MarathiWorld - HomeArt
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

मराठी इंटरनेट रेडिओ

Madhura -Milind Gokhale & Vidya-Atul Vaidyaसाठ ते ऎंशीच्या दशकात रेडिओची लोकप्रियता शिखरावर होती. पण दूरदर्शन आणि नंतर केबलच्या आगमनानंतर रेडिओचे श्रोते कमी होत गेले. पंरतु आता एफ.एमच्या आगमनाने नवीन पीढी रेडिओकडे आकृष्ट झाली आहे. 'आर.जे' ची नवीन संस्कृती आली आहे. हया सर्व पार्श्वभूमीवर मोबाईल आणि इंटरनेट रेडिओ हे आज जरी नवीन असले तरी त्यांचे भविष्य आणि 'मार्केट' उज्वल आहे. मराठी इंटरनेट रेडिओची सुरूवात 'ई-प्रसारण' नावाने झाली आहे. www.eprasaran.com हया संकेतस्थळावरून आपल्याला मराठी इंटरनेट रेडिओ ऐकण्यासाठी सोय करून दिली आहे, अमेरिकेत राहणा-या गोखले आणि वैद्य हया दोन दांम्पत्यांनी. जागतिकीकरणाच्या हया लाटेत मराठी संस्कृतीशी घट्टपणे नाते जपून ठेवणा-या ई-प्रसारणशी मराठीवर्ल्डने केलेला मनमोकळा संवाद.

ई-प्रसारणच्या चमू मध्ये आहेत मधुरा आणि मिलिंद गोखले तसेच विद्या आणि अतुल वैद्य. गप्पांच्या सुरूवातीलाच विद्या वैद्य हयांनी खुलासा केला की अतुल वैद्य हयांना लहानपणापासून आपले स्वत:चे रेडिओ स्टेशन असावे असे प्रकर्षाने वाटायचे. कदाचित लहानपणी ऐकलेल्या 'आपली आवड', 'कामगार सभा', 'मंगलप्रभात' 'बिनाका गीतमाला' यासारख्या दर्जेदार कार्यक्रमांचा परिणाम असावा. वैद्य कुटूंबिय पंधरा वर्ष व्यवसायानिमित्त हाँगकाँगला होते. त्यावेळी मराठी मंडळाच्या अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात दोघांनी भाग घेतला. कालांतराने अमेरिकेत स्थलांतर केल्यानंतर १९९८ साली झालेल्या बृहन महाराष्ट्र संम्मेलनात अतुलचा सहभाग होता. त्याचवेळेला मधुरा आणि मिलिंद गोखले सांस्कृतिक कार्यक्रम, निवेदन, नाटक हयात अग्रेसर होते. त्यामुळे ओघाने वैद्य आणि गोखले हयांच्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले.

मिलिंद हा सॉफ्टवेअर इंजिनिअरींग मध्ये कार्यरत आहे तर अतुल टि.व्हीचे तांत्रिक उपकरण बनविणा-या कंपनीत आहे. दोघांच्याही बायका कला, साहित्याची आवड असणा-या. हया सा-या पार्श्वभुमीवर दोन्ही कुटूंबियांनी एका नवीन तंत्रज्ञानात पाउल ठेवायचे ठरविले आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच १ मे २००६ रोजी 'ई-प्रसारण' ची मुहूर्तमेढ रोवली. आधीच्या काही तांत्रिक अडचणीनंतर १ जून पासून ई-प्रसारणाला सुरळीत सुरूवात झाली.

इंटरनेट रेडिओ म्हणजे काय? हया प्रश्नाचा खुलासा मिलिंद आणि अतुलनी सोप्या शब्दांत केला. नेहमीच्या रेडिओची फ्रिक्वेंसी ही ९३.५/९ ३.७ इ. ला टयून असते. इंटरनेट रेडिओसाठी एख़ादे संकेतस्थळ निश्चित केले असते. इंटरनेट रेडिओ हा आपल्याला सोयीप्रमाणे वेबसाईटवरून ऐकता येतो-जसे की ई-प्रसारण कॉम वेबसाईटवर असल्यामुळे जगातून कुठेही हा येतो.

इंटरनेटचा साधारण वेग ब्रॉड बँडसाठी 50kbps इतका असतो तर आमचे प्रसारण 33kbps च्या वेगाने असते. तसेच व्हिडीओचे प्रसारण आम्ही 300 kbps वेगाने करतो. सकाळी प्रसारीत केलेला कार्यक्रम दिवसातून पाच वेळा प्रसारीत होतो. त्यामुळे जगभरातल्या मराठी श्रोत्यांना आपल्या सोयीने कार्यक्रम ऐकता येतात. ई-प्रसारणचा स्वत:चा 'सर्व्हर' आहे. तसेच डिजीटल रेकॉर्डींगसाठी / एडिटींगसाठी लागणारी आवश्यक सॉफ्टवेअरस आणि तंत्रज्ञान आहे. रेकॉर्डींग स्टुडिओ गोखले आणि वैद्य दोघांच्याही घरात आहे.

