तेरे फुलोंसे भी प्यार, तेरे काटोंसे भी प्यार

C Ramchandra रामचंद्र नरहरी चितळकर ऊर्फ संगीतकार सी. रामचंद्र यांच्या विविध प्रकारच्या गीतांचा आस्वाद आपण या लेखमालेतून घेत आहोत. धांगडधिंगा स्वरूपातील गाणी, क्लब डान्सचे फडकते गीत, विनोदी गाणे अशी विविध प्रकारची गाणी देणारे सी. रामचंद्र यांची शास्त्रीय गाणी, अंगाई गीत, विरह-मिलन गीत या प्रकारची गीते बांधण्यातही मास्टरी होती. त्यामुळेच त्यांच्या गाण्याइतके वैविध्य इतर संगीतकारांमध्ये खूप कमीवेळा आढळून येते. अशा गाण्यांचे ठीक आहे,पण भजन अगर भक्तिगीत किंवा अध्यात्माचे तत्वज्ञान सांगणारे गीत सी.रामचंद्र यांनी संगीतात बांधले होते का ? असा प्रश्न जेव्हा मला एका नवपिढीतील संगीतप्रेमीने विचारला, तेव्हा पटकन आठवले ते ‘नास्तिक’ मधील ‘तेरे फुलोंसे भी प्यार’ हे गीत. “सावरियाँs रे तेरी मीरा को भूल न जाना” हे ‘आँचल’ चित्रपटातील गीतही आवर्जून आठवते. कारण ते गीत ऐकल्यावर कोणीही पटकन म्हणेल की, “लतादीदींचा किती छान आवाज लागला आहे.” परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, ते गीत दीदींनी गायलेले नसून सी.रामचंद्र यांनी सुमन कल्याणपूरकडून अगदी दीदींसारखेच गाऊन घेतले होते.

देशभक्ती व भक्तिगीते या प्रकारची गीते लिहिण्यात कवी प्रदीप यांचा हातखंडा होता आणि सी.रामचंद्र आणि कवी प्रदीप यांचे सूर (की सूत) चांगले जमून गेल्यामुळे कवी प्रदीप यांची अशी गाणी म्हणजे कानसेनांसाठी अनमोल खजिनाच ठरली आहेत. अशाचखजिन्यातील एक अनमोल गीत म्हणजे ‘नास्तिक’ चित्रपटातील हे गीत होय. गीताची सुरूवातच लतादीदी एका हळुवार मायन्याने करतात आणि नंतर एक छान लय पकडून ते गीत पुढे सुरू राहाते. त्या गीतातील प्रत्येक शब्द हा किती अर्थपूर्ण आहे हे गीत काळजीपूर्वक ऐकल्यावरच लक्षात येते. गीताची सुरूवात ज्या दोन ओळींनी होते त्या ओळी म्हणजे-

“अमृत और जहर दोनो है सागर में एक साथ,
मंथन का अधिकार है सबको फल प्रभू तेरे हाथ”

अमृतमंथनाच्या पौराणिक कथेचा आधार घेऊन कवी प्रदीप यांनी गीतेमधील या दोन ओळीतून मानवाने फक्त कर्म करावे याचे स्मरण करून दिले आहे. समुद्रामध्ये अमृत आणि विष हे दोन्ही असतात. (समुद्र) मंथन करण्याचा (कर्म करण्याचा) अधिकार देवांना व दानवांना,चांगल्या व वाईट प्रवृत्तीच्या लोकांना… सर्वांना आहे. पण (या मंथनाचं) फळ देण्याचा अधिकार मात्र फक्त परमेश्वराच्या हातात आहे.

१९५४ साली प्रदर्शित झालेल्या फिल्मीस्तानच्या ‘नास्तिक’मधील या गीताची सुरूवात लतादीदी यावरील दोन ओळींनी करतात आणि पुढे त्या गीत सुरू करतात.

“तेरे फुलोंसे भी प्यार
तेरे काटोंसे भी प्यार
जो भी देना चाहे दे दे सरकार
दुनियाके तारणहार”

Pradeep अत्यंत साध्या आणि सोप्या हिंदी भाषेत कवी प्रदीप यांनी गीताचं हे ध्रृपद लिहिलं आहे. (हे परमेश्वरा), तुझी फुलंपण आम्हाला प्रिय आहेत व तुझ्या (दुनियेतील) काटयांवरही आम्ही प्रेम करतो. तुझ्या इच्छेला जे जे येईल ते आम्हाला दे. (कारण) या दुनियेचा (आणि ओघाने आमचाही) तूच तारणहार आहेस. (सुख व दु:ख यासाठी फुले व काटे यांची उपमा वापरली आहे.)

“चाहे सुख दे या दुखचाहे खुषी दे या गम
मालिक जैसेभी रखेगा वैसे रहलेंगे हम
चाहे हसी भरा संसार दे या आंसुओंकी धार
जो भी देना चाहे दे दे सरकार”

(हे परमेश्वरा), हवं तर आम्हाला सूख दे नाही तर दु:ख दे (पण तू काहीही दिलंस तरी) जसं तू आम्हाला ठेवशील तसेच आम्ही राहू. (मग आमच्या वाटयाला) हसती-खेळती दुनिया येवो अगर अश्रूंची धार येवो. हे दुनियेच्या पालनहार, जे तुला द्यावयाचे आहे ते तू आम्हाला दे.

संत तुकारामांच्या ‘आलीया भोगासी असावे सादर…’ या अभंगातील भाव आणि या कडव्यातील भाव एकमेकांशी खूपच जवळीक साधून आहेत आणि त्याच आशयाचं पुढील कडवं बघा…

“हमको दोनो है पसंद तेरे धूप और छॉव
दाता किसी भी में ले चल जिदंगी की नाव
चाहे हमे लगा दे पार, डुबा दे चाहे हमे मझदार
जो भी देना चाहे दे दे सरकार
दुनिया के तारणहार…”

C Ramchandra तुझे कडक ऊन किंवा सावली (अर्थातच सुखं आणि दु:खे) हे दोन्हीही आम्हाला पसंत आहेत. हे परमेश्वरा, आमच्या जीवनाचे तारू तू कोणत्याही दिशेला घेऊन चल. (त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणावयाचं नाही) आणि एकदा तुझ्या हातात या नावेची सूत्रे आल्यावर मग तू आम्हाला हवं तर पैलतीरावर ने अथवा वाटेतच बुडव. (म्हणजे आम्हाला मौक्ष दे किंवा जन्ममृत्यूच्या फे-यात अडकव) आम्ही तुला याबाबत काहीच बोलणार नाही. कारण तू या दुनियेचा आणि ओघानेच आमचाही तारणहार आहेस. कवी प्रदीप यांची सर्वस्व आहेस.साध्या, सुटसुटीत पण यमक साधणा-या शब्दातील ही रचना गीताच्या अर्थाच्या अनुषंगाने सी.रामचंद्र यांनी दिलेलं संगीत दीदींचा मधुर स्वर यामुळे हे गीत १९५४ सालातील आजही ऐकावंसं वाटतं. एका मधुर गीताचा आनंद देतं. गीताची सुरूवात मंजुळ, मधुर बासरीच्या आलापीने होते. पुढे त्याला भजनाचे एक हळुवार, प्रसन्न संगीत स्वर सी.रामचंद्र यांनी बहाल केलेत.

या ‘नास्तिक’ चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते आय.एस.जोहर यांनी केलं होतं तर चित्रपटाचा नायक (नंतरच्याकाळात खलनायक म्हणून गाजलेला) अजित होता. नलिनी जयवंत नायिका होती. या चित्रपटातील ”देख तेरे संसार की हालत”, “गगन झनझना रहा”, “कान्हा बजाये बासुरी” इत्यादी नऊच्या नऊ गीतं लोकप्रिय झाली होती. या गीतांपैकीच हे एक गीत. सी.रामचंद्रांच्या संगीताचा हा असाही एक अविष्कार!

– पद्माकरजी पाठकजी, सातारा