MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > निसर्ग > माणूस आणि सावली


माणूस आणि सावली

एकदा एक सावली, माणसावर रागावली.
सावली म्हणाली, ''मी आता चालली.''
पण.. सावलीला काही जाताच येईना.
सावलीला काही पळताच येईना.
कारण...
सावलीचे पाय, माणसाच्या पायात.
माणसाचे पाय, सावलीच्या पायावर.

सावली माणसाशी गप्पा मारु लागली.

सावली : सोड ना रे मला आता. सतत मी तुमच्या पायाशी पडलेली असते. किंवा कुठे ना कुठे पडत तरी असते.
ताट मानेने काही मला चालता येत नाही.

माणूस : अगं, आमची मान म्हणजेच तुझी मान!
तुझी का आहे वेगळी मान?

सावली : हे बघ, उगाच दुसरंच काहीबाही बोलू नकोस.
प्रश्न फक्त मानेचा नाही.
प्रश्न मानाचा आहे!
कळलं ना..?

माणूस : हं...समजलं.

सावली: मंग मला काही किंमतच नाही का रे?
कुणाचिही सावली काळीच पडते.
त्यामुळे माझ्याकडे पाहून काही ठरवताच येत नाही.
काही अंदाज करता येत नाही.
मी ही अशी!
(असं बोलतांना सावली अधिकच काळी पडली.)

माणूस : अगं, म्हणजे तुला काही कल्पनाच नाही तर....
तू आमच्यापेक्षाच काय पण सगळयापेक्षा खूप खूप मोठी आहेस.
तू जिथं पोहचतेस आणि तू जे काम करतेस, ते जगात कुणालाही शक्य नाही.
आणि...तुझ्यावरून केलेल्या अंदाजामुळे तर सारं जगच बदलून गेलं.
आम्ही तुला 'मानलं'.

सावली : काय खरं की काय?
सांग तरी नीट सारं लवकर.
माणूस : (हसला, सावकाश म्हणाला)
चंद्रग्रहण म्हणजे काय ग?
या अख्ख्या पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.
तेव्हा तुझे महत्व सा-यांना समजते.
ही पृथ्वी गोल असल्याचे आम्हा माणसांना कधी कळले?
चंद्रावरची सावली पाहूनच समजले!
आणि....
सावली : आणि...काय रे? बोल लवकर...
मला हे सारं ऐकताना खूप आनंद होतोय रे.

माणूस : आज वेळ कळण्यासाठी आम्ही हातावर घडयाळं बांधतो.
पण, फार फार पूर्वी, वेळ कशी मोजावी, काळ कसा जाणावा यासाठी, आम्हाला
प्रथम शोध लागला तो तुझ्या घडयाळाचा!

'सावलीच्या घडयाळाचा!!'
अगं, या सा-या विश्वाचं भान
आणि
या काळाची जाण
जर, आम्हाला तुझ्यामुळे मिळाली
तर,
याहून आणखी तो कोणता 'मान' तुला हवा ग?

संध्याकाळ झाली.
माणसापेक्षा सावली मोठी झाली.
माणूस हसला.
सावलीही हसली.

राजीव तांबे
rajivcopper@yahoo.co.in

राजीव तांबे हे सध्याचे मुलांचे सर्वात आवडते लेखक. राजीव तांब्यांची प्रत्येक कृती आणि काम हे फक्त आणि फक्त मुलांसाठीच असते. मुलांसाठी राजीव तांबेलिखाणाबरोबरच त्यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी, पालकांसाठी, युनिसेफ आणि अनेक 'एनजीओज' संस्थांसाठी चर्चासत्रे, प्रशिक्षण आणि सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी त्यांनी चालवलेला 'गंमतशाळा' हा उपक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राबविला जातो. वृतपत्रातल्या लेखना बरोबरच त्यांची मुलांसाठी बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. ह्यामध्ये गोष्टी, कविता, कादंब-या, निबंध लेखन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण तसेच मुलांच्या भाषा विकासावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ह्या कार्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.





 

 











 

 

 









































   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.