ई-प्रसारणच्या कार्यक्रमात वैविध्य आहेच पण मराठी बरोबर हिंदीचाही समावेश आहे. मधुरा आणि विद्या कार्यक्रमांविषयी भरभरून बोलत होत्या. सुरूवातीला 'आमची आवड' नावाने सुरू केलेला कार्यक्रम 'आपली आवड' म्हणून श्रोत्यांची मागणी पूर्ण करायला लागला आहे. सध्या 'आपली आवड', 'काव्यवाचन', 'कथाकथन', 'स्वरसंध्या', 'गीतांजली', 'सप्रेम नमस्कार', इ. कार्यक्रम सादर होतात. मधुरा आणि विद्या दोघीही जणी स्क्रिप्ट लिहीणे तसेच निवेदनाची जबाबदारी पार पाडतात. सोमवार ते शुक्रवार रोज प्रसारण असल्यामुळे घरची आणि मुलांची जबाबदारी सांभाळून जेवण झाल्यावर रात्री ९.३० पासून रेकॉर्डींगला सुरूवात होते. यापुढे अतुल आणि मिलिंदचे एडिटिगंचे काम संपेपर्यंत रात्रीचे दोन वाजतात. अमेरिकेत भेट देणा-या मराठी कलाकांरांना स्टुडीओत बोलावले जाऊन मुलाखती ध्वनीमुद्रीत होतात.

मोहन आगाशे, शिरीष कणेकर, सलील कुलकर्णी, हयांच्या मुलाखती अविस्मरणीय होत्या. नुकताच 'ई-प्रसारण'ने कल्पना झोकरकरांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम (व्हिडिओ प्रक्षेपणासह) 'लाईव्ह' प्रक्षेपीत केला. ह्याशिवाय ईप्रसारणवर 'थीम' कार्यक्रम केले जातात. अनिवासी मराठी नवीन पीढीसाठी सणवारांची माहिती दिली जाते. मराठी आणि हिंदी गाण्यांचा साठाही भरपूर असल्यामुळे प्रसंगारूप गाणी श्रोत्यांसाठी लावता येतात.

'ई-प्रसारण'च्या चमूला श्रोत्यांचे अनुभव उस्फुर्त आणि कौतुकाचे आले आहेत. 'ई-मेल द्वारा श्रोत्यांना आठवडाभराची रूपरेषा आधीच कळविण्यात येते. त्यामुळे कार्यक्रम सुरू होण्यास काही मिनीटे जरी उशीर केला तरी सा-या अमेरिकेतून फोन यायला सुरूवात होते. नुसतीच अमेरिका नाही तर भारतातूनही मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली येथून कौतुकाच्या ई-मेल्स येतात. एखादा कार्यक्रम श्रोत्यांना आवडल्यास 'डाउनलोड' करण्यासाठी मागणी येते. मिलिंद ठामपणे त्यास नकार देतात. पंरतु श्रोत्यांच्या सोयीसाठी त्याच कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण आवर्जून करतात.

भविष्यातल्या योजने बद्दल सांगतांना मधुरा आणि विद्या म्हणतात की श्रोत्यांचे प्रेम पाहून आपले काम अधिक चांगले व्हावे ही धडपड असते. गजानन वाटवेंचा कार्यक्रम सादर केल्यावर संदिप खरेंच्या कार्यक्रमाचीही फर्माईश होते. त्यावरून नवीन पीढीलाही ई-प्रसारण आवडतेय हे नक्की. लहान मुलांसाठी ही वेगळे कार्यक्रम करायची योजना आहे. तसेच व्हिडीओज् म्हणजेच 'थेट प्रक्षेपण' श्रोत्यांसाठी अधिकाधिक उपलब्ध करून देण्याचा ई - प्रसारणाचा मानस आहे. सध्या स्वखर्चाने चाललेला प्रकल्प जाहिरातींच्या माध्यमातून स्वयंपूर्ण असावा असे अतुल आणि मिलिंदला वाटते.

उत्तम प्रक्षेपण करण्याची अतुल आणि मिलिंदची धडपड, दर्जेदार आणि रसपूर्ण कार्यक्रम सादर करण्यासाठी विद्या आणि मधुराचा अभ्यास, स्वत:चे व्यवसाय आणि दैनंदिन जबाबदा-या पार पाडून रात्र-रात्र जागून श्रोत्यांसाठी नवे काही देण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. मधुरा म्हणते ''सध्या कार्यक्रम आणि श्रोत्यांचे अमाप प्रेम आणि कौतुक हया धुदींत आम्ही आहोत. त्याच धुंदीत ही तारेवरची कसरत पार पाडतो''. बाकीचे तिघे तिला हसत दुजोरा देतात!

मुलाखत व शब्दांकन
भाग्यश्री केंगे.

आपल्या प्रतिक्रीया मराठीवर्ल्डला जरूर कळवा