समज
आठवडयाभराने नीनाचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाला काय काय आणायचे ह्याची यादी ती तिच्या बाबांना समजावून सांगत होती. चॉकलेट केक, दहा मेणबत्त्या, पावभाजी आणि हो त्या दिवशी घालण्यासाठी खास सीमाचा निळा टिकल्यांचा फ्रॉक. सीमा नीनाची मावस बहीण होती. शाळेच्या स्नेहसम्मेलनात सीमाला परीची भूमिका करायची होती म्हणून तिच्या आईने खास निळा फ्रॉक आणला होता. नीनाला तो फ्रॉक खूपच आवडल्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी तो घालायचा म्हणून हटट करत होती.
नीनाच्या आई-बाबांना तिला कसे समजवावे हेच समजेना. तिच्या अश्या स्वार्थी आणि अविचारी वागण्याचा त्यांना वाईटही वाटत होते. त्यांनी परोपरीने नीनाला समजावून सांगितले पण काही उपयोग झाला नाही. उलट तिचा हटट दिवसेंदिवस वाढतच चालला होता.
होता होता वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी झोपेतून उठल्यावर नीनाला आईबाबांनी जवळ घेऊन लाड केले. गिफ्ट देण्यासाठी दोघांनीही तिला डोळे बंद करायला सांगितले. नीना खूपच उत्सुक होती. हातात खोके ठेवल्यावर घाईने तिने ते उघडले आणि आत चक्क तिच्या आवडीचे चंदेरी रंगाचे, उंच टाचेचे बूट होते. तिला खूप दिवसांपासून ते घ्यायचे मनात होते.
"आई, आज मी निळ्या ड्रेसवर हे बूट घातल्यावर किती छान दिसतील नाही ?'' नीनाने आईला मीठी मारत विचारले.
"अगं, पण नीना आज हे बूट सीमा घालणार आहे. तिने तसे आम्हाला अधीच सांगून ठेवले आहे", आईने शांतपणे नीनाला समजावले. "अगं आई पण आज माझा वाढदिवस आहे मग सीमा कशी काय माझे बूट घालणार?", नीना रागात म्हणाली.
" नीना जर तू सीमाचा नाटकाचा फ्रॉक तिचे नाटक व्हायच्या आधीच घालू शकते तर सीमा तुझे बूट का घालू शकणार नाही?" आईने विचारले.
आईच्या ह्या प्रश्नाने नीनाला निरुत्तर केले. तिची चूक तिला उमगली. आपण सीमाच्या मनाचा विचार न करता आपण तिचा स्नेहसम्मेलनाचा ड्रेस घालायला मागितले ह्या बद्दल तिला वाईट वाटले. पण सीमाने मात्र समजूदारपणे तिचा फ्रॉक काहीही तक्रार न करता घालायला दिला. त्या क्षणी नीनाने कपाटातून फ्रॉक काढून सीमाला दिला आणि तिची माफी मागितली. आईबाबांनाही खूप आनंद झाला कारण त्यांची नीना आज ख-या अर्थाने मोठी झाली होती.
- भाग्यश्री केंगे
shree@marathiworld.com
|
|

|
|
|