संगीतकला मुख्यपान

 

 

वादनपारंपारिक वाद्य


 

घांगळी

संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीत निर्माण करते ते वाद्य. संगीत वाद्यांचे ४ प्रकार आहेत. त्यात घनवाद्ये, तंतुवाद्ये, चर्मवाद्ये, सुषिर वाद्ये. आजच्या धकाधकीच्या जीवनात जुनी वाद्ये आणि संगीत यापेक्षा डी. जे., धांगडधिंगा संगीतच लोकांना आवडते आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये नवीन वाद्ये विकसित केली जात आहेत. तसेच प्रचलित वाद्यांमध्ये आवश्यक बदल होऊ लागले आहेत. आपल्या वाद्यसंस्कृतीमध्ये परंपरागत चालत आलेली अनेक वाद्ये आहेत. संस्कृतीचा महत्त्वाचा घटक म्हणून त्यांचा अभ्यास केला जायचा. मात्र, आज अशी अनेक वाद्ये काळाच्या पडद्याआड लुप्त होऊ लागली आहेत. आधुनिक काळाची गरज पाहता नाविण्यपूर्ण आणि बहुउपयोगी वाद्यांना प्रचंड मागणी असल्याचे जाणवते. आज परंपरागत किंवा प्राचीन वाद्यांचे अस्तित्व केवळ संस्कृतीकोश आणि वस्तुसंग्रहालये इत्यादी ठिकाणीच राहिल्याचे पाहायला मिळते. या लुप्त वाद्यांचा इतिहास आपल्याला माहित व्हावा यासाठी हा एक प्रयत्न -
 

घांगळी हे वारली समाजाचे पारंपरिक वाद्य आहे. हे वाद्य दिसायला रुद्रवीणेसारखे दिसते. वारली समाजात ज्याप्रमाणे नृत्याला महत्त्वाचे स्थान आहे त्याप्रमाणेच यावेळी वाजविले जाणारे घांगळी ह्या वाद्याचे महत्त्वही तेवढेच आहे. दिवाळी, शिमगा यांसारखे सण लग्नसमारंभात तसेच प्रार्थना करताना वारली स्त्री-पुरुष शरीर शृंगारुन निरनिराळी लोकनृत्ये करतात. त्यावेळी हे घांगळी वाद्य प्रामुख्याने वाजविले जाते. आपल्याला घांगळी हे वाद्य भू-मातेने दिले आहे, अशी वारली लोकांची श्रध्दा होती. हे वाद्य वाजविणार्‍यांना घांगळी भगत असे म्हणत. ह्या वाद्याला डाव्या हाताने छातीपाशी घट्ट धरुन उजव्या हाताने तारांना छेडून भगत वाजवितो तेव्हा त्याला इतर दोन भगत साथ देतात.

हे वाद्य सहजासहजी कोणीही वाजवू शकत नाही त्यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागते. अनुभवी भगत ही विद्या तरुण मुलांना शिकवितात. हे शिक्षण पावसाळ्याच्या प्रारंभीचा काळात सुरू होऊन ते दिवाळीपर्यंत पूर्ण होते. या काळात शिकाऊ भगतांना काही व्रते कडकपणे पाळावी लागतात. जो भगत ही व्रते व्यवस्थित आचरणात आणणार नाही, त्यास शिक्षा केली जात असे. तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही तर त्याला शिक्षण देणे बंद केले जाते. भू-मातेने दिलेले हे वाद्य वाजविण्याची कला अवगत करण्यासाठी प्रचंड तपश्चर्येचीच आवश्यकता असते. असे यावरून समजते.

सध्या हे वाद्य कुठेही वापरले जात नाही. ते केवळ खेड्यातील वारली समाजातील सण, समारंभ यावेळीच दर्शनी पडते. घांगळी वाद्य बनविण्याचे कौशल्य मोजक्या लोकांनाच प्राप्त होत असे. त्यामुळे समाजात त्यांना भगतांइतकेच स्थान असे. बहुतेक भगत स्वत:च हे वाद्य बनवित. हे वाद्य बनविण्यासाठी दोन सुकलेल्या भोपळ्यांचा वापर केलेला असतो. दोन्ही भोपळ्यांना जोडण्यासाठी उत्तम प्रतीच्या बांबूंचा उपयोग केला जातो. नाद निर्माण करण्यासाठी या बांबूवर तारा बसविलेल्या असतात. या तारा छेडून जो नाद निर्माण होतो त्याच्या तालावर घांगळी भगत भू-मातेची प्रार्थना करणारे गाणे म्हणतो. त्याला पालघर असे म्हणतात. या गाण्याबरोबर भगत कथाही सांगतो. हे वाद्य वाजविण्यासाठी मोरपिसे, काचेच्या रंगीत बांगड्या, आरसा किंवा बोटांचा वापर केला जातो. घांगळी हा तंतुवाद्याचा आद्य प्रकार आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा