छोट्यांच्या पाककृती मुख्यपान
बटाटयाची कोशिंबीर

साहित्य : ४ मोठे उकडलेले बटाटे, एक चमचा भरून मीठ, २ डाव भरून गोड दही, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पूङ

कृती : उकडलेले बटाटे सोलून घ्या, एका पातेलीत घालून ते हाताने छान कुस्करा, सुरी वापरता येत असेल तर मिरचीचे बारीक तुकडे करा नाहीतर आई किंवा ताईकडून ते करून घ्या. कुस्करलेल्या बटाटयात साखर, जिरेपूड, मिरच्यांचे तुकडे व अर्धा चमचा मीठ घालून सर्व नीट कालवून घ्या. आता त्यात दही घालून डावाने सर्व नीट ढवळून घ्या, चव घेऊन पहा. मिठाची जरूरी आहे का? असल्यास थोडे घालून, चव घेऊन पहा, झाली कोशिंबीर तयार. कोथिंबीर असेल तर तीही थोडी निवडून, धुवून, चिरून वर पेरलीत तर कोशिंबीर छान दिसेल.

टीप : ही कोशिंबीर २ मोठया माणसांना पुरेशी होईल.

केळीचे शिकरण

साहित्य : दोन पिकलेली (सालीवर काळे ठिपके पडलेली) केळी, दोन वाटया भरून तापवून थंड केलेले दूध, चहाचे तीन चमचे भरुन साखर, वेलदोडयाची पूड असल्यास ती चिमूटभर

कृती : एका पातेलीत दूध घेऊन त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत हलवावी. एका बशीत केळी सोलून ती हाताने खूप कुस्करावीत. कुस्करलेली केळी नंतर साखर घातलेल्या दूधात घालून नीट मिसळावीत व सर्वात शेवटी त्यात वेलदोडयाची पूड घालवून हलवावे. झाले शिकरण तयार.

टीप : हे शिकरण लगेच संपवायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवले तर काळे पडते. याबरोबर ३-४ पोळया सहज खाता येतात.

दही पोहे

साहित्य : ३ वाटया निवडलेले पातळ पोहे, अर्धा इंच आले, दीड वाटी गोड दही, अर्धी वाटी गार दूध, एक चहाचा चमचाभर मीठ, २ हिरव्या मिरच्या, थोडीशी धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरेपूड, पाऊण चहाचा चमचा साखर

कृती : पोहे चाळणीत घेऊन त्यावर गार पाणी ओता. सर्व पोहे भिजून मऊ होतील. मग ते एका स्टीलच्या पातेलीत काढा. त्यात दही, साखर, जिरेपूड, मीठ घाला. आले किसून त्यात टाका. मिरचीचे बारीक तुकडे करून त्यात घाला व सर्व नीट ढवळा. सर्वात शेवटी दूध घालून हलवा लगेच बाऊलमध्ये खायला द्या. देताना प्रत्येक बाऊलमध्ये वरून कोथिंबीर घाला.

दही भात

साहित्य : ४ वाटया शिजलेला भात, १ वाटी गोड दही, अर्धी वाटी दूध, चवीनुसार मीठ (साधारणत: दीड ते दोन चमचे), ३ तळलेल्या सांडग्या मिरच्या.

कृती : प्रथम शिजलेला भात एका पसरट पातेलीत किंवा ताटात पसरुन पूर्ण गार होऊ द्यावा, किंवा शक्यतो सकाळी दही भात करायचा असेल तर रात्रीच शिजवून तयार केलेला असला तर फारच बरे. गार भात पातेलीत  घाला त्यात दही, दध घालून नीट कालवा. नंतर त्यात सांडग्या मिरच्या हाताने कुस्करून घाला. भाताची चव घेऊन पहा. आवश्यकता असेल तरच त्यात मीठ घाला. सांडग्या मिरचीत मीठ असते, म्हणून मीठ घालण्याआधी नेहमी चव घेऊन पहा. हा भात केळीच्या पानावर फार चांगला लागतो.

टीप : हा भात कालवल्यानंतर फार वेळ ठेवल्यास तो फुगतो व घट्ट होता. अशावेळी त्यात पुन्हा थोडेसे दूध घालून भात कालवून खावा

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा