बाल संस्कार

आदर्श

मग काय म्हणताय माझ्या बालमित्रांनो संपली का परिक्षा? सुट्टी लागली असेल आणि सुट्टीत काय काय करायचे कुठे कुठे जायचे याचे वेळापत्रकही तयार झाले असेल. कुणी सुट्टीला मामाकडे जाणार असेल तर कुणी आई बाबांबरोबर सहलीला, कुणी वेगवेगळया शिबीरात भाग घेणार असेल तर कुणी पोहण्याचा क्लास लावला असेल. दिवसभर नुसती धमाल करत असाल नाही? आणि खरं सांगू का अशी धमाल तर करायलाच हवी सुट्टी. कारण वर्षभर तुम्ही शाळा, शिकवणी, अभ्यास आणि परिक्षा या सर्वांमध्ये इतके गुंतलेले असता की धमाल करु म्हटले तरी वेळ नसतो.

बालमित्रांनो आजपर्यंत तुम्ही आजी आजोबांकडून किंवा पुस्तकांतून बर्‍याच गोष्टी ऐकल्या व वाचल्या असतील आणि त्यातून काही शिकलाही असाल. तुम्ही तुमच्या अवतीभवती किंवा बागेत अनेक प्राणी, पक्षी आणि अजूनही खुप काही गोष्टी पाहता, पण त्या गोष्टीमधील महत्वाची वैशिष्टे घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? तुम्ही आता या सुट्टीत मागच्या सुट्टीपेक्षा एक वर्षाने मोठे झालात आणि हेच पुढच्या सुट्टीत पण होणार मग मोठे झालात तरीपण छोटेपणातले धडे विसरायचे नाही हं!

Surya आता हेच पहा तुम्ही सुर्य रोज पाहता पण याचा कधी विचार केला का की सुर्य ज्याप्रमाणे तेजस्वी राहून सर्वांना प्रकाश देतो तसेच मी पण तेजस्वी बनण्याचा प्रयत्न करील.

Hatti तुम्ही हत्तीदादाला पाहता. त्याचे ते भले मोठे शरीर, सुपाएवढे कान आणि लांब अशी सोंड हे सर्व पाहता पण कधी त्याच्या इवल्याश्या डोळयातील तीक्ष्ण नजरेचा विचार केलाय का? तेव्हा मित्रांनो आपल्याला ह्या छोटयाश्या पण तीक्ष्ण अशा हत्तीदादाच्या दृष्टीचा आदर्श घ्यायचाय.

Sinha जंगलचा राजा सिंह. त्याचा तो रुबाब, एक डरकाळी फोडली तर जंगल हादरुन जाईन. त्याच्याकडून आपल्याला काय घेता येईल बरे? तर आपल्यामध्ये मोठी ताकद येण्यासाठी सिंहाच्या शरीरयष्टीचा आदर्श घ्यायचा.

Ghoda अतिशय चपळ असा प्राणी म्हणजे घोडा. तुम्हाला काय वाटते याच्याकडे पाह्यल्यावर? याच्याकडून आपल्याला शिकता येणारी गोष्ट म्हणजे मोठी धाव घेण्यासाठी लागणारी बळकट टाप. मग घेणार ना ह्या बळकट टापेचा आदर्श धावायला?

Garud आकाराने मोठा असून सुध्दा आकाशात उंच उंच भरारी मारणारा पक्षी म्हणजे गरुड. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर गरुडाचा आदर्श घेऊन त्याच्याकडून गगनभरारी घेण्यासाठी लागणारी झेप घ्यावी.

Mungi मुंगी ही अतिशय छोटा प्राणी. साखरेचा एक दाणा मिळवण्यासाठी ती किती धडपड करते, किती अथक परिश्रम करते. मग साखर म्हणजे हवे ते मिळवायचे असेल तर मुंगीचा आदर्श घ्यायला काय बिघडते?

Khar असे म्हणतात राम रावण युध्दाच्यावेळी पुल बांधण्यासाठी खारुताईने छोटे छोटे खडे गोळा केले आणि तिच्या या कामाबद्दल रामाने तिच्या पाठीवरुन हात फिरवून शाबासकी दिली. त्याची खूण म्हणजे खारुताईच्या पाठीवर असलेल्या पाच रेषा ज्या रामाच्या बोटांनी उठल्या असे म्हणतात. मग चांगले काम करुन सर्वांना मदत करुन खारुताईच्या पाठीचा आदर्श घ्यायला काय हरकत आहे?

कोकिळेला पाह्यल्यावर रंगाने काळा असलेला हा पक्षी त्याच्या कंठातून किती मधूर स्वर येतात. तसेच मधूर स्वर जर आपल्या कंठातून बाहेर पडले तर किती छान होईल.

तेव्हा बालमित्रांनो ह्या सर्व गोष्टी पण तुम्ही ध्यानात घ्या आणि सुट्टीत जे जे काही पाहाल अनुभवाल त्यातून चांगल्या गोष्टी घेऊन पुढे चला आणि त्या नेहमी तुमच्या जवळ असू द्या. खुप खुप मजा करा आणि पुढच्या वर्षाचे हसत स्वागत करा.

– मनिषा नवले, पुणे