भरली वांगी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य - १/२ किलो वांगी, १ मोठा कांदा, ३ चहाचे चमचे भरून किसलेले कोरडे खोबरे, मूठभर भाजलेले दाणे, २ चहाचे चमचे भरून भाजलेले तीळ, दीड चहाचा चमचा तिखट, २ चहाचे चमचे गोडा मसाला, एका लहान लिंबाएवढा गूळ, अर्धा इंच आले, ३ चहाचे चमचे ओले खवलेले खोबरे, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, १ चहाचा चमचा चिंचेचा दाट कोळ. फोडणीसाठी दीड डाव गोडेतेल, हळद-हिंग-मोहरी प्रत्येकी १ चहाचा चमचा.

कृती - प्रथम वांग्याच्या देठाला विरुध्द बाजूने काटकोनात चार चिरा द्याव्यात त्या अशा की वांग्याच्या फोडी न होता वांगे अख्खेच राहील. वांगी लगेच पाण्यात टाकावीत म्हणजे काळी होत नाहीत. कांदा किसून, परतून घ्यावा, खोबरे, दाणे व तिळाचे कूट करून घ्यावे. परतलेला कांदा, खोबरे-तीळ-दाणे यांचे कूट मीठ, तिखट, गोडा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ, हे सर्व पदार्थ एकत्र करून हा मसाला वांग्यांच्या चिरांत भरावा. एका पातेल्यात दीड डाव तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात मसाला भरलेली वांगी घालावी. थोडासा पाण्याचा शिपका मारावा, वर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावे. मंद आचेवर वांगी शिजवावीत. भाजी तयार झाल्यावर वाढताना वरून खोबरे व कोथिंबीर घालावी.

टीप - भरल्या वांग्याच्या भाजीसाठी वांगी काटेदार व लहान लहान घ्यावीत म्हणजे फार बिया नसतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF