सोबती
मिनू, एके दिवशी तिच्या घराच्या बागेत फिरत असतांना, चाफ्याच्या झाडाखाली तिला काहीतरी हालचाल दिसली. "अगं आई, लवकर बागेत ये. बघ काय आहे", मिनू जोरात हाका मारत आईला बोलवत म्हणाली. आईने धावत येऊन पाहिले तर मैना निपचित पडलेली होती. "मिनू, अग ही मैना अजून जिवंत आहे. तिला उचलून आत आण" आईने काळजीने मिनूला सुचवले. मैनेला घरात आणल्यावर मिनूने कापसाच्या बोळ्याने पाणी पाजले. तिला थोडी तरतरी आली. मिनू मैना पक्ष्याला प्रथमच इतक्या जवळून पाहत असल्यामुळे जरा सुरुवातीला घाबरली होती. पण आता तिला बरे करायचे आहे म्हणून काळजी घेत होती. दोन दिवसांनी मैना पुष्कळच टवटवीत दिसू लागली. घरात थोडीफार इकडे तिकडे फिरु लागली.
मैनेची हालचाल बघून मिनूला खूपच आनंद झाला. तिने मैनेचे नाव प्रेमाने मिठू ठेवले. तिला चांगले वाटावे म्हणून बागेतून काडया-पाने गोळा करुन तिच्यासाठी छानसे घरटेही तयार केले. मिठू घरात फिरुन आली की घरट्यात जाऊन बसायची. शाळेव्यतिरिक्त मिनूचा संपूर्ण वेळ मिठूशी खेळण्यात जायचा. तिला मिठूचा खूपच लळा लागला होता. आता मिठूला चांगले उडता येऊ लागले होते. आईने मिनूला समजावून सांगितले, " मिनू राणी, मिठूला आता चांगले उडता येऊ लागले आहे. ती कुठल्याही क्षणी आपल्या घरातून उडून जाऊ शकते. समजा ती उडाली तर अजिबात नाराज व्हायचे नाही." मिनूसाठी हे कठीणच होते.
दुस-या दिवशी सकाळी घरटयात जाऊन पाहिले तर मिठू तेथे नव्हती. घरभर तिला शोधले पण सापडली नाही. मिनूला कळून चुकले की आता मिठू आपल्याला परत कधीच भेटणार नाही. तिच्या सवंगडयांना भेटायला ती आकाशात दूरवर उडाली आहे. मिनू उदास झाली. तिचा रोजचा वेळ आता कंटाळवाणा जाऊ लागला. मिठूची खूपच आठवण येत असे. असेच दिवस चालले होते. एके दिवशी सकाळी मिनूला खिडकीत ओळखीचा आवाज आला. डोळे उघडून पाहिले तर मिनू मोठयाने किंचाळलीच," अय्या मिठू, तू?'' मिठूही आनंदाने मिनूच्या गादीवर बसली. मिनूला तर इतका आनंद झाला होता. ती मनसोक्त तिच्या छोटया मैत्रिणीशी खेळली. थोडया वेळाने मिठू खिडकीतून दूर उडून गेली. ते पाहिल्या आई म्हणाली," मिनू मला तुझे कौतूक वाटते. पिंज-यात डांबून न ठेवता तू मिठूला मोकळे ठेवलेस त्यामुळेच ती तुझ्याकडे परत आली. मला खात्री आहे आता मिठू आपल्याकडे नेहमीच येत जाईल". मिनूने आईला घटट मिठी मारली.
- भाग्यश्री केंगे
shree@marathiworld.com