नदी/तलाव

गाडेश्वर तलाव

Gadeshwar talaw शांतता! ही अनेक प्रकारची असते असं आपल्या सर्वांना माहीत आहे. नीरव शांतता, स्तब्ध शांतता, कीं ऽऽ शांतता आणि स्मशान शांतता! यापैकी नीरव शांततेचा अनुभव फारसा प्रवास न करता यावा असं मनापासून वाटत असेल तर पनवेलजवळ एक जागा सांगतो. ट्रेकर्स आणि वेगळया वाटेचे भटके यांना माहीत आहे, पण सर्वांसाठी सांगतो. ती जागा आहे, गाडेश्वर तलाव.

अलिकडे ट्रेकिंग करणे ज्यांना शक्य नाही पण फिरायला मात्र आवडते अशांचा स्वर्ग म्हणजे, गाडेश्वर तलाव. चहूकडे नीरव शांतता, पक्ष्यांची किलबिल आणि भणाण वारा! पनवेल एस्. टी. स्टँडवरून सकाळी गाडेश्वरला जाण्यासाठी बस सुटते. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम. मुंब्रा-पनवेल रस्त्याला पनवेल शहरात शिरण्याआधी डावीकडे एक नवा रस्ता झाला आहे. ‘स्वप्ननगरी’ अशी पाटी या जंक्शनवर अलिकडे लावलेली आहे. या रस्त्यावरून तडक नेरे गावाचा रस्ता पकडावा. नेंरे गावात एक जुने मंदिर आहे. येथून पुढे सात-एक किमी. वर एकदम गाडेश्वर तलाव सामोरा येतो.

इतर कोणत्याही ठिकाणी फारसे न पाहिलेले दोन पक्षी पाहीले. जांभळा शिंजीर (रूक्रिब्व्रुम्) आणि तारवाली दोन्ही पक्षी जांभळया व निळया छटा घेऊन आलेले. निलपंखाचा रंग पाहून माडगुळकरांनी लिहीलंय की ‘स्वातंत्र्य या गोष्टीचा रंग बहुदा निळा असावा.’ तसंच मला वाटलं.

गाडेश्वर तलाव म्हणजे माथेरानच्या सनसेट पॉईंटवरून खाली नजर फिरल्यावर जो दिसतो तोच. अतिशय विस्तीर्ण अशा या तलावावर वा-याच्या झुळुकी आणि शांतता याचा अनुभवच घेतलेला बरा. एका तीरावर मातीचा बंधारा ज्याच्यावर बसून तलावाच्या पाण्याकडे एकटक बघावं आणि ताबडतोप एखादी कविता लिहावी आणि पलिकडच्या तीराला चंदेरी, नाखींद, पेब आणि माथेरान यांचे सुळके. पिकासोकडे एक घुबड होतं. याने काही चांगली कलाकृती केली की तो ती, या घुबडाला सांगे. मात्र हे घुबड एका जागी ढिम्म बसून असे. ते पाहून पिकासो म्हणाला, आपण फार सृजनशील आहोत असा गर्व झाला की हे घुबड माझं गर्वहरण करतं. तसे हे डोंगर पाहून आपल्या किडुकमिडुकपणाची लाज वाटू लागते. याही एका कारणासाठी बाहेर पडावंच असं माझं प्रांजळ मत आहे.

तलाव पाहून परत पनवेलकडे येताना वाटेत गाडेश्वराचे मंदिर आहे. छोटेखानी. पण त्याचं स्थान मन मोहून टाकतं. गर्द राई, मधे मंदिर आणि मागे गाढी नदी. वेळ नसूनही नदीवर गेलोच. टार्झनच्या चित्रपटात असतं तसं जंगल आहे. इथे एक विसरलो. गाडेश्वर तलावापासून तसंच पुढे गेलं की, मालदुंगा नावाचं नितांत सुंदर खेडं आहे. आपल्या स्वप्नातल्यासारखं… सुंदर, नीटस! गावात पोहोचल्या पासून माथेरानची एक अवाढव्य बाजू आपल्यासमोर मोठ्ठया हत्तीसारखी ठाकते.

मनाच्या गाभ्यापासून संपूर्ण शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर मालदुंगाला जा! नदीचा झुळझुळ आवाज. गर्द राई, ओले पाय… एक स्वत:ला विसरायला लावणारा अनुभव! परत येताना नेरे सोडल्यावर उजवीकडे एक फाटा आहे. हा शांतीवन नावाच्या एका नंदनवनाशी घेऊन जातो. मुद्दामहून जावे असे हे एक ठिकाण आहे.

एका दिवसात स्वत:च्या वाहनाने सुंदर शांतता अनुभवायची असेल तर गाडेश्वर-मालदुंगा आणि शांतीवन आदर्श ठिकाण आहे. Location Icon

– प्रसाद टिळक

नाढाळ तलाव

Nadhal talaw ‘मनगटात ताकद, हातात दुधारी तलवार आणि पायाखाली परीच्या दातासारखा शुभ्र अबलख घोडा, असा जर योध्दा असेल तर त्याला फक्त यशाचाच स्पर्श होणार…’- जी. ए. कुलकर्णींच्या समर्थ लेखणीतून उतरलेलं हे वाक्य. आणि याच धर्तीवर मनात नवा प्रदेश पाहण्याचं अपार कुतुहल, पाठीवर भरलेल्या पाठपिशव्या आणि एक कॅमेरा व दुर्बिण असेल तर त्यालाच पर्यटनाचा आनंद लाभणार असं अनिवारपणे म्हणावसं वाटतं. पर्यटन वेडयांसाठी महाराष्ट्र हा असाच एक रसरसलेला, नवनव्या जागांनी सजलेला अनोखा प्रांत आहे.

अनादी काळापासून ते आजपर्यंत आपण प्रवासात किंवा ट्रेकिंगमधे ‘ब्रेक’ घेत असू तर तो पाण्याच्या कोणत्याही स्वरूपातील साठयाच्या परिसरात. पायपीट करता करता घटकाभर विश्रांती ही पाण्याचं थंड सान्निध्य असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भले तो ओढा असो, धबधबा असो समुद्र किंवा नदी असो किंवा एखादा रमणीय तलाव असो.

दोनचार बलदंड माणसांसोबत एखादी १८ वर्षांची युवती दिसली तर कसं वाटेल, तसंच मला नाढाळ तलाव पाहिल्यावर वाटलं. बाजूला प्रबळ व इर्शाळगड असे बळकट किल्ले आणि पायथ्याशी सुंदर आणि छोटासा नाढाळ तलाव. काहीजण झोपेतून नुकतेच उठल्यावरही सुंदरच दिसतात. (आणि काही मेकप करूनही हिडिंबेसारखे) तसंच काहीसं नाढाळ तलावाने दर्शन दिल्यानंतर वाटलं.

मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईपासून पुढे पनवेलपर्यंत (आपल्या वाहनाने जास्त श्रेयस्कर) आलात की तसेच पुढे व्हा. थोडे किमी. गेल्यावर डावीकडे गांधी टोपीसारखा आकार धारण करणारा ईशाळगड सोबत करीत राहतो. पनवेलपासून चौककडे येऊ लागलात की चौक फाटयाच्या अलिकडे अदमासे एक किमी. वर एक रस्ता डावीकडे फुटतो. डावीकडे हाय वे लगतच ‘नाढाळ गाव’ अशी पाटी आहे. डाव्या बाजूस जाणाऱ्या या कच्च्या रस्त्याने अंदाजे दोन-एक किमी. वर रस्ता थांबतो. येथेच तलावाची भिंत आहे. (बांध) वाहने येथे ठेवून तलावाच्या भिंतीवर चढून आलात की साक्षात ही निसर्गसौंदर्यवती आपल्याला दर्शन देते.

समोरच तलावाचा दुसरा काठ आणि मागे वडीलधारी व्यक्ती उभी राहावी तसा ईशाळगड! ईशाळगडाच्या पायथ्याच्या तलावाच्या त्या बाजूस चांगली झाडी आहे. आजूबाजूचे गावकरी आपल्या गुरांना पाणी पिण्यासाठी बांधाच्या उजवीकडील वाटेने तलावावर आणतात. याच वाटेने उतरून ईशाळगडाच्या पायथ्याजवळ चालावयास लागावे. आल्हाददायक हवा, वाऱ्याचा खेळ, पाण्याचा उत्फुल्लपणा आणि काठावरच्या पक्षांचा किलबिलाट यामुळे शिणलेल्या मनाला जो काही उत्साह येतो, त्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही.

इथे रॉबिन साळुंक्या, डोमकावळे, बुलबुल बरेचसे कोतवाल आणि वेडे राघू या पक्षांव्यतिरिक्त टिटवी, हेरॉज, असंख्य बगळे, असे पाणपक्षीही मुबलक पाहायला मिळतात. तलावाच्या या तीरावर जंगलात असल्याचा संपूर्ण आभास निर्माण होतो. पावसाळयात व हिवाळयात ही झाडी जरा जास्तच लोभसवाणी असते. रात्री पाण्यावर आलेल्या जंगली जनावरांच्या पाऊलखुणा काठावरच्या चिखलात उमटलेल्या असतात. याशिवाय बाजूच्या झाडोऱ्यात असंख्य हुप्पे वानर पाहायला मिळतात. माकडे हा आधीच एक चौकस प्राणी असल्याने आपण त्या तीरावर पोहोचताच बाजूची सर्व झाडे माकडांनी फुलून जातात. जेवणखाण बरोबर नेले असल्यास कृपया या तीरावर ते डबे सोडण्याच्या फंदात पडू नका.

नाढाळ तलावाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, येथे बऱ्याच रंगाची फुलपाखरे व कीटक पाहायला मिळतात. त्यामुळे फोटोग्राफीचीही हौस पुरी करायची असेल तर नाढाळसारखी जागा नाही. चौक फाटयापासून येथपर्यंत चहा-फराळाची सोय नाही. परंतु पुण्याला जात असाल तर तासभर विश्रांती घ्यायला येथे वाट वाकडी कराच.

जगाच्या एका कोपऱ्यात असल्यासारखी शांतता, समोर ईशाळगड व नाढाळ तलावाच्या पाण्यात त्याचे नितळ प्रतिबिंब. बऱ्यापैकी जंगल आणि मन:शांतीचा गाढ अनुभव घ्यायचा असेल तर या अलौकिक सुंदर जागेवर यायचा संकल्प कराच!

– प्रसाद टिळक