MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > अंकूर

दुस-यांना मदत
टीना तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे लहानपणापासून तिचे सर्व लाड पुरवले जात होते. तिला कुठल्याही गोष्टीला नाही ऐकायची सवय नव्हती. जी गोष्ट मागितली की ती मिळायलाच हवी नाहीतर रडून ती घर डोक्यावर घेत असे. एकदा तर रात्री तिने पेरू मागितला. आता एवढया रात्री पेरू कोण आणून देणार ? म्हणून तिच्या आई-बाबांनी खूप समजावले. पण ऐकायलाच तयार नाही. शेवटी शेजारच्या जोशी काकूंच्या बागेतला पिकलेला पेरू तिच्या बाबांनी तिला आणून दिला तेव्हा कुठे टीना शांत झाली. तर अशी होती टीना.

तिच्या हट्टी स्वभावामुळे तिला कोणाशीच काही शेअर करायला आवडायचे नाही. खाऊ, पुस्तक, खेळ असे काही सुध्दा ती वर्गातल्या मुलांमध्ये शेअर करायची नाही. तसेच मुलांवर दादागिरीसुध्दा करायची. त्यामुळे टीनाला वर्गात एकही मित्रमैत्रिण नव्हते. हया गोष्टीच टीनाच्या आईला खूप वाईट वाटायचं. तिने टीनाला खूप समजावले पण काही उपयोग झाला नाही.

एकदा टीनाच्या वर्गात गौरी नावाची नवीन मुलगी आली. नवीन असल्यामुळे टीचरांनी तिला टीना शेजारी बसवले. टीना अर्थातच स्वत:हून तिच्याशी बोलायची नाही. पण गौरी मात्र तिच्याशी बोलायची आणि टीना सांगेल तसे वागायचीसुध्दा! एकदा गणिताच्या परीक्षेत गौरी नापास झाली आणि टीनाला मात्र पैकीच्या पैकी मार्कस मिळाले. टीनाने ही गोष्ट आईला सांगितल्यावर आई म्हणाली '' टीना, अग तुला गौरीला मदत करायला हवी. तुला जर एखादी गोष्ट येत नसेल तर तू तिला समजावून सांगायला हवीस." टीनाने मात्र ऐकून न ऐकल्यासारखे केले. मग मात्र आईने सांगून टाकले की जर टीना गौरीला मदत करणार नसेल तर घरात कार्टून पाहता येणार नाही हे ऐकल्यावर नाईलाजाने टीनाने गौरीला मदत करायचे ठरवले. आता टीना गौरीला रोज गणित शिकवू लागली... आणि काय आश्चर्य पुढच्या परीक्षेत गौरीला गणितात उत्तम मार्कस मिळाले. गौरीने सर्वांसमोर टीनाचे आभार मानले. पण टीनाला त्याचे काहीच नव्हते तिने तर कार्टून बंद होईल हया भीतीने मदत केली होती ना !

गौरी मात्र टीनाला मदतीची परतफेड कशी करता येईल हयाची संधी शोधत होती. एकदा टीना आणि वर्गातल्या साहिलचे भांडण झाले. टीनाने त्याला 'इडियट' म्हटले. हे शब्द टीचरांनी ऐकल्यामुळे टीनाला शिक्षा म्हणून संपूर्ण शाळा झाडायला सांगितली. टीनाला तर रडूच फूटले. एवढी मोठी शाळा कशी झाडायची आणि घरी कधी जायचं? गौरी त्यावेळेला टीनाच्या मदतीला आली. टीना आणि गौरीने संपूर्ण शाळा झाडून काढली. टीनाला त्यावेळेला गौरीच्या चांगूलपणाची जाणीव झाली. तिने गौरीचे आभार मानले आणि हसून म्हणाली, ''A friend in need is friend in deed" . तेव्हापासून दोघींची छान गट्टी तर जमलीच पण टीनानेही सर्वांना मदत करायला, मिळून मिसळून वागायला सुरूवात केली.