी ही चिमणी या राशीची, दाणे वेचताना इतर दोघींना दूर करणारी दुसरी चिमणी अजून कुठल्या राशीची, एसा कुणी 'ऍनिमल राशीचक्राचा' अभ्यास केला तर? हाताला चावणारे डास वेगळया राशीचे, पायाचा कडाडून चावा घेणारे निराळे, असे भविष्याच कुणी मांडून बसले तर....

घरात सर्वांना चोरून दबक्या (मांजरीच्या) पावलांनी आत घुसून दूध पिणार्‍या आणि सर्वांसमोर बेधडकपणे खिडकीतून आत उडी मारून येणार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या मांजरींच्या राशी कशा काय सांगणार बरं...? आजकाल काही मांजरी कितीही हाकलले, तरी जागच्या हालत देखील नाहीत, उलट त्या आपल्यालाच गुरकावतात! रात्री उशिरा घरी परतताना गाडीमागे लागणारे, धावत भुंकत सुटणारे कुत्रे आणि निमूटपणे मालकाच्या दारापाशी पहुडणारे (भूंक म्हटले, तरी न भुंकणारे) कुत्रे यांचा फरकही या मंडळींनी 'राशीचक्रात' बसवलाय!

शिंगांनीमस्ती करणार्‍या, 'गरीब गाय' हा शब्द सार्थकी लावणार्‍या, रस्त्यात नको तिथे बसणार्‍या, गायींचेही त्यांच्या राशीनुसार कुणीतरी वर्गीकरण करून टाकले तर....तुरूतुरू धावणारी झुरळं, नको तिथे घोटाळणाऱ्या काळयाकुट्ट माश्या, माणसांच्या घरात कधीही कुठेही शिस्तीत फिरणार्‍या मुंग्या, जुन्या कापडात, कापसात, गालिच्यांखाली दडणारे ढेकूण यांचे 'राशीकरण' करण्यासाठी हातात मुव्ही कॅमेरा घेऊनच बसावं लागेल... त्यांच्या सवयी टिपण्यासाठी!

अचानक खिडकीतून भिरभिरत येणारी फुलपाखरं, मध्येच केव्हातरी सर्रर्रकन घरात घुसणारे, इलेक्ट्रिकच्या सॉकेटमध्ये घुसून कुजबुजणारी आणि काम झालं, की तितक्याच झर्रर्रकन परत पळणारी मधमाशी यांच्या राशी कसं काय ठरविणार बुवा? दूध नासविणार्‍या, लोणचं आंबविणार्‍या, इडली फुगविणार्‍या सूक्ष्मजीवांची जन्मवेळ कोण आणि कशाला काढत बसेल?

हे झाले माणसाच्या सान्निध्यात वावरणार्‍या सजीवांचे राशीचक्र! पण निसर्गातील इतर लाखो वैशिष्टयपूर्ण सजीवांच्या राशी ठरविता-ठरविता नाकी नऊ येईल. हवेत उंच झेपावणार्‍या पक्ष्यांच्या राशींसाठी दुर्बिण वैगरे घेऊन बसावे लागेल. दिवसभर हिंडूनही खाद्य न मिळणार्‍या प्राण्याला 'साडेसाती' च्या चक्रात झक्कास अडकवता येईल. तुम्हीच अगदी ठरवून मारल्यासारखे नजर ठेवून 'खल्लास' केलेल्या एखाद्या मच्छराला राहू, केतू, शनिच्या 'वक्रदृष्टी' पेक्षा तुमचीच वक्रदृष्टी महागात पडेल!

हे ही ठीक...पण काय हो, मातीत अगदी नकळतपणे, अंकुरणार्‍या इवल्याश्या रोपटयांची जन्मवेळ कशी काय सांगणार? ही जन्मवेळच नाही समजली तर मग वनस्पती-प्राण्यांच्या राशीचक्राचे काय होणार...!!
त्यापेक्षा नकोच हे चक्र.!!

प्राची पाठक
नाशिक

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा