सखी

संगोपन

आनंद निकेतन ‘प्रयोग’ शाळा


चित्राच्या पलीकडले…

Chitrapalikade टी. व्ही, कॉम्प्युटरच्या विळख्यातली मुलं संवेदनक्षमता हरवून बसली आहेत, अशी तक्रार आपण करतो. आपणच त्यांना सुरक्षित कप्प्यात बंद करून ठेवतो आणि त्यांनी संवेदनक्षम असावं, असेही म्हणतो. अर्थात संवेदनक्षम असण्यासाठी प्रत्येक अनुभव स्वत:च घेतलेला असणं गरजेचं नाही, पण आपल्या आजुबाजूला घडणा-या घटना, वर्तमानपत्रातील बातम्या, छायाचित्रं, इतरांचे अनुभव आपल्याला काही तरी सतत सांगत असतात. त्यांच्याकडे उघडय़ा डोळ्यांनी, सजगतेने बघण्याची दृष्टी मात्र पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणूनही आपणच मुलांना द्यावी लागते. त्यामुळे त्यासाठी मुळात आपण आधी संवेदनशील असणं गरजेचं आहे.

मूल भाषा शिकतं, तेव्हा ते सतत भाषा वापरण्यासाठी उत्सुक असतं, पण पुढे लिखाणाची वेळ येते, तेव्हा मात्र मुलं कंटाळा करू लागतात. त्यात निबंधाचे साचेबंद विषयही त्यांना वैताग आणतात. म्हणून आनंद निकेतनमध्ये आम्ही त्यापलीकडे जायचा प्रयत्न करतो. यातूनच निबंधाबरोबर पत्रलेखन, संवादलेखन, बातमी तयार करणं, कवितालेखन, चित्रवर्णन असे अनेक प्रकार शाळेत भाषाविकासासाठी वापरण्यात येतात. प्रस्तुत लेख हा अशाच एका चित्रवर्णनाच्या तासाला आलेल्या अनुभवावर आधारलेला आहे.

‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाच्या मुखपृष्ठावरील चित्र मी मुलांसमोर ठेवलं. यात एक मध्यमवयीन कष्टकरी माणूस महानगरात आपल्या जीवनाची संघर्षमय वाटचाल करताना दिसतो. सोबत त्याची छोटी मुलगीही आहे. हे चित्र आठवीच्या मुलांसमोर ठेवलं, तेव्हा मुलं काय टिपतात, याविषयी उत्सुकता होती. आनंद निकेतनचा ‘समान शिक्षण’ (Common School) या संकल्पनेवर विश्वास असल्यामुळे आमच्या प्रत्येक वर्गात सर्व उत्पन्न गटांमधील मुलं समाविष्ट असतात. हे चित्र विविध समाज गटांतून आलेल्या मुलांना कशा प्रकारे आवाहन करते, हे पाहण्याचं कुतूहल होतं.

मुलांनी चित्र पाहिलं आणि सर्वजण लिखाणात बुडून गेले. त्यांचे लिखाणाचे कागद घेऊन मी शिक्षकांच्या दालनात आले आणि वाचताना मलाही भरून आले. आमच्या दालनात सर्वच शिक्षिका आपापले अनुभव एकमेकींना सांगतात. त्यानुसार हे कागद मी टेबलावर ठेवल्यावर सर्वानीच ते आवर्जून वाचले आणि त्याही माझ्या इतक्याच आनंदित झाल्या.

चित्र कुठल्या गावातलं आहे, ते काही त्यावर लिहिलेलं नव्हतं, पण यश गुजराथीने चित्रातला तपशील अचूक वाचत लिहिलं होतं- ‘मुंबई म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ती श्रीमंतांची मुंबई, पण त्याच मुंबईत दुसरीकडे आहेत ते श्रमजीवी बहुजन लोक! आपल्या जीवावर उदार होऊन पैसा मिळवण्यासाठी धडपडणारे डोंबारीही या मुंबईत आहेत. त्यातीलच एक हा असावा. आपल्या शाळेत जाण्यायोग्य वयातील लहान मुलीला शाळेत न टाकता तो खेळ करायला बरोबर घेऊन निघाला आहे. त्याच्या खांद्यावर असलेल्या कावडीतील एका पारडय़ात ही मुलगी बसलेली आहे. तिचं नाक वाहतंय. तिनं घातलेला फ्रॉक तिच्या अंगापेक्षा मोठा आहे.’

यशला मुंबईतला विरोधाभास जाणवला होता. शाळेत जाण्यायोग्य वयातील मुलीचं शाळेत जाऊ न शकणं, त्यानं टिपलं होतं. मुलीचा फ्रॉक तिच्या मापाचा नाही, म्हणजे नक्कीच तो तिचा नसणार, हेही त्याला जाणवलं. आपल्या मुलीच्या पोटात चार घास पडावे, म्हणून बापाची चाललेली वणवण, गर्दीतून वाट काढणं या गोष्टीही त्याला काही सांगत होत्या.

वीणा लिहिते, ‘कुठेतरी पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन ढोलकं वाजवून हा माणूस पैसा मिळवत असेल आणि ती चिमुरडी त्याला साथ देत असेल.’ या छोटय़ा मुलीवर अकाली पडलेली जबाबदारी आणि त्याची दाहकता वीणाच्या मनाला स्पर्श करून गेली होती.

अमितला हे चित्र पाहून आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडीतून घेऊन जाणारा श्रावणबाळ आठवला. त्यानं लिहिलं होतं, ‘या चित्रात वडिलांचं मुलीवर किती प्रेम आहे, ते समजतं. हे चित्र मुंबई शहरातील असावं. राहायला जागा नाही, म्हणून त्यांना असं जगावं लागतंय.’ ते भर रस्त्यावरून वाट काढीत चालले आहेत.

चित्रातील बारकावे अचूक टिपत अक्षयने नोंदवलं होतं – ‘चित्रातील माणूस काळा आहे, कारण त्याला उन्हात काम करावं लागतं. त्याचा डोंबाऱ्याचा खेळ चालू राहावा, त्याला पैसे मिळावे व त्याचं स्वत:चं घर व्हावं, असं मला वाटतं.’ स्वत: निम्न आर्थिक स्तरातल्या घरातून आलेल्या अक्षयला आपल्या आई-वडिलांचे कष्ट यात दिसत असावेत.

गार्गीने लिहिलं की, कामानिमित्त हे कुटुंब दुस-या गावी जातं व ही मुलगी मागे वळून आपल्या आधीच्या घराकडे बघत असेल, असं वाटतं. मुलीच्या भविष्यासाठी बापानं निग्रहाने आपल्या आधीच्या मुक्कामाकडे पाठ फिरवली (गार्गीचे वडील नोकरीनिमित्त परदेशी राहतात.), पण मुलीला मात्र आधीच्या घराशी असलेलं नातं तोडणं कठीण जातं.

खरं तर सर्वाचीच निरीक्षणं सूक्ष्म, नेमकी आणि चित्राच्या पलीकडे जाऊ पाहणारी आणि आपल्या अनुभवविश्वाशी चित्रातला अनुभव ताडून पाहणारी. त्यातल्याच या काही नोंदी!

या सगळ्या लेखनाची भाषा साधी, सरळ आणि म्हणूनच मनाला भिडणारी आहे. अलंकारिक, शब्दबंबाळ लेखनापेक्षा मुलांना नेमका आशय मांडणं आवडतं. चित्रातील कारुण्य त्यांच्या मनाला भिडतं व दाहक वास्तवाला ती संवेदनक्षम मनाने सामोरी जातात.

पूर्वी एकच शुद्धोधन आपल्या मुलाला दु:खाचा वाराही लागू नये, अशी व्यवस्था करीत होता. आता घराघरांत आपण सर्व पालक शुद्धोधन होत आहोत आणि पुढे मुलांनी मात्र श्रावणबाळ व्हावं, अशी अपेक्षा करीत आहोत. समाजात बधिरीकरणाची प्रक्रिया इतकी जोरात सुरू आहे की, आसपासच्या परिस्थितीविषयी उदासीन राहणं, हाच सर्वाचा स्वभाव बनला आहे. अशा परिस्थितीत पालक म्हणून आपले किंवा थोडक्या प्रयोगशील शाळांमधील शिक्षकांनी केलेले प्रयत्न कुठवर पुरे पडणार, असे म्हणायला जागा आहे; पण आपली पणती पेटवून बघायला काय हरकत आहे? आणि यासाठी वेगळं काही करायचं नाहीय, फक्त आपलं आणि मुलांचं मन जागं ठेवायचं आहे.

– ‘आनंद निकेतन’ टीम