|
वेळेचे महत्त्व
ईशान नेहमीप्रमाणे आज सुध्दा उशीरा उठला. त्यामुळे अर्थातच त्याला बाथरूममध्ये जाऊन व्यवस्थित 'फ्रेश' होण्याइतका वेळ नव्हता की, ब्रेकफास्ट करायचा . खाली त्याच्या स्कूलबसचा ड्रायव्हर सारखा हॉर्न वाजवात होता. "अगं आई, मला बाथरूमला जायचे आहे 'टू नंबरला' लागलीये" ईशान काकूळतीला येऊन म्हणाला. "अरे मग आता शाळेतच जा की अधीच केवढा उशीर झालाय." आई म्हणाली.
शाळेच्या रस्त्यावर खूपच रहदारी असल्यामुळे शाळेत पोहोचायला उशीर झाला. ईशान शाळेत पोहोचला तेंव्हा जोशी टिचर अफ्रिकेचा धडा शिकवत होत्या. "मुलांनो, अफ्रिकेत रहाणा-या मोठया मांजरीचे नाव कोणी सांगू शकेल काय?" "आठवून बघा बर, काही लोक ह्याला जंगलाचा राजा म्हणतात."
ईशानने अभावितपणे हात वर केला.
"हं ईशान, सांग बरं कोणता आहे तो प्राणी?"
सगळा वर्ग ईशानकडे उत्सुकतेने पाहू लागला. ईशान बिचारा दोन्ही पाय एकमेकांवर ठेऊन म्हणाला, "टीचर मी टॉयलेटला जाऊ?" टीचर रागावून म्हणाल्या, "मी सिंह ऐकलाय, वाघ ऐकलाय पण टॉयलेट कुठे ऐकला नाही. गप्प खाली बस."
थोडयावेळाने छोटी मधली सुट्टी झाली. सारी मुले वर्गातून बाहेर पळत गेली. तुम्हाला माहितीये ना ईमर्जन्सी असल्यावर पळणं किती अवघड होतं. त्यातच दोन्ही पाय व पोट आवळून ईशान टॉयलेट पर्यंत पोहोचला तर भली मोठी रांग. त्याचा नंबर येईपर्यंत सुट्टी संपल्याची घंटा झाली सुध्दा. त्यामुळे ईशानला काही न करताच परत यावे लागले.
आता पराग सरांचा गणिताचा तास सुरू झाला होता. पराग सर अतिशय कडक आणि त्यातच ते आज वजाबाकी शिकवत होते. ईशानला आता कंट्रोल ठेवणे खूपच कठीण जात होते."ईशान तीन अधिक तीन किती?" सरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी ईशान म्हणाला, "सर मला टॉयलेटला जायचे आहे." सरांनी रागावून त्याला खाली बसायला सांगितले.
ईशानचा संपूर्ण दिवस असाच गेला. जिम्नॅस्टीकच्या क्लासमधे उडया मारणे कठीण गेले. संगीताच्या तासाला सगळेच सूर बेसूर भासले. आवडत्या हिंदीच्या क्लासला सुध्दा लक्ष लागले नाही.
आता शेवटचा त्रास ड्रॉईंगचा चालू होता. इतरवेळेला रंगांशी मनसोक्त खेळायला, त्यांच्यात रमायला त्याला खूप आवडायचं. पण आज मात्र ब्रश हातात पकडण सुध्दा कठीण जात होतं. त्याची अस्वस्थता मंजिरी टीचरच्या लक्षात आली. "ईशान, काही हवयं का?" टीचरेने विचारले. ईशान रडवेला होऊन म्हणाला, "टीचर मला खूप जोरात टॉयलेटला लागलीये हो. मी जाऊ का?" टीचर म्हणाल्या, "अरे आधीच नाही का सांगायचेस. आधी जाऊन ये बर"
ईशान टॉयलेटला जाऊन आल्यावर टीचरने त्याला दिवसभर काय घडल्याचे विचारले. ऐकल्यावर टीचर म्हणाल्या, "मुलांनो वेळेच्या आधी थोडे लवकर उठून आपण दिवसाची सुरूवात केली पाहिजे. आपला रोजचा सकाळचा दिनक्रम जसे की अंघोळ, टॉयलेट, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला पाहिजे. त्यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच पण घाई न होता दिवसाची सुरूवात चांगली होते दिवस अस्वस्थतेत जात नाही. मग उठणार ना उद्यापासून लवकर?" सगळ्या मुलांनी मोठयाने होsss म्हटले."
|