छोट्यांच्या पाककृती मुख्यपान
लिंबु सरबत

साहित्य : १ मोठे लिंबू, पाच चहाचे चमचे भरून साखर, अर्धा चहाचा चमचा मीठ, चिमूटभर जिरे पावडर, दोन ग्लासभर थंड पाणी, बर्फाचे ४-५ तुकडे.

कृती : लिंबू हाताने स्वयंपाकाच्या ओट्यावर गोलगोल फिरवून हाताने दाबून मऊ करावे म्हणजे त्याचा रस काढणे सोप जाते. मग सुरीने त्याचे दोन तुकडे करून एका स्टीलच्या पातेलीत फोडींचा रस पिळावा. त्यातील बिया काढून टाकाव्यात, त्यात साखर, मीठ व जिरेपूड घालून आधी थोडेसे पाणी घालून ते ढवळावे साखर विरघळेपर्यंत हलवावे, ग्लासात ओतावे आणि वर बर्फाचे खडे टाकून हे सरबत द्यावे.

कैरीचे पन्हे

साहित्य : दोन मोठया उकडलेल्या कैर्‍या, अर्धा ते एक चमचा मीठ, एक मोठी वाटी चिरलेला गुळ, पाव चमचा वेलदोडयाची पुड, थंडगार पाणी ५ ग्लास, ७-८ बर्फाचे तुकडे.

कृती : कैर्‍यांची साले काढून त्या एका स्टीलच्या पातेलीत घाला. हाताने कुस्करून त्याचा सर्व गर काढून घ्या व आतील कोया काढून टाका. त्यात मीठ व चिरलेला गूळ घालून हाताने सर्व नीट मिसळून व कुस्करून घ्या. शक्यतो कैरीच्या गराचे तुकडे न रहाता सर्व नीट मिसळून आले पाहिजे. आता हात धुवून त्यात प्रथम दोन ग्लास पाणी घालून डावाने छान ढवळून घ्या. सगळा गुभ्‍ पाण्यात नीट विरघळला पाहिजे. गूळ विरघळला की त्यात उरलेले दोन ग्लास पाणी घाला. पुन्हा सगळे नीट ढवळा, छोटया चमच्याने चव घेऊन पहा. मीठ हवे असल्यास थोडेसे मीठ घाला. आता एक मोठी गाळणी घेऊन पन्हे दुसर्‍या पातेलीत हळूहळू गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पन्ह्यात वेलदोडयाची पूड घाला. पन्हे ग्लासात ओतून त्यावर बर्फाचे एक-दोन तुकडे टाकून प्यायला द्या.

कैरीचे ताजे लोणचे

साहित्य : दोन मोठया हिरव्यागार करकरीत कैर्‍या, लोणच्याचा तयार मसाला ४ चमचे गच्च भरून, १ चहाचा चमचा भरून मीठ, तीन चमचे भरून तेलाची फोडणी.

कृती : कैर्‍या नळाच्या पाण्याने धुवून पुसून घ्याव्यात. तुम्हाला सुरी नीट वापरता येत असेल तर सुरीने त्याच्या अर्धा इंच x अर्धा इंच अशा फोडी करून घ्या नाहीतर आई किंवा ताई कडून त्या करून घ्या. त्यात मसाला घालून फोडींना नीट चोळा, चव घेऊन पहा. कैरी फार आंबट असेल तर थोडेसे मीठ लागेल, चव पाहून थोडे थोडे मीठ लागल्यास त्यात घाला की झाले तात्पुरते लोणचे तयार. आईकडून फोडणी करून घेऊन ती जर या लोणच्यात घातलीत तर ते फारच चांगले दिसेल आणि चविष्ट होईल.

टीप - हे लोणचे वर्षभर टिकविण्यासाठी नाही. लगेच फस्त करायचे आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा