|
ईशान्य संगीतातली 'रागिणी' आपल्या देशात प्रत्येक राज्याचे एक असे वैशिष्टय दिसते. वेशभूषा, लोकगीते, लोकनृत्य, सण, परंपरा अनेक ठिकाणी हे वैविध्य दिसून येते. अर्थात लोकसंगीताचा गोडवा अवीट असतो कारण मुख्यत्वे ते मातीतून झालेले असते. अशाच प्रकारचे एक संगीत म्हणजे ईशान्य संगीत. बिहू हे आनंद व्यक्त करण्यासाठी सादर होणारे लोकगीत आहे. ढोल घेऊन गावाबद्दल, खाण्यापिण्याबद्दल आनंदोत्सवाचे वर्णन या गाण्यात असते. 'भटियाली' हा लोकसंगीताचा आणखी एक खूप लोकप्रिय प्रकार आहे. कधी एकतारा घेऊन रस्त्यात, मंदिरातही भटियाली सादर करतात. बंगाल, आसाममध्ये भटियाली लोकप्रिय आहे.
आसाममध्ये गुहाटीजवळच्या नागाव इथे राहणा-या रागिणी चक्रवर्ती अगदी लहान वयापासून बिहू भटियालीसारखे गाणे गात होत्या. त्यांचे पहिले गुरू, त्यांचे वडील पंडित विवेकानंद भट्टाचार्य हे आसामचे प्रसिध्द तबलावादक. घरी सतत मोठया कलाकारांचा राबता असायचा. परविन सुलतानासारख्या कलाकाराचा सहवासही नेहमीच मिळायचा. लहानपणापासून लोकगीत आपोआपच गुणगुणली जायची, पण खरी आवड शास्त्रीय संगीताचीच होती. त्यामुळे आसामचे हिंदुस्थानी गायक बी.के.फुकन यांच्याकडे त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. गोहाटी रेडिओ, गोहाटी दूरदर्शनवर अनेक कार्यक्रमही केले.
ही गीत गातानाच रागिणी आसामीही खूप छान गातात. ईशान्य हा शब्दही त्यांना आधी माहित नव्हता. लग्न झाल्यावर त्या मुंबईत आल्या आणि प्रभा अत्रे याचे शिष्यत्व स्वीकारले. किराणा घराण्याचे गाणे त्या करतात. आसामी भीमपलासीमध्ये जास्त गातात असे त्यांना वाटते. मध्यंतरी कर्नाटक संघात त्यांनी शास्त्रीय संगीत ते ईशान्य संगीत सादरकेले. जाणकारांकडून वाहवा मिळवली.
'रवींद्र संगीत' ही तर रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली गीत- संगीताला दिलेली महान देणगी आहे. रवींद्रनाथ जिथे जिथे जातील तिथल्या वातावरणाशी समसरून जात व गाणी लिहीत. अशा प्रकारची जवळ जवळ २५०० गीते लिहिली व त्याला संगीतही त्यांनीच दिले. त्यांची नोटेशन्सही त्यांनी काढली. शास्त्रीय संगीतावर आधारित ही गाणी बंगाली भाषेसारखीच गोड, मधूर आहेत. इथे भावात सूर धावतात. कविता सुरांचे वळण घेते. 'रवींद्र संगीत' ही रागिणी सादर करतात. त्यांच्या मते भाषेच्या अडचणीमुळे रवींद्र संगीत इथे तितकेसे लोकप्रिय नाही. ज्याला इच्छा असेल त्यांनाही गाणी शिकविण्याचीही रागिणीची इच्छा आहे.
रवींद्र संगीत म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय, पाश्चिमात्य संगीत व प्रादेशीक संगीताचे 'संगीत तीर्थ' आहे असे रवींद्र संगीतप्रेमी मानतात. पण रागिणीचे खरे प्रेम शास्त्रीय संगीतावरच आहे. कारण तेच तर सर्व संगीताचा पाया आहे.
- शिबानी जोशी,
नाशिक
|