MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

कलाक्रिडा > कलाकार

संगीत अपर्णा
शास्त्रीय संगीतामध्ये वेगळा ठसा उमटवणा-या एक हरहुन्नरी कलाकार, आपल्या जादुई आवाजाने रसिकांची मने जिंकून आपल्या गुरुचा विश्वास सार्थ ठरवण्यात यशस्वी झालेल्या शास्त्रीय गायिका अपर्णा गुरव. अपर्णा गुरव यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून पुढची १५ वर्षे डॉ. सुधा पटवर्धनांकडे शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. त्यांच्यामधील क्षमतेची जाण डॉ. पटवर्धनांना झाली आणि त्यानी या मुलीला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या जगताची ओळख आणि अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत अपर्णाने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही सन्माननीय पदवी संपादन केली.

यानंतर अपर्णा गुरव यांनी डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडून परिपूर्ण संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. स्वतःचे कौशल्य रसिकांसमोर पेश करण्याची संधी त्यांना डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या बरोबर असताना मिळाली. त्यांनी अनेक मोठया कार्यक्रमांतून वीणाताईंना साथ दिली आहे. ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. विकास कशाळकर यांनीही अपर्णा गुरव यांना संगीताचे धडे दिले आहेत.

अपर्णा गुरव यांना मिळालेली पारितोषिके -
* भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय शिष्यवृत्ती.
* एन. सी. पी. ए. मुंबई कडून सन्मानाची सुरश्री केसरबाई केरकर शिष्यवृत्ती.
*पुण्याच्या नामांकित "गानवर्धन" कडून ताम्हणकर स्मृती शिष्यवृत्ती.

अपर्णा गुरव यांचा सहभाग असलेल्या अविस्मरणीय संगीत सभा-संमेलने

* एन. सी. पी. ए., मुंबई
* यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई
* दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई
* देवल क्लब, कोल्हापूर
* युवा संगीत महोत्सव, म्हैसूर व हैदराबाद
* सवाई गंधर्व महोत्सव, कुंडगोळ
* चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई आयोजित "चैत्र पालवी"
* गानवर्धन, पुणे
* मैफल, नागपूर
* पलुस्कर समारोह, नाशिक
* अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी
* गांधर्व महाविद्यालय, पुणे
* केसरीवाडा गणेशोत्सव, पुणे
* गांधर्व महाविद्यालय आणि संगीत कलामंच आयोजित १७ वी संगीत शिक्षक परिषद, बेळगांव
* उस्ताद अब्दुल करीम खाँ संगीत समारोह, मिरज

अपर्णाची 'गुरुवंदना' नावाची ध्वनीमुद्रिका निघाली आहे. त्यात त्यांनी हेमंत पेंडसेंच्या रचना त्यांच्याच बरोबर सादर केल्या आहेत. ही ध्वनीमुद्रिका गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांना वाहिलेली आहे. अनेक रसिक आणि नामवंत वृत्तपत्राची वाहवा मिळवणारया अपर्णाचा संगीत प्रवास अधिक सृजनशील होत जाओ हीच सदिच्छा.


 

इतर कलाकारांच्या मुलाखती