महाराष्ट्रातील अभयारण्ये मुख्यपान

 

रेहेकुरी काळवीट अभयारण्य

हरणांमध्ये दिसायला सुंदर, चपळ, वेगवान, म्हणजे कृष्णमृग अर्थात काळवीट. या काळवीटांच्या संरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात रेहेकुरी येथे २.१७ चौ.कि.मी क्षेत्रात इ.स १९८० मध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आली.

गवताळ कुरणे व बाभळीच्या वनाने अभयारण्याचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. हिवर, खैर, तरवड, बाभूळ, बोर, कडुलिंब, हे येथील प्रमुख झाडे आहेत. तर मारवेल, पवन्या, फुली, शेड्या, कुसळी, डोंगरी, या गवती वनस्पती देखील येथे आढळतात.

काळवीट, लांडगे, कोल्हे, तरस, चिंकारा, साळींदर, मुंगुस, खोकड हे वन्य प्राणी तर धामण, नाग, अजगर, सरडे, घोरपड हे सरीसृप वर्गातील प्राणी येथे बघायला मिळतात. मोर, लावा, तितर, माळढोक, सातभाई, कापशी, घार, सुतार, चंडोल, भारद्वाज हे पक्षी देखील येथे आहेत.

रेहेकुरी येथे निरीक्षण कुटी असून विश्रांतीसाठी दोन कक्ष व युथ हॉस्टेल मध्ये पर्यटकांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. सिद्धटेक हे अष्टविनायक यात्रेतील प्रमुख गणपती मंदिर येथून ४० किमी अंतरावर आहे, तर राशीन येथे जगदंबा देवीचे मंदीर २५ किमी अंतरावर आहे. मार्च ते मे ह्या कालावधीत या ठिकाणी पर्यटनाचा आनंद अनुभवता येतो.

 

संपर्क :

वनसंरक्षक, वन्यजीव, पुणे
स.नं. ४९, वनवसाहत, नरेन हिल्स हौसिंग सोसायटीजवळ
वानवाडी, पुणे.
दुरध्वनी : (०२०) २६८५११४३

कसे जाल ?

रस्त्याने : पुणे – पाटस – दौंड – वालवड मार्गे रेहेकुरीस जाता येते. पुणे (१६० कि.मी ), श्रीगोंदा (३५ कि.मी), वालवड (३ कि.मी).

रेल्वेने : पुणे – सोलापूर मार्गावरील दौंड हे जवळचे रेल्वे स्टेशन (८० कि.मी ) तर श्रीगोंदा रोड रेल्वे स्टेशन (३८ कि.मी)  आहे.

विमानाने : जवळचे विमानतळ लोहगाव (पुणे १६० कि.मी)

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF