नदी/तलाव

काकूली तलाव

Kakuli talaw ‘गाव संपले की थोडयाच अंगाने निसर्ग सुरू होई…’ कोसलामधलं हे वाक्य फँटसीच्या अंगानं जाणारं असलं तरी फारच खर्रर आहे, याची जाणीव गेल्या काही वर्षात पुण्या-मुंबईच्या सगळयाच निसर्गप्रेमींना झाली आहे, हे अमान्य करून चालणार नाही. खरोखर निसर्ग बघायचा, अनुभवायचा आणि जाणवायचा तर शहराबाहेर पडावंच लागतं. मग त्यातही आपण शोधेतो, कमी वेळेत पोचावं, जास्त वेळ निसर्गाच्या सान्निध्यात राहावं.

अशाच एका निसर्गरम्य जागी पुन्हा एकदा जाण्याचा योग आला. जागा होती, काकूली तलाव. डोंबिवलीहून पनवेलकडे जाताना कल्याण शीळ रोडवरून जावं लागतं. या रस्त्याला शीळ फाटयाकडे जाण्यासाठी निघाल्यावर अंदाजे पाच-सात किलोमीटरवर जुना काटई जकात नाका लागतो. या नाक्यासमोरच बदलापूर अंबरनाथ एम्.आय्.डी.सी.ला जाणारा रस्ता आहे. याला पाईपलाईन रोड असंही म्हणतात. या रस्त्यावरून अदमासे सात-आठ कि.मी.वर गेलो की एका जागेवर उजवीकडे एक मातीचा रस्ता पाईपलाईनच्या खालून गेलेला दिसतो. या रस्त्यावरून दिड-दोन किलोमीटरवर एक नाल्याचं पात्र आहे. गाडया येथे ठेवून नाला पार करून गेलात की थोडी चढण लागते. चढण पार केलीत की अचानक अलिबाबाची गुहा उघडावी, तसा एक मोठा तलाव सामोरा येतो. हाच काकूली तलाव.

पाईपलाईन खालून जाणा-या रस्त्यातून आम्ही स्कूटर्स घातल्या आणि अचानक खूप दूर गावात आल्याचा भास झाला. हळुहळू गाडया चालवत पुढे गेलो तर प्रचंड प्रामणात कोतवाल (drongo) भेटले. कोतवाल जोडीने राहता म्हणे. पण इथे तर चिमण्यासारखे कोतवाल! पुढे जाऊन गाडया ठेवल्या आणि कॅमेरे आणि दुर्बिणी काढून जागीच ठाण मांडलं. निसर्गमैत्री असताना पक्षीनिरिक्षण, ट्रेकिंग, वनस्पतीनिरिक्षण, आकाशदर्शन, सगळं काही एकत्र आणि मनमुराद करता येतं.

शांत बसणं घरात जमत नसलं तरी बाहेर निसर्ग करवून घेतो. गप्प बसलो. अचानक टिटवी दिसली. सुंदर रंग असलेली. शिंजीर, शिंपी आणि कोतवाल यांची तर रेलचेल होती. मागे एकदा उन्हाळयात आलो होतो, तेंव्हा नीलपंख भेटला होता. यालाच चाष असंही म्हणतात. याच्या निळया रंगाचं वर्णनच करता येणार नाही. खंडया (king fisher) आणि बंडया (white brested kingfisher) हे ही दिसल्याचं आठवतंय. या खंडयाचा जो निळा रंग असतो, त्याला इंद्रनील म्हणतात. अप्रतिम!

नाला पार करून तलावाकडे जातोच आहे तर, भारद्वाजाचं कूजकूज ऐकू येऊ लागलं. माग काढत गेलो. जोडी होती. जवळ जाताच उडाली. याला पाहणं शुभशकून मानतात. तलावाजवळ जांभळाच्या झाडांची गर्द राई आहे. भरपूर जांभळे मिळाली होती उन्हाळयात. राईतच एक छोटीशी बंगली आहे. (सरकारी) निगा न राखलेली. पण तिचा टुमदारपणा आणि स्थान पाहून हरखून गेलो. सामान एका झाडाच्या बांधीव पारावर ठेवलं, आणि हुंदडायला मोकळा झालो. तलावाचे पाणी उजवीकडील डोंगर रांगांतून पावसाळयात साठणा-या पाण्यापासून वाढत असावं. डावीकडे मात्र मोठा बांध टाकून पाणी अडवण्यात आले आहे. पातळी उच्च झाली की, पलिकडे सोडून देत असावेत. या बांधावर बसून पक्षी पाहण्यासारखं सुख नाही. उंचावरून झपकन् पाण्यात झेप घेणारे व चोचीत मासे पकडून पुन्हा आकाशात जाणारे पाणकावळे (cormorant) पाहताना देहभान हरपंल जातं.

एक नवा पक्षी मी काकूलीलाच प्रथम पाहिला. हरोळी! हिरवे कबूतर. बेमालूम असा हिरवा रंग, मजबूत बांधणी आणि सुंदर आवाज. फक्त हा दिसणं दुरापास्त. चार वेळा गेलो, पण एकदाच शोधू शकलो. बगळे आणि पोपट भरपूर प्रमाणात. तलवात भरपूर मासे असल्याने पक्षीही खूप आहेत. स्थानिक लोक मासेमारीही करतात. गोडया पाण्यातले मासे खायलाही चविष्ट!

तलावाजवळील नीरव शांतता, बांधावरून समोर बदलापूरची टेकडी व हाजीमलंग आणि मनात फुटणारा अत्यानंद, या सर्वांचं सुंदर मिलन मी अनुभवलं. घडयाळ या गोष्टीशी आपला संबंध असूच नये, असं प्रकर्षानं मला या जागेवर जाणवलं. आणि गंमत म्हणजे सगळया ऋतुत या तलावाचं सौंदर्य वेगळं. प्रत्येक वेळेस गेलो, नवं रूपडं बघायला मिळालं, एकदम दुर्गाबाईंच्या ऋतुपर्व आणि संपूर्ण माडगुळकरांनी मनात गर्दी केली. उन्हाळयात तर तलावापर्यंत बाईकनं आल्याचं आठवतंय. अंबरनाथ एम्.आय्.डी.सी.तून काकूलीला रस्ता आहे. पण दोन्ही रस्त्यामधला फरक म्हणजे एखादी उत्तम कविता सुचण्यातला सृजनानंद आणि ती गीत म्हणून गायली जातानाचा स्वरानंद या दोहोत असतो तसा. माझा पिंड सृजनानंदाचा. म्हणून राईतली वाट जास्त भावली.

तुमच्याकडे आणखी थोडा वेळ असेल तर आणखी एक जागा सांगतो. ज्या रस्त्यावरून पाईप- लाईनवरून तुम्ही खाली आलात ना, तेथे न वळता सरळ चला. ३-४ कि.मी. वर वीटभट्टया लागतील. गावक-यांना विचारा. चिखलोली कुठाय? इथूनच उजवीकडे एक कच्चा रस्ता २-३ कि.मी. वरील चिखलोली तलावाकडे घेऊन जाईल. येथे धरणाच्या भिंतीखाली वाहनं ठेवा आणि भिंत चढून जा. काकूलीपेक्षा मोठ्ठा चिखलोली तलाव समोर येईल. येथे झाडी मात्र अजिबात नाही. पण रौद्रपणा आणि नैसर्गिक तलाव या दोन्ही गोष्टी बघायला मिळतील. इथे पक्षी म्हणजे फक्त कावळे. इतके छळतात की विचारायची सोय नाही!

जरा आणखी वेळ असेल तर इथून अंबरनाथचं ११०० सालातलं शिवमंदिरही जवळच आहे. अतिशय सुंदर शिल्पकलेचा नमुना आपल्याच गावात पाहिल्याचा अनुभवही तुम्हांला मिळेल. एक दिवसांत निसर्गाशी जवळीक, शांतता आणि वेगळे पक्षी बघायचे असतील तर काकूलीला जायला विसरू नका!

– प्रसाद टिळक